एल्गार न्यूज :-
ज्या वयात अल्पवयीन मुलांनी चांगले शिक्षण घेवून उज्जवल भविष्याच्या दिशेने वाटचाल करायची असते त्याच वयात जर अल्पवयीन मुले ट्रॅक्टर व इतर चार चाकी वाहने चालवून स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणार असतील तर हे नक्कीच चिंतेची बाब आहे.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव परिसरातून सध्या मोठ्या प्रमाणात उसाची वाहतुक सुरू आहे. सर्कल मधील अनेक गावातील शेतकऱ्यांनी उस लावलेला आहे, ऊस काढणीला आल्यामुळे दिवसरात्र या भागातून ऊसाची वाहने जातांना दिसत आहे. मात्र सदरील जाणाऱ्या वाहनांपैकी एखाद्या वाहनावर अचानक अल्पवयीन मुलगा दिसून येत आहे.
जीव धोक्यात !
सध्या कुंभार पिंपळगांव परिसरातून मोठ्या प्रमाणात उसाची वाहतुक सुरू आहे. बहुतांश वाहनांवर ड्रायवर दिसत असले तरी एखाद्या वाहनावर अल्पवयीन मुलगा दिसून येत आहे. त्यामुळे या मुलासह रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या इतर वाहनचालकांना तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांच्या जिवीतेला धोका निर्माण झाला आहे.
अनेकदा असेही पहायला मिळत आहे की, ज्या मुलाचे पाय ब्रेकपर्यंत सुध्दा जाणार नाहीत तो मुलगा ऊसाचे ट्रॅक्टर चालवत आहे. शक्यतो उसाच्या ट्रॅक्टरला 2 ट्रॉली असतात, जर अशा दोन ट्रॉलीचे ट्रॅक्टर अल्पवयीन मुलाच्या हाती येणार असेल तर ते किती धोकादायक असू शकते याचा अंदाज बांधता येईल.
इतर वाहने सुध्दा !
या भागात अनेकदा अल्पवयीन मुलांच्या हाती उसाचे ट्रॅक्टरच नव्हे तर जीप, ट्रॅक्स, क्रुझर, कार अशी विविध वाहने सुध्दा दिसून येत आहेत. विशेष म्हणजे कुंभार पिंपळगावातून हायवे गेलेला असल्यामुळे या रस्त्यावरून इतर जिल्ह्यातूनही मोठमोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असते.
हायवेवर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या कचाट्यात जर अल्पवयीन मुलांच्या हाती असलेले वाहन आले तर किती मोठा अपघात होवू शकतो याचा विचार करणे आवश्यक आहे. सदरील मुलाच्या पालकांनी अशा प्रकारे आपल्या अल्पवयीन मुलांच्या हाती चार चाकी वाहन देवून मुलाचे आणि इतरांचे जीव धोक्यात घालणे योग्य आहे का ? याचाही विचार करणे आवश्यक आहे.
अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन दिसून आल्यास मुलाच्या वडीलांवर गुन्हा दाखल होवू शकतो याचं भान सुध्दा पालकांनी ठेवणे आवश्यक आहे. आधीपेक्षा आता नियम कायदे कडक करण्यात आले असून पालक विनाकारण अडचणीत येवू शकतात याचेही भान ठेवणे आवश्यक आहे.
पोलीसांचे दुर्लक्ष !
कुंभार पिंपळगांव सर्कल मध्ये अधून मधून अल्पवयीन मुलांच्या हाती उसाचे ट्रॅक्टर, जीप, ट्रॅक्स, कार इत्यादी चार चाकी वाहन दिसून येत असतांना आरटीओचे तर दुर्लक्ष आहेच मात्र स्थानिक पोलीस सुध्दा बघ्याची भुमिका घेत आहेत. अशा प्रकारे कोणी अल्पवयीन मुले वाहने चालवतात का हे सुध्दा त्यांना माहित आहे किंवा नाही हा एक प्रश्नच आहे. पोलीसांनी वेळीच याकडे लक्ष देवून कारवाई केल्यास भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेला रोखणे शक्य होईल.