Your Alt Text

कुंभार पिंपळगांव येथील स.भु.शाळेत शिक्षणाचे तीन तेरा ! …तर मुर्दाड मानसिकतेच्‍या पालकांनी मुलांना डॉक्‍टर, इंजिनिअर, अधिकारी करण्‍याचे स्‍वप्‍न पाहू नये ! | SB School KP News

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील सरस्‍वती भुवन शाळेत सध्‍या ज्‍या प्रकारे शिक्षणाचा दर्जा घसरला आहे आणि ज्‍या प्रकारे मुलांकडे आणि शिक्षणाकडे अक्षम्‍य दुर्लक्ष केले जात आहे ते पाहता मुलांचे भविष्‍य काय असेल ते सांगण्‍यासाठी कोण्‍या तज्ञाची गरज नाही.

शाळेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असेल, शिक्षणाचा दर्जा खालावला असेल आणि गुणवत्‍तेच्‍या नावाने बोंबाबोंब असेल तरीही पालक शाळेत जावून काहीही बोलणार नसतील आणि आपल्‍या मुला-मुलींच्‍या चांगल्‍या शिक्षणासाठी प्रयत्‍न करणार नसतील तर त्‍या मुर्दाड मानसिकतेच्‍या पालकांनी मुलांना डॉक्‍टर, इंजिनिअर, अधिकारी करण्‍याची स्‍वप्‍न पाहू नये असेच म्‍हणण्‍याची वेळ दुर्दैवाने आली आहे.

कुंभार पिंपळगांव सर्कल मधील लोकांना शिक्षणाचं महत्‍व राहीलं नाही का ? असा प्रश्‍न उपस्थित होवू लागला आहे. आपला मुलगा मुलगी खूप शिकावे आणि मोठं व्‍हावं ही तर सर्वांची इच्‍छा आहे पण त्‍यासाठी काहीच प्रयत्‍न करायचे नाही असा हा प्रकार आहे.

पालकांची अनास्‍था !

आपला मुलगा किंवा मुलगी ज्‍या शाळेत जातात तेथे सगळं काही सुरळीत सुरू आहे का ? त्‍यांना योग्‍य प्रकारे शिकवले जात आहे का ? मुला-मुलींसाठी स्‍वच्‍छतागृह आहे का ? शिक्षकांची संख्‍या बरोबर आहे का ? शिक्षणाचा दर्जा चांगला आहे का ? हे प्रश्‍न पालकांनी स्‍वत:ला विचारणे आणि माहिती घेणे अत्‍यंत गरजेचे झाले आहे.

मागील वर्षीचा निकाल सुमार दर्जाचा !

स.भु.शाळेत मागील वर्षी अनेक विद्यार्थी सी ग्रेड म्‍हणजेच थर्डक्‍लास कॅटेगरी मध्‍ये पास झाले आहेत. विशेष म्‍हणजे यामध्‍ये अनेक हुशार विद्यार्थ्‍यांचाही समावेश आहे. शाळेतून योग्‍य प्रकारे होम वर्क दिला जात नाही आणि तपासलेही जात नाही. अपवाद सोडल्‍यास चाचण्‍या घेतल्‍या जात नाहीत. याबाबत शाळेचे अजब उत्‍तर समोर आले आहे. शाळेच्‍या म्‍हणण्‍यानुसार शासनाने विद्यार्थ्‍यांवर जास्‍त ताण देवू नये असे सांगितले आहे. त्‍यामुळे कदाचित विद्यार्थ्‍यांना ढक्‍कल पास करून फक्‍त कागदी घोडे नाचवले जात असावे.

स.भु.शाळेचा गलथान कारभार !

दि.07 रोजी कुंभार पिंपळगांव येथील स.भु.शाळेत जेव्‍हा जावून प्रत्‍यक्ष पाहणी करण्‍यात आली तेव्‍हा असे लक्षात आले की, येथे काही शिक्षकांची उपस्थिती नव्‍हती, विविध कारणांनी काही शिक्षक बाहेर होते, मुख्‍याध्‍यापक काही कामासाठी गावी गेले होते.

जखम पायाला मलम शेंडीला !

शाळा सुरू होवून जवळपास 10 दिवस उलटून गेले तरी आता पर्यंत शिक्षकांना विषय देण्‍यात आले नव्‍हते. आता विषय निश्चित करण्‍यात आले आहेत. मात्र वर्ग 8 वी च्‍या बाबतीत इंचार्ज यांच्‍याकडून कोणाकडे कोणते विषय आहे ही माहिती घेतली असता, असे दिसून आले की, जे शिक्षक ज्‍या विषयात तज्ञ आहेत त्‍यांना तो विषय न देता भलताच विषय शिकवण्‍यासाठी देण्‍यात आला आहे.

म्‍हणजेच ज्‍या शिक्षकाकडे एखादा विषय शिकवण्‍यासाठी देण्‍यात आला आहे तो विषय संबंधित शिक्षक योग्‍य प्रकारे किंवा चांगल्‍या पध्‍दतीने शिकवू शकत नाही. मग विद्यार्थ्‍यांना संबंधित शिक्षकाने शिकवलेले समजेल का ? विद्यार्थ्‍यांना चांगले शिक्षण मिळेल का ? शिक्षणाचा दर्जा चांगला राहील का ? हे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

शिक्षक व कर्मचारी संख्‍या कमी !

मागील काळात या शाळेत शिक्षण व कर्मचाऱ्यांच्‍या सर्व जागा भरण्‍यात आल्‍या होत्‍या असे सांगितले जाते, मात्र आता शिक्षकांची व इतर कर्मचाऱ्यांची संख्‍या निम्‍यावर आल्‍याची माहिती समोर आली आहे. याचाच अर्थ येथील शाळेची अवस्‍था दयनीय झाली आहे.

स्‍वच्‍छतागृहाचे तीनतेरा !

मुलांचे असो किंवा मुलींचे स्‍वच्‍छतागृह असो, अक्षरश: शौचालयांमध्‍ये एवढी घाण व दुर्गंधी आहे की येथे तोंडाला रूमाल बांधून जाणेही अवघड आहे, सदरील शौचालयामध्‍ये 10 सेकंद सुध्‍दा कोणी थांबणार नाही किंवा जाणार नाही ! (अनेक फोटो उपलब्‍ध आहेत परंतू येथे दाखवता येणार नाही एवढी घाण व दुर्गंधी आहे.)

आश्‍चर्याची बाब म्‍हणजे मुलांच्‍या व मुलींच्‍या शौचालयांमध्‍ये पाणीच नाही. जर शौचालयामध्‍ये पाणीच नाही तर मुले किंवा मुली तेथे जाणार कसे ? शौचालयांची स्‍वच्‍छता करण्‍यासाठी कोणीही कर्मचारी नाही. अक्षरश: शौचालय पाहून कोणाचीही तळपायाची आग मस्‍तकात जाईल अशी परिस्थिती आहे.

विद्यार्थ्‍यांचे आरोग्‍य धोक्‍यात !

मुलांसाठी 3 आणि मुलींसाठी 4 शौचालय दिसून आले. ज्‍या प्रकारे शौचालयांमध्‍ये घाण व दुर्गंधी आहे ते पाहता शाळेतील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थीनींचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे. विशेष म्‍हणजे या शौचालयाच्‍या काही फुट अंतरावरच विद्यार्थ्‍यांसाठी असलेल्‍या किचनमध्‍ये अन्‍न शिजवले जाते. या किचनचीही अवस्‍था अत्‍यंत वाईट आहे.

डॉक्‍टर – इंजिनिअर होण्‍याचे फक्‍त स्‍वप्‍नच !

ज्‍या पध्‍दतीने सरस्‍वती भुवन शाळेचा शैक्षणिक दर्जा खालावला आहे ते पाहुन कोणी डॉक्‍टर, इंजिनिअर, अधिकारी किंवा इतर महत्‍वाच्‍या क्षेत्रात पुढे जाईल याची शक्‍यता खूपच कमी दिसत आहे. कारण येथील शैक्षणिक दर्जा खूपच खालावला आहे. सुविधांचा तर विषयच नाही.

शाळा बंद करण्‍याचा घाट !

ज्‍या शाळेने अनेक डॉक्‍टर, इंजिनिअर, अधिकारी, वकील, शिक्षक, प्राध्‍यापक, तज्ञ घडवले आहेत आज त्‍या शाळेची अत्‍यंत दुरावस्‍था झाली आहे. खरं किंवा खोटे माहित नाही, पण सगळ्या बाबतीत शाळेचा दर्जा खालावून ही शाळा बंद करण्‍याचा घाट घातला जात असल्‍याची शंका उपस्थित केली जात आहे. जर हे खरं असेल तर यामध्‍ये संस्‍थेशी संबंधित लोक आहेत किंवा बाहेरचे लोक आहेत हे तपासणे आवश्‍यक आहे.

मुर्दाड मानसिकता !

सदरील शाळा अनुदानित असून शिक्षकांनाही पगार लाखाच्‍या घरात आहे. जी शाळा अनुदानित असते त्‍या शाळेतील कर्मचाऱ्यांचा पगार हे शासन करत असते, शाळा संस्‍थेची जरी असेल तरीही ती शासनाच्‍या अधिपत्‍याखाली असते. गोरगरीब व सर्वसामान्‍य कुटुंबातील विद्यार्थ्‍यांना या शाळेत नाममात्र दरात शिक्षण मिळते. त्‍यामुळे या शाळांना विशेष महत्‍व असते.

परंतू जर पालक विद्यार्थ्‍यांना शाळेत जा म्‍हणून सांगत असतील आणि मोकळे होत असतील तर ही मुर्दाड मानसिकता म्‍हणावी लागेल. डॉक्‍टर इंजिनिअर, कलेक्‍टर, एस.पी. होण्‍याचे स्‍वप्‍न तर दूरच आपला पाल्‍य छोटा मोठा व्‍यवसाय तरी करू शकेल का नाही ? हा प्रश्‍न पालकांनी स्‍वत:ला विचारावा अशी परिस्थिती आहे.

पालकांनी शाळेत कधी जायचे नाही, काही सूचना करायच्‍या नाही, काय चुकतंय हे सांगायचं नाही, शैक्षणिक दर्जा पहायचा नाही, मुलाला काही येतंय का नाही हे पहायचे नाही, शाळेतील सोयी सुविधांबद्दल काही बोलायचं नाही ? कोणतीच तक्रार करायची नाही पण आपला मुलगा डॉक्‍टर, इंजिनिअर, कलेक्‍टर, एस.पी. व्‍हावा ही केविलवाणी इच्‍छा मात्र ठेवायची, हे योग्‍य आहे का ? याचा विचार होणे आवश्‍यक आहे.

पालकांची प्रतिक्रिया !

या बाबतीत काही जागरूक पालकांनी सांगितले की, यापूर्वी पालकांच्‍या मिटींगमध्‍ये आम्‍ही मुख्‍याध्‍यापक यांना शैक्षणिक दर्जा आणि इतर बाबतीत कठोर शब्‍दात नाराजी व्‍यक्‍त केली होती, परंतू त्‍याचे काहीही झाले नाही. सध्‍याचे मुख्‍याध्‍यापक हे तर आठवड्यातून कधी तरी दिसून येतात असे सांगितले.

मुख्‍याध्‍यापकांची भुमिका !

शाळेतील शिक्षणाचा दर्जा खालावल्‍या बाबत व इतर उपाययोजना करण्‍याबाबत पालकांच्‍या वतीने सध्‍याचे मुख्‍याध्‍यापक यांना यापूर्वी दि.05/09/2023 रोजी विनंती पत्र देण्‍यात आले होते (ज्‍याची प्रत उपलब्‍ध आहे) तेव्‍हा त्‍यांनी सांगितले होते की, शैक्षणिक दर्जा झटक्‍यात सुधरत नसतो, शिवाय विद्यार्थ्‍यांवर कोणताही दबाव, ताण येवू नये असे शासनाचे धोरण असल्‍यामुळे त्‍यांना जास्‍त होमवर्क किंवा इतर अॅक्‍टीवीटी देणे टाळल्‍या जात असल्‍याचे त्‍यांनी सांगितले होते.

म्‍हणजेच विद्यार्थ्‍यांना कोणत्‍याही प्रकारचा होमवर्क, अभ्‍यास, त्‍यांच्‍या घटक चाचण्‍या किंवा इतर आवश्‍यक अॅक्‍टीवीटी न देता किंवा गुणवत्‍तेकडे लक्ष न देता निव्‍वळ ढक्‍कलपास करण्‍याचे शासनाचे धोरण आहे का ? असा सवाल काही जागरूक पालकांनी केला आहे.

जबाबदार कोण ?

शाळेचा घसरलेला शैक्षणिक दर्जा, शाळेची झालेली दयनीय अवस्‍था याला जबाबदार कोण ? हे संस्‍था आणि शाळेशी संबंधित लोकांनी पाहणे आवश्‍यक आहे. कोणावरही टिका टिप्‍पणी करण्‍यापेक्षा ही शाळा आपली आहे आणि त्‍याचा दर्जा सुधारणे तसेच शाळेत आवश्‍यक त्‍या महत्‍वपूर्ण सुधारणा करणे याबाबत प्रयत्‍न होणे नक्‍कीच गरजेचे आहे.

संस्‍था / प्रशासनाकडून अपेक्षा !

सदरील शाळेत खालावलेला शैक्षणिक दर्जा, मुला-मुलींचे आरोग्‍य, त्‍यांचे भविष्‍य लक्षात घेता संस्‍थेचे मान्‍यवर व्‍यक्‍ती, प्रशासनातील वरिष्‍ठ अधिकारी, शिक्षण विभाग व ज्‍यांना शक्‍य आहे त्‍यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून तात्‍काळ शाळेची तपासणी करणे आणि
योग्‍य ती पाऊले उचलणे अत्‍यंत गरजेचे झाले आहे.

तक्रार – पाठपुरावा आवश्‍यक !

कुंभार पिंपळगांव येथील स.भु.शाळेच्‍या दयनीय अवस्‍थे बाबत पालकांनी संस्‍थेचे अध्‍यक्ष, सचिव यांच्‍यासह शिक्षणमंत्री, विभागीय आयुक्‍त, शिक्षण उपसंचालक, जिल्‍हाधिकारी, जि.प. मुख्‍य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी अशा सर्व मान्‍यवरांपर्यंत तक्रार करणे आवश्‍यक आहे. कारण प्रश्‍न कोण्‍या एकाचा नाही तर असंख्‍य गोरगरीब मुला-मुलींच्‍या स्‍वप्‍नांचा आणि भविष्‍याचा आहे.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

महत्‍वपूर्ण बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

2 thoughts on “कुंभार पिंपळगांव येथील स.भु.शाळेत शिक्षणाचे तीन तेरा ! …तर मुर्दाड मानसिकतेच्‍या पालकांनी मुलांना डॉक्‍टर, इंजिनिअर, अधिकारी करण्‍याचे स्‍वप्‍न पाहू नये ! | SB School KP News”

  1. खरोखरच शाळेचे शैक्षणिक तीन तेरा वाजले आहेत सर्व पालक वर्गानी जाणिवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे फशासनाचा पगार फुकट वाया जाऊ देऊ नये त्याचा पुरेपूर फायदा आपल्या पाल्यासाठी करुन घ्यावा व त्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल घडवुन घेण्यास भाग पाडावे

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!