एल्गार न्यूज विशेष :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे उच्च न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता राजरोसपणे डीजे वाजवण्यात येत असल्यामुळे हा उच्च न्यायालयाचा अवमान नाही का ? पोलीस प्रशासन याला जबाबतदार नाही ? असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे.
कुंभार पिंपळगांव येथे कोणताही कार्यक्रम असला की, डीजे हमखास लावण्यात येत आहे, विशेष म्हणजे ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक पटीने आवाज वाढवून अक्षरश: हैदोस घातला जात आहे.
कारण कुंभार पिंपळगांव येथे सगळ्यांना हे लक्षात आले आहे की, पोलीस किंवा प्रशासन मधील कोणताच अधिकारी डीजे लावण्यापासून रोखत नाही, आवाजाची मर्यादा कितीही वाढवली तरी कोणीही आमचे काहीही वाकडे करू शकत नाही अशी त्यांची मानसिकता दिसून येत आहे.
उच्च न्यायालयाचा आदेश :-
नुकतंच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले होते की, ध्वनी प्रदुषण झाल्यास औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील 12 जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आदी प्रतिवादींवर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करण्यात येईल असा सक्त आदेश दिला होता.
औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.रविंद्र घुगे, न्या.वाय.जी.खोब्रागडे यांनी नुकतंच याबाबती आदेश देवून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. आदेश पारीत करतांना खंडपीठाने 16 ऑगस्ट 2016 च्या जनहित याचिकेचा संदर्भ सुध्दा दिला आहे.
ध्वनी तिव्रतेबाबत मानके :-
दिवसा (सकाळी 6 ते रात्री 10 वाजे दरम्यान) औद्योगिक परिसरात 75 डेसीबल आणि रात्री (रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत) 70 डेसीबल पेक्षा तिव्र ध्वनी नसावा.
व्यावसायिक परिसरात दिवसा 65 डेसिबल आणि रात्री 55 डेसिबल पेक्षा जास्त तिव्र ध्वनी नसावा. तर रहीवासी परिसरात दिवसा 55 डेसीबल आणि रात्री 45 डेसिबल पेक्षा जास्त तिव्र ध्वनी नसावा.
शांत परिसरात म्हणजे दवाखाने, शैक्षणिक संस्था, न्यायालये, धार्मिक स्थळे आदींच्या आसपास 100 मिटर परिसरात दिवसा 50 डेसिबल आणि रात्री 40 डेसिबल पेक्षा जास्त तिव्र ध्वनी नसावा अशी मानके उच्च न्यायालयाने घालून दिली आहेत.
उच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांवर कार्यवाही !
उच्च न्यायालयाने आदेश देवूनही न्यायालयाच्या आदेशचे पालन होत नसेल तर हा न्यायालयाचा अवमान समजला जातो, ज्या ठिकाणी या आदेशाचे पालन होणार नाही त्या ठिकाणच्या संबंधित अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे.
डीजेमुळे अनेकांचा मृत्यू !
याआधी डीजेच्या आवाजामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत, म्हणजेच डीजे आता मृत्यूला कारणीभूत ठरू लागले आहे. शिवाय या तिव्र ध्वनी प्रदुषणामुळे बहीरेपणा, चिडचिडेपणा, उच्च रक्तदाब, तणाव, स्मृतिभ्रंष, निद्रानाश, राग, स्वभावात आक्रमकपणा तसेच डिप्रेशनसारखे आजार जडतात.
कुंभार पिंपळगांव सर्व मर्यादा ओलांडल्या !
कुंभार पिंपळगांवात डीजेमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, फक्त मर्यादा ओलांडल्या नाहीत तर अक्षरश: या नियमांची पायमल्ली केली जात आहे. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांच्या अनेक पटीने आवाज वाढवून अक्षरश: हैदोस घातला जात आहे. तरीही प्रशासन किंवा पोलीस कुठलीही कार्यवाही करीत नाही.
वाढदिवशी सुध्दा डीजे !
कुंभार पिंपळगांवात एखादा कार्यक्रम असला तरी डीजे आहेच परंतू आता एखाद्याचा वाढदिवस जरी असला तरी डीजे लावला जात आहे, आवाजाची मर्यादा एवढी वाढवली जात आहे की, अनेक किलोमिटर पर्यंत आवाज ऐकू येईल. अक्षरश: रस्त्यावर हैदोस घातला जात आहे परंतू तरीही पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भुमिका घेत आहे.
आजारी लोकांना त्रास !
रस्त्यावर डीजेचा सुरू असलेला हैदोस एवढा वाढला आहे की, घरात आजारी असणारे वयोवृध्द व्यक्ती, लहान मुले यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, आवाजाची तिव्रता एवढी वाढवली जात आहे की, घरात दुकानात ठेवलेल्या वस्तू सुध्दा खाली पडून नुकसान होत आहे.
डीजेवाल्यांनी मॅनेज केले आहे का ?
मा.न्यायालयाच्या आदेशाची अक्षरश: पायमल्ली केली जात असतांना कुंभार पिंपळगावात कोणतीच कार्यवाही होत नाही, त्यामुळे संबंधित अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला डीजेवाल्यांनी मॅनेज केले आहे का ? असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
एल्गार न्यूजचं मत :-
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून या पुढे कुंभार पिंपळगावात डीजे वाजणार नाही तसेच कायद्याचे पालन होईल याची खबरदारी घ्यावी. कारण तसे न केल्यास तो मा.उच्च न्यायालयाचा अवमान ठरेल.
योजना व इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.