Your Alt Text

कुंभार पिंपळगांव येथे पुन्‍हा डेंग्‍यूचा रूग्‍ण आढळला ! नागरिकांमध्‍ये संताप !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे डेंग्यूचे रूग्‍ण आढळण्‍याचे सत्र सुरूच असून आता पुन्‍हा एक रूग्‍ण आढळला आहे. काही दिवसांपूर्वी डेंग्यू सदृष्‍य आजारामुळे गावातील एका तरूणाचा मृत्‍यू झाला असून देखील आरोग्‍य विभाग आणि प्रशासनाचे डोके ठिकाणावर आलेले दिसत नाही. त्‍यामुळे नागरिकांमध्‍ये प्रचंड संताप पहायला मिळत आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथील अफजल पठाण यांचा मुलगा रिहान पठाण यास डेंग्‍यू झाला असून त्‍यास उपचारासाठी जालना येथील खाजगी दवाखान्‍यात दाखल करण्‍यात आले आहे. यापूर्वीच अनेक डेंग्यूचे रूग्‍ण आढळूनही गावात आवश्‍यक त्‍या उपाययोजना करण्‍यात आल्‍या नसल्‍याने नागरिकांमधून तिव्र संताप व्‍यक्‍त होत आहे.

आरोग्‍य केंद्रच सलाईनवर !

कुंभार पिंपळगांव येथील आरोग्‍य केंद्राची नवीन इमारत फक्‍त नावापुरतीच राहीली असून आरोग्‍य केंद्रच सलाईनवर असल्‍याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. अतिरिक्‍त जबाबदारी असल्‍याचे सांगून वैद्यकीय अधिकारी जबाबदारी झटकत आहेत तर बहुतांश कर्मचारी गावात राहत नसून अनेकदा कर्मचारी गैरहजर राहत असल्‍याचे नागरिक सांगत आहेत.

एवढंच नव्‍हे तर गेल्‍या अनेक दिवसांपासून बॅटरी नसल्‍याचे कारण सांगून रूग्‍णवाहिका बंद अवस्‍थेत उभी असून प्रसुती आणि इतर रूग्‍णांना सुध्‍दा बऱ्याचदा बाहेर पाठवण्‍यात येत असल्‍याचे नागरिक सांगत आहेत. प्राथमिक आरोग्‍य केंद्रात काही आशा सेविकांचा अपवाद सोडल्‍यास बहुतांश कर्मचारी गैरहजर राहत असून प्राथमिक उपचार सुध्‍दा या केंद्रात मिळत नसल्‍याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

अनेक गावांचे केंद्र !

कुंभार पिंपळगांव हे आसपासच्‍या २५ ते ३० गावांचे केंद्र आहे, स्‍थानिक लोकसंख्‍या जवळपास २० हजाराच्‍या आसपास आहे तर आसपास च्‍या गावातील नागरिकही कुंभार पिंपळगांवला उपचारा निमित्‍त येत असतात, मात्र येथील प्रा.आ.केंद्र शोभेची वस्‍तु बनल्‍याने अर्थातच उपचार मिळत नसल्‍याने कुंभार पिंपळगांवसह परिसरातील नागरिकांना तालुका व जिल्‍हास्‍तरावर जावून उपचार घ्‍यावे लागत आहे.

१०० च्‍या वर डेंग्यू रूग्‍ण ?

गांव व परिसरात मागील दिड ते २ महिन्‍यात जवळपास १०० च्‍या वर डेंग्‍यू रूग्‍ण आढळून आल्‍याचे समोर आले आहे. तरीही आरोग्‍य विभाग व प्रशासनाचे डोके ठिकाणावर यायला तयार नसल्‍याने नागरिकांमध्‍ये संताप दिसून येत आहे. स्‍थानिक पातळीवर कोणतेही उपचार मिळत नसल्‍याने कुंभार पिंपळगांव व परिसरातील नागरिकांना जालना व इतरत्र खाजगी दवाखान्‍यात उपचार घ्‍यावे लागत आहे. अर्थातच आरोग्‍य सेवा सलाईनवर असल्‍याने नागरिकांना नाहक त्रास आणि भुर्दंडही सोसावा लागत आहे.

कुंभार पिंपळगांव वाऱ्यावर !

स्‍वच्‍छतेची जबाबदारी ज्‍या ग्रामपंचायतवर आहे त्‍यांच्‍याकडूनही दुर्लक्ष होत असल्‍याने शिवाय उपाययोजना करण्‍यात येत नसल्‍याने गावात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शिवाय इतर रूग्‍णांची संख्‍याही वाढली आहे. मागील काळात डेंग्‍यू सदृष्‍य आजाराने गावातील एका तरूणाचा मृत्‍यू झाला असतांनाही ग्रामपंचायत आणि आरोग्‍य विभागाला अजूनही जाग आलेली नाही.

ग्रामसेवक निलंबित !

कुंभार पिंपळगांव येथील ग्रामसेवक (ग्रामपंचायत अधिकारी) यांना शेतकरी अतिवृष्‍टी अनुदान घोटाळ्यात निलंबित करण्‍यात आले असून त्‍यांच्‍या जागी इतर ग्रामसेवकाकडे अतिरिक्‍त पदभार देण्‍यात येणार असल्‍याचे कळते, मात्र तुर्तास कुंभार पिंपळगांवला प्रशासन, ग्रामपंचायत आणि आरोग्‍य विभागाने वाऱ्यावर सोडून दिल्‍याचे दिसत आहे.

आरोग्‍य विभाग झोपेत !

कुंभार पिंपळगांव येथे विविध आजाराने जनता त्रस्‍त असतांना तसेच एका तरूण व्‍यापाऱ्याचा डेंग्यू सदृष्‍य आजाराने मृत्‍यू झालेला असतांना देखील आरोग्‍य विभागाला जाग आलेली नाही. आरोग्‍य विभाग अजून कोणाच्‍या मृत्‍यूची वाट पाहत आहे का ? असा सवाल नागरिक करत आहे. वैद्यकीय अधिकारी असो, तालुका आरोग्‍य अधिकारी असो किंवा जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी असो यांना नागरिक वारंवार संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न करतात मात्र फोन लागत नाही किंवा बंद असतो अर्थात त्‍यांचा संपर्क होत नसल्‍याचेही नागरिक सांगत आहेत. त्‍यामुळे आरोग्‍य विभाग किती संवेदनशील आहे हे लक्षात येते.

जिल्‍हा प्रशासन लक्ष घालणार का ?

सदरील प्रकाराबाबत गटविकास अधिकारी समीर जाधव यांनी तालुका आरोग्‍य अधिकाऱ्यांना सूचना केल्‍याचे सांगितले. मात्र एवढे पुरेसे नाही, जिल्‍हाधिकारी आणि जि.प.मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष घालुन जिल्‍हा आरोग्‍य अधिकाऱ्यांना तसेच पंचायत विभागाला गांभीर्याने तात्‍काळ उपाययोजना करण्‍याचे आदेश देणे अत्‍यंत गरजेचे आहे, नसता नागरिकांचा रोष उफाळून येण्‍यास उशीर लागणार नाही. त्‍यामुळेच की काय तात्‍काळ उपाययोजना झाल्‍या नाही तर आरोग्‍य केंद्रास टाळे ठोकण्‍याचा इशारा सुध्‍दा नागरिकांनी दिला आहे.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!