एल्गार न्यूज :-
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार विविध इंटरनेट प्रोवाईडर कंपन्यांनी त्यांची इंटरनेट सेवा तब्बल 2 दिवसांपेक्षा जास्त कालावधी बंद ठेवली होती, प्राप्त माहितीनुसार जालना, बीड व छत्रपती संभाजीनगर येथील इंटरनेट सेवा ही बंद ठेवण्यात आली होती.
पहिली गोष्ट तर जिल्हा प्रशासनाला फक्त इंटरनेट मुळे कायदा व सुव्यवस्था बिघडत चालल्याचे दिसून आले का ? जर तसे असेल तर सोशल मिडीया कंपन्यांना शक्य असल्यास काही काळ त्यांचे अॅप बंद ठेवण्याचे आदेश द्यायला हवे होते, आणि जर एखादा जिल्हा सोशल मीडिया बंद करणे शक्य नसेल तर दिवसभरासाठी इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेता आला असता.
परंतू संपूर्ण इंटरनेट सेवाच बंद केल्यामुळे बँकींग व्यवस्था कोलमडल्याचे दिसून आले, सर्व महा ई सेवा केंद्र किंवा CSC केंद्र बंद अवस्थेत होते, कारण 7/12, 8 अ, फेरफार व इतर ऑनलाईन कामे इंटरनेट शिवाय करता येत नाही. त्यामुळे नागरिक दिवसभर चकरा मारून हैराण झाले होते.
एवढंच नव्हे तर बँकींग व्यवस्थाही कोलमडल्याचे दिसून आले, ज्यांना पैशांची गरज होती ते सुध्दा इकडे तिकडे फिरतांना दिसून आले, फोन पे, गुगल पे सारख्या मनी ट्रान्सफर सुविधा सुध्दा इंटरनेट अभावी बंद होत्या. त्यामुळे नागरिकांचे बरेच हाल पहायला मिळाले.
अनेकांना दवाखान्यात पैसे लागत होते, त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे होते, परंतू त्यांना इंटरनेट बंद असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला. इंटरनेट नसल्यामुळे एमरजन्सी व्यवहार बंद पडल्याचे दिसून आले, याला जबाबदार कोण असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
नुकसान भरपाई देणार का ?
कंपन्यांनी एकीकडे महिना म्हणून फक्त 28 दिवसच सेवा द्यायची आणि अशा प्रकारे बंद केल्यावर त्याचा काहीही मोबदला द्यायचा नाही हे कितपत योग्य आहे ? जर कंपनीने इंटरनेट 2 दिवस बंद ठेवले असेल तर तेवढे दिवस कंपन्यांनी वाढवून द्यायला हवेत.
नुकसानीचे काय ?
मागील 2 दिवसात सर्वसामान्य नागरिकांचे जे हाल झाले, जे नुकसान झाले, जो त्रास सहन करावा लागला त्याचे काय ? झालेले नुकसान या कंपन्यांचा बाप भरून देणार आहे का ? किंवा जिल्हा प्रशासन नुकसान भरपाई देणार आहे का ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.