एल्गार न्यूज :-
मराठा बांधवांनो, मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे, राज्यभरात आरक्षणासाठी समाज आंदोलन, उपोषण करीत आहे. आरक्षण हे सरकारला आज ना उद्या द्यावेच लागेल. त्यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहन यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आहे. एल्गार न्यूजचेही तेच मत आहे.
यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेले आहे की, समाजातील लोकंच जर आत्महत्या करू लागले तर हे आरक्षण घ्यायचं कोणासाठी आणि द्यायचं कोणाला ? अर्थातच हे आरक्षण तुम्हा सर्वांसाठी उपयोगी पडणार आहे आणि त्यासाठी तुम्ही जिवंत असणे आवश्यक आहे.
तुमच्या नंतरची परिस्थिती :-
बांधवांनो, शांतपणे थोडा विचार करा, तुम्ही गेल्यानंतर तुमच्या आई, वडीलांचे, भाऊ, बहीणीचे, पत्नी आणि मुलाबाळांचे काय हाल होतील. याचा अंदाजही तुम्ही बांधू शकत नाही. तुम्ही गेल्या नंतर सरकार मलमपट्टी करण्याच्या उद्देशाने तुमच्या वारसांना पाच दहा लाख रूपये देईल, परंतू त्याने आयुष्य जगता येते का ?
ज्या आई वडीलांनी तुमच्या जन्मापासून स्वत:च्या पोटाला चिमटा घेवून तुमचं पालन पोषण केलं, वेळ प्रसंगी स्वत: उपाशी राहीले, जे तुम्हाला जगवण्यासाठी शेतात राबले, वेळप्रसंगी मोलमजूरी केली, स्वत: काही चांगलं खावसं वाटलं किंवा काही घ्यावंसं वाटलं पण ते घेतलं नाही, कारण त्यांच्यासमोर फक्त आणि फक्त तुम्ही होता.
जेव्हा तुम्हाला छोटंसं मार पण लागायचं तेव्हा तुमच्या आई वडीलांच काळीज बाहेर पडल्यासारखं व्हायचं, लहानपणी तुम्हाला त्यांनी चांगले कपडे घेतले पण स्वत:ला फाटक्या कपड्यातच समाधानी मानलं, स्वप्नांची राख रांगोळी करून तुम्हाला इथपर्यंत आणलं, हे सर्व तुम्ही त्यांच्या खाद्यांवर जावं म्हणून केलंय का ? नक्कीच नाही.
तुमचं लग्न झालेले असेल तर ?
तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तुमच्या पत्नीच्या आई वडीलांनी तुमच्या धर्मपत्नीला विधवा होण्याच्या उद्देशाने तुमच्याशी लग्नगाठ बांधली होती का ? तुमच्या सुख दुखात तुमच्या सोबत उभी असणारी तुमची धर्मपत्नी तुमच्याशिवाय राहू शकेल का ? तुमच्या मुलाबाळाच्या डोक्यावरच पित्याचं छत्र जेव्हा नसेल तेव्हा त्यांची काय अवस्था होईल.
आत्महत्येनंतर सगळं ठीक होईल का ?
तुम्हाला काय वाटतं, जिवंतपणी कोणी कोणाला विचारत नाही, मग तुम्ही गेल्यावर आयुष्यभर तुमच्या आई-वडीलांना, मुला-बाळांना कोणी सांभाळेल का ? सुख दुखात त्यांच्या पाठीशी कोणी उभं राहील का ? अडचणीच्या काळात त्यांना कोणी मदत करेल का ? मुला-मुलींच्या शिक्षणासाठी पैसा कोणी देईल का ? दवाखान्यात कोणी पैसे खर्च करील का ?
नातेवाईक, पाहुणे, मित्र चार दिवस खूप झाले तर महिनाभर लक्ष देतील किंवा काळजी घेतील, परंतू नंतर कोणीही फिरकणार नाही, कारण प्रत्येकाला आपापलं पडलंय, कोणीच कोणाला आयुष्यभर पुरवू शकत नाही. तो फक्त एक पती किंवा वडील किंवा मुलगाच पूरवू शकतो ते म्हणजे तुम्ही.
आरक्षणासाठी तुमची भावना, तुमचा राग, तुमची तळमळ रास्त आहे, पण त्यासाठी आपले जीवन संपवणे हा पर्याय असूच शकत नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या सारखे योद्धे आणि इतर अनेक बांधव राज्यभरात आरक्षणासाठी लढा देत आहेत, तुम्ही काही चुकीचं पाऊल उचलून त्यांचे मनोबल कमी करू नका.
थांबायचं नाही लढायचं !
संकट समोर आहे, प्रश्न गंभीर आहे परंतू यावर आपल्याला मात करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्याला लढायला शिकवलं आहे, संकटाचा मुकाबला पूर्ण ताकदीने आणि विचारपूर्वक करायचा असतो हे त्यांनी आपल्याला शिकवले आहे.
आपण जर स्वत:ला छत्रपतींचे मावळे मानत आहोत, तर मग या युद्धामध्ये तुम्हाला लढावे लागेल, तुमच्या साथीला कोट्यावधी मावळे आहेत, कुठल्याही परिस्थितीत या युद्धात कोणत्याही प्रकारची मनात शंका कुशंका न ठेवता पुढील वाटचाल करीत राहायची, कारण विजय तुमचाच आहे.
परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज
योजना व इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.