एल्गार न्यूज :-
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील कॅनरा बँक शाखेत शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी वारंवार चकरा मारायला लावल्या जात असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
प्रत्यक्ष शेतकऱ्याने फाईल दाखल केल्यास त्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत मात्र त्याच वेळी दलालांमार्फत फाईल केल्यास त्यास तात्काळ प्रतिसाद दिला जात असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून येत आहे.
शेतकऱ्यांनी दिलेले कागदपत्र बँकेतून गहाळ होत असल्याच्याही तक्रारी आहेत. शेतकरी कर्ज प्रकरणासाठी गेल्यास सीबील खराब असल्याचे सांगितले जाते, तसेच वारंवार कागदपत्रांची मागणी केली जाते. यातच शेतकरी बेजार होतात आणि दलांलामार्फत त्यांना काम करावे लागते. दलालांमार्फत गेले तर सीबीलची अडचण येत नाही.
CCTV फुटेज तपासा !
6 महिन्यापांसूनच्या CCTV फुटेज तपासण्यात यावेत आणि यामध्ये शेतकरी कोण आणि दलाल कोण हे लक्षात येईल. मॅनेजर त्यांच्या खुर्चीवर बसत नाही, पडद्यामागून काम चालू आहे. येथे दलालांशिवाय काम होत नाही.
- लालासाहेब शिंदे, शेतकरी, माजी सरपंच व माजी संचालक, कृषि उत्पन्न बाजार समिती.
विनाकारण त्रास !
माझी पीक कर्जाची फाईल मी स्वत: केल्यामुळे माझे पैसे होल्ड केलेले आहेत, मी जर दलाला मार्फत फाईल केली असती तर मला पैसे मिळाले असते.
- विठ्ठल भगवान शिंदे, शेतकरी, श्रीपत धामनगांव
येथे परिसरातील अनेक शेतकरी आहेत जे कर्जासाठी बँकेत चकरा मारत आहेत परंतू त्यांना प्रतिसाद मिळत नाही. इतर ठिकाणचे कॅनरा बँकेचे खाते दलालामार्फत असले तर बँकेला चालते परंतू शेतकरी स्वत: गेल्यास याच शाखेत खाते असण्याची अट घातली जाते.
कोणत्याही पध्दतीने शेतकऱ्यांना बेजार केले जाते, शेतकऱ्याला थकून शेवटी दलांलामार्फत काम करण्यास भाग पाडले जाते. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे काम करण्यास होत असलेली टाळाटाळ आणि शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता या शाखेत नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
ओटीएसच्या नावाचे अमिष :-
पुन्हा कर्ज देवू असे अमिष दाखवून ओटीएसच्या नावाखाली पैसे भरून घेतले जातात, परंतू त्यांना नंतर कर्ज मिळत नाही. शेतकरी इकडून तिकडून आणून पैसे भरत असतो, परंतू त्याला पुन्हा कर्ज दिले जात नसल्याने तो हैराण होतो. अर्थातच ओटीएस म्हणजे काय हेच कळू दिले जात नाही.
रेंज च्या आणि लाईटच्या नावाखाली बँकेत 2 – 2 तास ताळकळत बसवले जाते, बँकेचे गेट अनेकदा बंद असते, दलालामार्फत आल्यास त्याला आतमध्ये घेतले जाते, आणि दलालाशिवाय शेतकरी गेल्यास त्यांना गेटवरूनच वापस पाठवले जाते अशीही शेतकऱ्यांची तक्रार आहे.
दलालांना महत्व :-
शेतकऱ्याने थेट कर्जाची फाईल दाखल केल्यास त्याला अनेक कागदपत्रे कमी असल्याचे सांगितले जाते, मात्र तीच फाईल दलालालामार्फत दाखल केल्यास कमी कागदपत्रातही काम होते असे शेतकरी सांगत आहेत.
होत नसेल तर बदली करावी :-
सदरील शाखा व्यवस्थापक यांना शेतकऱ्यांची कामे दलांलाशिवाय करणे शक्य नसेल तर वरिष्ठांनी या व्यवस्थापकाची येथून बदली करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
वरिष्ठांनी लक्ष द्यावे ?
शेतकरी वारंवार चकरा मारून बेजार होत आहेत, त्यामुळे वरिष्ठांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून येथे सुरू असलेला गैरप्रकार थांबवावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
एल्गार न्यूज पाठपुरावा करणार !
बँक शाखेत दलालांचा हस्तक्षेप वाढल्याचे दिसून येत आहे, शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नसतील आणि दलालांचा सुळसुळाट असाच राहणार असेल तर यापुढेही एल्गार न्यूज आवाज उठवणार आहे.
योजना व इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.