एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
मराठा आरक्षणासाठी आता आर-पारची लढाई करण्याची तयारी करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. दिलेल्या मुदतीला अवघे काही दिवस शिल्लक असतांना सरकारकडून अपेक्षित पाऊले उचलण्यात आल्याचे दिसत नसल्याची समाजाची भावना आहे. त्यामुळे समाज पुन्हा आक्रामक होण्याची चिन्हे आहेत.
सरकारने मराठा समाजाला 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण द्यावे, नसता सरकारला पुढील आंदोलन जड जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या 24 डिसेंबर नंतरचे आंदोलन कसे असणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याचे दिसत आहे.
ट्रॅक्टर मोर्चा मुंबईत धडकणार ?
येत्या 24 डिसेंबर नंतरचे आंदोलन कसे असणार याबाबत चर्चा सुरू असतांनाच आता सोशल मीडियावर 24 डिसेंबर नंतर मुंबईत जरांगे पाटील यांचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार असल्याची चर्चा सुरू आहे.
सदरील सोशल मीडियातील मॅसेज नुसार गावागावात मराठा आंदोलकांकडून ट्रॅक्टर्स व कार्यकर्ते घेवून मुंबई जाण्याची तयारी करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार वातावरण निर्मिती करण्यात येत आहे.
सदरील ट्रॅक्टर मोर्चा सोलापूर, इंदापूर, पुणे, पनवले, कल्याण, ठाणे मार्गे मुंबईतील मंत्रालयावर धडकणार असल्याचे सांगितले जात आहे. पंजाब, हरियाणातील शेतकरी आंदोलना प्रमाणे सकल मराठा समाजाचा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्याच्या 36 जिल्ह्यातून प्रत्येकी 50 ट्रॅक्टर व ट्रॉली असणार आहेत. सदरील प्रत्येक ट्रॅक्टर सोबत ट्रॉली आणि 10 समाज बांधव असणार आहेत. दहा दिवस पुरेल इतका अन्नशिधा सोबत असणार आहे, यासाठी मोबाईलवर नाव नोंदणी करण्यात येत आहे. अर्थातच या मोर्चाच्या माध्यमातून मुंबई जाम होणार असल्याचे बोलले जात आहे.
मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया !
सदरील सोशल मीडियात सुरू असलेल्या ट्रॅक्टर मोर्चाच्या मॅसेज बाबत मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 24 डिसेंबर नंतरचे आंदोलन कसे असणार याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही, त्यासाठी 17 डिसेंबरला बैठक बोलावण्यात आली आहे. याच बैठकीत पुढील आंदोलना बाबत सविस्तर चर्चा होईल असे त्यांनी सांगितले.
17 डिसेंबरची बैठक महत्वपूर्ण !
सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर वातावरण निर्मिती करण्यात येत असल्याचे दिसत आहे. एकाचवेळी शेकडो ट्रॅक्टर मुंबईच्या दिशेने गेल्यास मुंबईतील रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गही जाम होतील, मात्र सदरील निर्णय घ्यायचा का नाही याचे सर्वस्वी अधिकार मनोज जरांगे पाटील यांना आहेत. अर्थातच यासाठी 17 डिसेंबरची बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.