एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात कोट्यावधी रूपयांचा घोटाळा झाल्याचे मागील काळात समोर आले होते, त्यात अनेक तलाठी व महसूल कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले होते, आता घनसावंगी तालुक्यातील ५ ग्रामसेवक (ग्रामपपंचायत अधिकारी) यांना निलंबित करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सन २०२२ ते २०२४ या दरम्यान जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टी, गारपीट सह नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेल्या अनुदानात घोटाळा झाल्याचे मागील काळात समोर आले होते, यामध्ये तहसीलदारांचे लॉगीन आयडी व पासवर्ड वापरून अनेक तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक यांनी अनुदान हडप केल्याचे चौकशी मध्ये समोर आले होते.
५ ग्रामसेवक निलंबित !
सदरील प्रकरणात यापूर्वीच अनेक तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र आता ५ ग्रामसेवक (ग्रामपंचायत अधिकारी) यांना सुध्दा निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्या ग्रामसेवकांमध्ये एस.पी.देवगुंडे, एम.टी.रूपनर, डी.बी.नारळे, एस.जी.चांदणे, एन.डी.बरीदे यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम.मिन्नू यांनी ही कारवाई केली आहे.