एल्गार न्यूज :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील सरपंच आणि सदस्यांच्या भांडणामुळे आणि ग्रामसेवकाच्या गैरहजेरीमुळे गावाचा विकास खुंटलाय की काय असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे, कारण दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतांना दिसून येत आहेत.
सर्वसामान्य मतदारांनी सरपंच, उपसरपंच, सदस्यांना गावाच्या विकासासाठी निवडून दिलंय, गावाचे मुलभूत प्रश्न जसे की, रस्ते, नाल्या, पाणी, स्वच्छता, आरोग्य, सरकारी योजना, आधुनिक सुविधा, विविध विकास कामे होणे अपेक्षित आहे मात्र याकडे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
सरपंच (प्रतिनिधी) आणि सदस्य भांडत बसणार असतील तर गावाचा विकास होणार कसा ? एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून गावातील प्रश्न सुटणार आहेत का ? सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांमध्ये समन्वय नसेल, चर्चा नसेल, समजुन घेण्याची मानसिकता नसेल तर गावाचा विकास होणार कसा ? हाच खरा प्रश्न आहे.
सदस्यांचे मत :-
नाव न सांगण्याच्या अटीवर काही सदस्यांनी सांगितले की, सरपंच (प्रतिनिधी) हे फक्त एकट्याने काम करण्याची मानसिकता ठेवत आहेत, आम्ही कोणतेही काम सांगितले तर ते काम केले जात नाही, आम्ही पण निवडून आलेलो आहोत, आमच्या वार्डातील कामे लोकं आम्हाला सांगत असतात, समस्या मांडत असतात.
परंतू सरपंच (प्रतिनिधी) यांच्याकडे ती विकासकामे किंवा प्रश्न सांगितल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते, फक्त सरपंच एकटेच काम करणार असतील तर आम्ही काय करायचे ? लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिलंय ? अशी भावना या सदस्यांनी व्यक्त केली आहे.
सरपंच (प्रतिनिधी) यांचे मत :-
गावातील नागरिक ज्या समस्या माझ्याकडे मांडत असतात त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करत असतो, विकासकामे चालू आहेत, घंटागाडी सुध्दा दुरूस्तीला टाकली आहे, त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, तसेच इतरही विकासकामे सुरू आहेत असे त्यांनी सांगितले.
काहीतरी चुकतंय ?
दोन्ही कडील बाजू ऐकल्यानंतर असे दिसून येते की, दोघांमध्ये समन्वय नाही, जर सदस्य त्यांच्या वार्डामध्ये काही काम करण्याबाबत सरपंच (प्रतिनिधी) आणि ग्रामसेवकाला सांगत असतील आणि ते काम जनहिताचे असेल तर ते सदस्यांच्या माध्यमातून करण्यास हरकत नाही. शिवाय एखादे काम सदस्यांना देतांना चांगल्या दर्जाचे आणि योग्य खर्चात करण्याबाबत सूचना करता येईल, जर संबंधित काम योग्य आणि नियमाने न झाल्यास पुढील काळात सरपंच (प्रतिनिधी) आणि ग्रामसेवक निर्णय घेण्यास मोकळे आहेत.
तसेच सदस्यांनीही सरपंच (प्रतिनिधी) आणि ग्रामसेवकांना सदरील कामाचे महत्व लक्षात आणून देणे शिवाय योग्य तो समन्वय ठेवणे आवश्यक आहे. जनहिताच्या कामात अडवणूक होणार नाही शिवाय जनहिताची कामे जलदगतीने कशी होतील याकडे दोन्ही बाजूने समन्वयाने काम करणे आवश्यक आहे.
ग्रामसेवकाची गैरहजेरी !
कुंभार पिंपळगांव ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ असल्याचे सांगितले जाते, मात्र येथे जर आठवड्यातून फक्त 2 दिवसच ग्रामसेवक येणार असतील तर गावाचा विकास होणार कसा ? एका सदस्याने तर सांगितले की, ग्रामसेवक 10 ते 15 दिवस झाले दिसलेच नाहीत, मग अशी परिस्थिती राहील्यास गावाचा विकास होणार कसा ?
ग्रामसेवक हा शासनाचा प्रतिनिधी असतो, या प्रतिनिधीच्या माध्यमातूनच गावाच्या विकासकामासाठी निधी खर्च होत असतो, प्रशासकीय कामकाज हे ग्रामसेवकाच्या हातातच असते, सरपंच, उपसरपंच किंवा सदस्यांना कोणतेही काम करायचे असेल तर त्यासाठी ग्रामसेवकाची भुमिका महत्वाची आहे, परंतू ग्रामसेवक गावातच येत नसेल तर बाकीच्या गोष्टींना काही अर्थ राहतो का ? हा एक प्रश्न आहे.
ग्रामसेवकाकडे अतिरिक्त चार्ज :-
ग्रामसेवकाकडे इतर एका गावाचा चार्ज असल्याचे सांगितले जाते, याबाबत गटविकास अधिकारी यांना विचारले असता स्वतंत्र ग्रामसेवक देण्याबाबत सरपंचाकडून मागणी नव्हती, जर मागणी आल्यास विचार करू असे सांगितले.
येथे प्रश्न उपस्थित होतो की, गटविकास अधिकाऱ्यांना कुंभार पिंपळगांवची लोकसंख्या माहित नाही का ? जर 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेल्या गावाला 2 दिवस (?) येणारा ग्रामसेवक येणार देण्यात येत असेल तर गावाचा विकास होणार कसा ? एखाद्या अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्याची नेमणूक करण्याचा सर्वस्वी अधिकार गटविकास अधिकाऱ्यांचा असतो, मग त्यांना गावाच्या विकासाचे गांभीर्य नाही का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
गावात काय चाललंय, गावात विकास कामे होत आहेत किंवा नाही ? गावात योजना राबविल्या जात आहे किंवा नाही ? लोकांच्या समस्या सोडवल्या जात आहेत किंवा नाही ? याची प्रत्यक्ष येवून माहिती घेणे गटविकास अधिकाऱ्यांचे कर्तव्य नाही का ? नुसतं खुर्चीवर बसून म्हणजेच उंटावर बसून शेळ्या हाकल्याने प्रश्न सुटणार आहे का ? असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.
योजना व इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.