Your Alt Text

MBBS डॉक्‍टर होण्‍यासाठी विदेशात 25 लाख मग आपल्‍याकडे 1 कोटी का ? | गरीबांसाठी तर हे स्‍वप्‍नच ! | MBBS Degree Fees in India

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज विशेष :- MBBS Degree Fees in India : भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी मेडिकलसाठी प्रवेश घेण्‍यास इच्‍छुक असतात, परंतू प्रत्‍येकाचा नंबर लागत नाही, शासकीय कोट्यातील जागा ह्या मर्यादित आहेत तर खाजगी कॉलेज मध्‍ये फी सर्वसामान्‍य माणसाच्‍या आवाक्‍याबाहेर आहे. त्‍यामुळे देशातील असंख्‍य विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

आपणास आश्‍चर्य वाटेल पण एखाद्या विद्यार्थ्‍याला MBBS Degree घ्‍यायची असेल तर त्‍याला पुर्ण डिग्री प्राप्‍त करण्‍यासाठी जवळपास 1 कोटी रूपये खर्च येत असल्‍याची माहिती अनेकदा माध्‍यमांमधून समोर आली आहे. विशेष म्‍हणजे हीच एमबीबीएसची डिग्री विदेशात जसे की, रशिया, युक्रेन अशा विविध देशात प्राप्‍त करण्‍यासाठी फक्‍त 25 लाखाच्‍या आसपास फी आहे.

मग सर्वसामान्‍य माणसाला प्रश्‍न पडतो की, जर इतर देशांमध्‍ये 25 लाखांमध्‍ये MBBS करणे शक्‍य आहे तर मग भारतात का नाही ? आपल्‍या देशात का MBBS चे कॉलेज सुरू केले जात नाही, आपल्‍याकडेच तशी व्‍यवस्‍था का केली जात नाही ? काहींना प्रश्‍न पडला असेल की, एवढे कॉलेज सुरू करण्‍यासाठी पैसा आणायचा कोठून ? तर त्‍याचे उत्‍तर आहे. देशात लाखो कोटींचे प्रोजेक्‍ट सुरू आहेत त्‍यासाठी जर पैसा उपलब्‍ध होवू शकतो तर मग यासाठी का नाही ?

शासनाने विविध कंपन्‍यांना त्‍यांचा 2% फंड सामाजिक कार्यात वापरण्‍यास सांगितलेले आहे. मग देशात असंख्‍य कंपन्‍या आहेत, शिवाय हजारो फाउंडेशन संस्‍था आहेत, त्‍यांच्‍या माध्‍यमातून का असेना असे MBBS चे कॉलेज सुरू करण्‍यास काय हरकत आहे. भारत सोडून पळून गेलेल्‍या विजय माल्‍या, निरव मोदी, मेहूल चौकसी अशा लोकांना हाताच्‍या ओंजळीने हजारो कोटी रूपये देण्‍यापेक्षा सर्वसामान्‍य जनतेच्‍या दृष्‍टीने काही कोटी खर्च केल्‍याने कोणते आभाळ कोसळणार आहे.

गरीब विद्यार्थ्‍यांचं काय ?

एखाद्या घरात एखादा मुलगा किंवा मुलगी जर MBBS झाली तर त्‍यांचे कुटुंबासह त्‍यांच्‍या पुढच्‍या पिढीचं सुध्‍दा कल्‍याण होवू शकतं. मात्र आजच्‍या घडीला जी व्‍यवस्‍था आहे त्‍यात गरीब लोकांना आपल्‍या मुलाला किंवा मुलीला MBBS करवणे शक्‍य नाही.

ज्‍यांच्‍याकडे पैसा आहे ते कमी मार्क असतांना सुध्‍दा 1 कोटी रूपये खर्च करून मुलाला MBBS ला अॅडमिशन घेवू शकतात. मात्र जे गरीब लोक आहेत त्‍यांच्‍यासाठी तर MBBS एक स्‍वप्‍नच आहे. म्‍हणजेच ते करू शकत नाहीत. त्‍यासाठी जर आपल्‍या देशातच कमी पैशात MBBS ची सुविधा झाली आणि लागणारे पैसे सुध्‍दा सरकार किंवा बँकेच्‍या माध्‍यमातून बिनव्‍याजी किंवा कमी व्‍याजाने मिळाले तर सदरील मुलगा MBBS झाल्‍यावर ते पैसे सहज फेडू शकतो.

शासन गरीब विद्यार्थ्‍यांना कमी दराने कर्जपुरवठा करून MBBS ची संधी देवू शकते. एमबीबीएस झाल्‍यावर शासन 2 ते 3 वर्ष सेवाही घेवू शकते. कारण आजही ग्रामीण भागात अपवाद सोडल्‍यास MBBS डॉक्‍टर नाहीत. शासन अर्धी पगार कर्ज फेडण्‍यास आणि अर्धी पगार सदरील डॉक्‍टरला देवूनही हा प्रश्‍न मार्गी लावू शकते.

जर दिल्‍ली सारखे केंद्र शासित प्रदेश अवघी शिक्षण व्‍यवस्‍था बदलू शकते, खाजगी शाळा महाविद्यालयांपेक्षा सरकारी शाळा महाविद्यालये आधुनिक व उच्‍च दर्जाची करू शकते तर मग केंद्र सरकार किंवा इतर राज्‍य सरकार का करू शकत नाही. याचाही विचार होणे आवश्‍यक आहे.

इच्‍छाशक्‍ती आवश्‍यक :-

याप्रसंगी एका केंद्रीय मंत्री असलेल्‍या नेत्‍याचं नाव आवर्जून उल्‍लेख करावासा वाटतो, ते म्‍हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं. या माणसाने जे अशक्‍य दिसत होतं ते शक्‍य करून दाखवलं, भारताच्‍या चारही दिशेला राष्‍ट्रीय महामार्गाचं जाळं एवढं मजबूत केलं आहे की, आज देशाच्‍या कोणत्‍याही भागात एवढंच नव्‍हे तर देशाच्‍या सिमेपर्यंत राष्‍ट्रीय महामार्ग आहेत. त्‍यामुळेच त्‍यांना सर्वच पक्षाचे लोक सुध्‍दा मानतात.

ज्‍या प्रमाणे नितीन गडकरी यांनी रस्‍त्‍याच्‍या बाबतीत विशेष आणि कौतुकास्‍पद कामगिरी केली आहे तशीच कामगिरी इतरांनी शिक्षणाच्‍या क्षेत्रात करणे आवश्‍यक आहे. ज्‍या प्रमाणे श्री.गडकरी सांगतात की मला रस्‍ते बांधण्‍यासाठी पैशांची कमतरता भासत नाही, त्‍याच प्रमाणे शिक्षण क्षेत्रात खर्च करतांना पैशांची अडचण भासू नये अशी व्‍यवस्‍था निर्माण होणे गरजेचे आहे. प्रश्‍न एवढाच की शिक्षणाचा बाजार मांडता कामा नये, कारण सध्‍या प्रमाणे पुन्‍हा शिक्षणाचा बाजार सुरू होणार असेल तर याला काहीही अर्थ राहत नाही.

गरीब व सर्वसामान्‍य लोकांना MBBS सारखे शिक्षण आपल्‍या देशातच विदेशापेक्षा कमी पैशात उपलब्‍ध केल्‍यास आणि ते पैसे सुध्‍दा कर्ज स्‍वरूपात उपलब्‍ध करून दिल्‍यास असंख्‍य गोरगरीबांची मुलं MBBS डॉक्‍टर होण्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण करू शकतील. आणि हो, हे अशक्‍य नाही. यासाठी राज्‍यकर्त्‍यांची दूरदृष्‍टी आणि इच्‍छाशक्‍ती आवश्‍यक आहे.

सर्वसामान्‍य नागरिक म्‍हणून आपणही यादृष्‍टीने पाठपुरावा करणे आणि आवाज उठवणे आवश्‍यक आहे. आता जर या महत्‍वाच्‍या प्रश्‍नासाठी प्रयत्‍न केल्‍यास या पिढीसह पुढच्‍या पिढींचे सुध्‍दा कल्‍याण होईल आणि आरोग्‍याच्‍या क्षेत्रात भरीव कामगिरी करून सर्वसामान्‍य रूग्‍णांनाही मोठा दिलासा मिळेल एवढे मात्र नक्‍की…

परवेज पठाण,
संपादक, एल्‍गार न्‍यूज

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!