एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
केंद्र सरकारने एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केलेले असून महाराष्ट्रात जवळपास वर्षभरापासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. राज्यभरात अद्याप कोटीच्या घरात वाहने शिल्लक असल्याचे समोर आले असतांना परिवहन विभाग एचएसआरपी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
महाराष्ट्रात कोट्यावधी वाहने आहेत यामध्ये दुचाकी, तिनचाकी, चारचाकी अशी सर्वच प्रकारची वाहने असून सर्वांनाच एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. सदरील नंबर प्लेट बसवण्यासाठी गुजरातच्या एका खाजगी कंपनीला मागील वर्षी कंत्राट देण्यात आले होते. असंख्य वाहनधारकांनी ही नंबर प्लेट बसवली आहे. मात्र खाजगी कंपनीची मनमर्जी तर आहेच, शिवाय वाहनांची संख्या जास्त असल्याने तसेच विविध तांत्रिक कारणांमुळे राज्यातील सर्व वाहनांना अद्यापपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवणे शक्य झालेले नाही.
मुदतवाढ मिळणार का ?
वाहनांची संख्या कोट्यावधीच्या घरात असल्याने परिवहन विभागाने डिसेंबर २०२४ मध्ये मुदतवाढ देवून १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदत वाढवली होती. मात्र राज्यात अद्याप जवळपास १ कोटीच्या आसपास वाहने शिल्लक असल्याचे समोर आले आहे. तरीही परिवहन विभाग १८ फेब्रुवारी पासून एचएसआरपी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे. एचएसआरपी नंबर प्लेट नसणाऱ्यांवर वाहनधारकांकडून १००० रू. दंड घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
कारवाईचा इशारा !
ज्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा परिवहन विभागाच्या वतीने याआधीच देण्यात आलेला आहे. सदरील नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनधारकांची कागदपत्रे तपासली जाणार आहेत, ज्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, इंशुरन्स, पीयूसी, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रे तपासली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रक्रिया कशी ?
वाहनधारकांना परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जावून नोंदणी करावी लागते, यामध्ये वाहनांचा नंबर, इंजिन नंबर, चेसिस नंबर, पत्ता, मोबाईल नंबर टाकावे लागते तसेच एचएसआरपी केंद्र निवडावे लागते, त्यानंतर ऑनलाईन पेमेंट केल्यावर तारीख मिळते, त्या तारखेला जावून नंबर प्लेट बसवून घ्यावी लागते. ऑनलाईन नोंदणी करतांना वाहनाचा प्रकार व अनेक प्रकारची माहिती भरताना गोंधळ होत असल्याचे दिसत आहे. एकूणच नोंदणी प्रक्रिया किचकट स्वरूपाची असून जागोजागी एचएसआरपी केंद्र सुरू करून त्यांच्या माध्यमातून नोंदणी केल्यास ही अडचण दूर होऊ शकते. नसता CSC केंद्रांवर जावून वाहनधारकांना वेगळा चार्ज द्यावा लागेल.
नंबर प्लेटसाठी पैसे किती ?
ऑनलाईन प्राप्त माहितीनुसार मोटरसायकल असल्यास ४५० रू. + १८% GST रू.८१ = ५३१ द्यावे लागतील. तीन चाकी असल्यास ५०० रू. + १८% GST रू.९० = ५९० द्यावे लागतील. चार चाकी वाहन असल्यास ७४५ रू. + १८% GST रू.१३४ = ८७९ द्यावे लागतील. विशेष म्हणजे इतर राज्यात यापेक्षा अर्धे दर सुध्दा नसल्याचे याआधीच स्पष्ट झाले आहे.
सुविधा आहेत का ?
ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी अनेक ठिकाणी केंद्रच उपलब्ध नाहीत. ग्रामीण भागात तर खूप मोठी अडचण आहे, अनेक मोठे सर्कलची गावे अशी आहेत ज्यांना शहराच्या ठिकाणी जावून नंबर प्लेट बसवून घ्यावी लागत आहे. आधी सांगण्यात आले होते की, ऑनलाईन बुकींग करतांना घरपोच नंबर प्लेट बसवून देण्याचा पर्याय देण्यात येईल परंतू मोठ्या गावांचा सुध्दा पिन कोड टाकल्यावर ही सुविधा उपलब्ध नसल्याचे दाखवत आहे.
ग्रामीण भागात मोठी अडचण !
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे असे HSRP केंद्रच नाही, तालुका स्तरावरील केंद्र बंद आहे किंवा ऑनलाईन तालुका स्तरावर केंद्रच दाखवत नाही, त्यामुळे येथील नागरिकांना शहरात जावून नंबर प्लेट बसवून घ्यावी लागत आहे. कुंभार पिंपळगांव पासून अंबडचे अंतर जवळपास ४० ते ४२ कि.मी. आहे. मग वाहनधारकांनी ४० कि.मी.जावून नंबर प्लेट बसवून घ्यायची का ? असा सवाल वाहनधारक उपस्थित करत आहेत. (आता तर अंबडचा पर्याय सुध्दा ऑनलाईन दिसत नाही) घनसावंगी तालुक्यात घनसावंगी, कुंभार पिंपळगांव, तिर्थपुरी अशा महत्वपूर्ण सर्कलच्या शहरात एकही केंद्र नाही हे विशेष. हीच परिस्थिती जालना जिल्ह्यातील इतर तालुक्यांची आहे.
सुविधा फुकट नाही !
संबंधित कंपनी नंबर प्लेट काही फुकट देत नाहीये, शिवाय इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात नंबर प्लेटचे दर दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. शासनाने नंबर प्लेटचे दर कमी करावे, शिवाय प्रत्येक तालुक्यात किमान ४ ते ५ ठिकाणी अशी एचएसआरपी केंद्र सुरू करावीत, शिवाय नोंदणी प्रक्रिया सुध्दा HSRP केंद्रात असावी, जेणेकरून सर्वसामान्य वाहनधारकांना त्रास होणार नाही.
बुकींग फुल !
लाखो वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवून घेतलेली आहे. तरीही वाहनधारक नोंदणी करत नाहीत असे म्हणणे घाईचे ठरेल. कारण डिसेंबर २०२५ मध्ये नोंदणी केलेल्या अनेक वाहनधारकांचे नंबर अद्यापपर्यंत आलेले नाहीत. म्हणजे ऑनलाईन नोंदणी केल्यावर १ ते २ महिन्याची तारीख मिळत आहे. याचाच अर्थ परिवहन विभागाच्या अंतर्गत असलेल्या संबंधित खाजगी कंपनीने अद्याप अनेक ठिकाणी एचएसआरपी केंद्रच सुरू केलेली नाहीत. त्यामुळे शासनाने तोंड दाबून बुक्क्यांचा मार या म्हणी प्रमाणे करू नये.
जालना जिल्ह्यात HSRP केंद्र
जालना शहर :-
१] इंदेवाडी, जालना
२] रामतीर्थ पुलाजवळ, जालना
३] मातोश्री लॉन्स जवळ, जालना
४] महसूल कॉलनी, जालना
५] पानी वेस रोड, जालना
६] प्रियदर्शनी बॅंकेजवळ, जालना
७] डिलक्स लॉज जवळ, जालना
८] प्रियंका मोटर्स, जालना
जालना तालुका :-
१] सेवली
२] रामनगर
बदनापूर तालुका :-
१] जालना – बदनापूर रोड
२] श्रीराम मोटर्स, बदनापूर
भोकरदन तालुका :-
१] सिल्लोड रोड, भोकरदन
२] केदारखेडा,
३] बजाज शोरूम जवळ, राजूर
४] मेन रोड, राजूर
जाफ्राबाद :-
१] हिवाळे पेट्रोल पंपाजवळ, जाफ्राबाद
घनसावंगी तालुका :-
१] रांजणी
परतूर तालुका :-
१] वाटूर फाटा रोड, परतूर
अंबड तालुका :-
१] शहागड
मंठा तालुका :-
१] जालना मंठा रोड, मंठा
परिवहन विभागाने संयामाने घ्यावे !
प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रात अंदाजे १ कोटीपेक्षा जास्त वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे बाकी आहे, त्यामुळे १ कोटी वाहनधारकांवर कारवाई करणार का ? आधी योग्य दरात सुविधा उपलब्ध करून द्या, तांत्रिक अडचणी दूर करा. नियम कायदे जनतेच्या हितासाठी असतात, जनतेला त्रास देण्यासाठी नव्हे ! याचा विचार परिवहन विभागाने आणि शासनाने करणे आवश्यक असून खाजगी कंपनयांची तुंबडी भरण्यासाठी परिवहन विभागाने अततायीपणा करू नये असे मत अनेक वाहनधारकांनी व्यक्त केले आहे.
HSRP केंद्र वाढवले जातील ! – RTO
असंख्य वाहनधारकांनी अद्याप HSRP नंबर प्लेट बसवलेली नाही. केंद्र आणि सुविधा वाढवणे नक्कीच गरजेचे आहे. ज्या कंपनीला HSRP नंबर प्लेट बसवण्याचे कंत्राट देण्यात आलेले आहे, त्या कंपनीचा परवाना मुदतवाढ (Renewal) देण्याबाबत तसेच वाहनधारकांना HSRP नंबर प्लेट बसवण्यास तारखेत मुदतवाढ देण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय प्रलंबित आहे. शासनाने निर्णय घेतल्यास मुदतवाढ मिळू शकते. शिवाय जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात HSRP केंद्र वाढवण्याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात येतील.
चंद्रमोहन चिंतल,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,
(ARTO) जालना.