एल्गार न्यूज :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे संतप्त मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला काळे फासले, तसेच मार्केट मध्ये असलेल्या आमदार राजेश टोपे यांच्यासह इतर नेत्यांचे बॅनरही आंदोलकांनी फाडले आहेत.
विविध पक्षाचे लागलेले बॅनर आंदोलकांनी फाडले असून यावेळी नेत्यांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. तसेच एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
राज्यभरात सुध्दा ठिकठिकाणी आंदोलन सुरू असून नेत्यांना काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत. सरकार समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे तसेच मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्यामुळे मराठा समाजात तिव्र संताप व्यक्त होत आहे.
रास्ता रोको :-
आंदोलकांनी अंबड – पाथरी रोडवरील जांबसमर्थ टी पॉईंटवर रास्ता रोको आंदोलन केले, या वेळी असंख्य वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, मात्र यावेळी आलेल्या अॅम्ब्यूलन्सला वाट मोकळी करून देण्यात आली. सदरील रास्ता रोको आंदोलन सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत करण्यात आले.
सरकारने त्वरित दखल घेण्याची मागणी :-
सरकारने मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहु नये, समाजाच्या भावना तिव्र आहेत, त्वरित मराठा आरक्षणासाठी पाऊले उचलावीत नसता यापुढे यापेक्षाही तिव्र आंदोलन होवू शकते अशी भावना समाजातून व्यक्त होत आहे.
कुंभार पिंपळगांवात कॅण्डल मार्च :-
कुंभार पिंपळगांवात साखळी उपोषण तर करण्यात येत आहेच, सोबतच दि.29 रोजी कुंभार पिंपळगावासह परिसरातील अनेक गावांमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला, या कॅण्डल मार्च मध्ये महिला, लहान मुलांसाह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परिसर घोषणांनी दणाणून गेला होता.
योजना व इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.