एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
Plot sale without NA : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांवात सध्या जिकडे जिकडे प्लॉटींग दिसून येत आहे. प्लॉट विक्री करण्यापूर्वी एन. ए. करणे आवश्यक असते, मात्र शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे प्लॉट विक्री सुरू आहे.
काही लोक एन.ए. न करता प्लॉटींग करून प्लॉट विक्री करत आहेत, मात्र एन.ए. न केल्यामुळे 7/12 वर त्या व्यक्तीच्या नावानेच जमीन राहते, त्यामुळे प्लॉट घेणाऱ्या व्यक्तीचे नुकसान होवू शकते असे प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले.
काही लोक जमीन खरेदी करून प्लॉटींग काढत आहेत आणि त्या प्लॉटींग मध्ये अनेक प्लॉट काढून विक्री करतांना ग्रामपंचायत कडून 8-अ घेत आहेत, परंतू एन.ए. न करता घेतलेले प्लॉट कायदेशीर राहत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
जेव्हा एखाद्या गावाजवळ प्लॉटींग करायची असते, त्यावेळी रितसर प्रशासनाकडून एन.ए. करून घ्यावे लागते, गावठाण मध्ये जमीन लावण्यासाठीही प्रशासकीय प्रक्रिया असते, मात्र काही जण कोणत्याही प्रकारची प्रशासकीय प्रक्रिया किंवा परवानगी न घेता प्लॉटींग काढत आहेत जे की बेकायदेशीर असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
याचाच अर्थ कुंभार पिंपळगांव आणि परिसरात एन.ए. न करता सुरू असलेली बहुतांश प्लॉटींग बेकायदेशीर आहे असेच म्हणावे लागेल. म्हणजेच जे लोक एन.ए. न करता प्लॉट घेतील त्यांचे पैसे वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घेतली जमीन- काढली प्लॉटिंग !
स्वस्त दरात जमीन घ्यायची आणि त्यावर प्लॉटिंग सुरू करायची. समोरचे प्लॉट 5 ते 10 लाखाला विकायचे आणि आतील 2 ते 3 लाखाला हप्त्यावर विकायचे असा काही प्रकार सुरू आहे. जमीन कुठे आहे यावर सुध्दा प्लॉटचे दर वर खाली होत असतात.
पैसे ठेवायला जागा नाही ?
एकीकडे मार्केट मध्ये मंदी असल्याने छोटे व्यापारी, सर्वसामान्य माणूस हैराण आहे मात्र याला प्लॉटींगचे क्षेत्र अपवाद आहे. कुंभार पिंपळगांवात सध्या ज्या प्रकारे प्लॉटींगच्या माध्यमातून कोट्यावधीची माया जमवली जात आहे ते पाहता अनेकांना आलेला पैसा नेमका ठेवायचा कुठे ? असा प्रश्न पडला आहे. अनेकांनी काही मार्ग शोधले असले तरी त्यांना झोप मात्र सहजासहजी येत नसल्याचे ऐकायला मिळत आहे.
कोट्यावधींचा हिशोब कुठंय ?
कुंभार पिंपळगावात कोट्यावधी रूपयांची प्लॉट विक्री होत असतांना बहुतांश व्यवहार हा रोखीने आणि गुपचुपणे होत आहे. रोडलगतचे काही प्लॉट तर 50 लाख ते 1 कोटी पर्यंत विक्री झाल्याची चर्चा आहे. मात्र येणारे कोट्यावधी रूपये नेमके कुठं जात आहेत याचाही तपास होणे आवश्यक आहे.
इनकम टॅक्स विभागाचे दुर्लक्ष !
कुंभार पिंपळगांवात कोट्यावधींची प्लॉटींग तर होत आहेच शिवाय रस्त्यालगत असलेल्या प्लॉटच्या किंमती 40 ते 50 लाख आणि त्यापुढे जात आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या व्यवहाराचे पैसे नेमके जातात कुठे ? ब्लॅक मनी कुठे दाबून ठेवण्यात आली आहे ? याचाही तपास इनकम टॅक्स विभागाने करणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायतला अधिकार आहे का ?
जिल्हाधिकारी किंवा तहसिल प्रशासना मार्फत एन.ए. न करता काढण्यात आलेले प्लॉट अधिकृत करण्याचा ग्रामपंचायतला अधिकार आहे का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. प्राप्त माहितीनुसार जिल्हाधिकारी किंवा तहसिल प्रशासना मार्फत एन.ए. नसेल तर ग्रामपंचायतची नोंद सुध्दा अधिकृत होत नाही, मग त्या व्यक्तीने रजिस्ट्री केली असेल तरीही त्याला अर्थ राहत नाही.
तहसिलदार कारवाई करणार !
कुंभार पिंपळगांव मध्ये एन.ए. तसेच प्रशासनाची परवानगी न घेता कोणी प्लॉटींग करत असेल अथवा प्लॉट विक्री करत असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
योगीता खटावकर,
तहसीलदार, घनसावंगी.
कुंभार पिंपळगांव आणि सर्कल मधील अनेक लोकांनी लाखो / कोट्यावधी रूपये (ब्लॅक मनी) कुठे ठेवले आहेत ? याचा तपास “एल्गार न्यूज” द्वारे लवकरच…
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.