एल्गार न्यूज विशेष :-
काही दिवसांपूर्वी एल्गार न्यूजच्या कार्यालयात घुसून काही बेकायदेशीर प्लॉट विक्रेत्यांनी संपादक परवेज पठाण यांना धक्काबुक्की केली होती व कॉम्प्यूटरसह इतर वस्तुंचे नुकसान करून धमक्या दिल्या होत्या. मात्र हल्ला करण्यासाठी आलेल्यांपैकी अनेकांना आता झोप लागत नसून अनेकदा ते झोपेतून दचकून उठत असल्याचे कळते, त्यामुळेच की काय आता त्यांनी २ सन्माननीय व्यक्ती (त्यांच्याविषयी आदरच आहे) च्या माध्यमातून माफी मागितली आहे. झालेला प्रकार हा रागाच्या भरात झाला असल्याचेही त्यांनी मान्य केले. तसेच आमच्यापैकी काही जणांनी संपादकांबद्दल गैरसमज पसरवून बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तो प्रकार सुध्दा आम्हाला मिळालेल्या चुकीच्या माहितीमुळे व गैरसमजुतीमुळे झाल्याचे त्यांनी सन्माननीय व्यक्तींच्या माध्यमातून कबूल केले आहे. असे असले तरी स्वत: सार्वजनिकरित्या माफी मागण्यास त्यांच्यापैकी अनेकांना लाज वाटत आहे तर काही जणांचा अहंकार आडवा येत असल्याचे सुत्रांनी सांगितले.
याबाबत सविस्तर असे की, एल्गार न्यूजचे संपादक परवेज पठाण हे कुंभार पिंपळगाव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथे राहतात, अर्थात त्यांचे हे जन्मगांव आहे. येथे त्यांचे सवेरा डिजिटल हे मल्टिसर्व्हिसेसचे दुकान मागील १९ वर्षांपासून सुरू आहे, त्यातच एल्गार न्यूजचे संपर्क कार्यालय आहे. गावात होत असलेल्या बेकायदेशीर प्लॉटिंग बाबत एल्गार न्यूज मध्ये दि.२५ ऑगस्ट रोजी बातमी प्रकाशित झाली होती. या गोष्टीचा राग मनात धरून दुसऱ्याच दिवशी दि.२६ रोजी संपादक परवेज पठाण हे ऑफीस मध्ये एकटेच असतांना ३० ते ४० जणांचा जमाव (सर्व जण स्वधर्मीय) ऑफीस मध्ये घुसला, काही बोलण्याआधीच त्यातील ४ ते ५ जणांनी अरेरावी करत दादागिरीची भाषा केली, तुम्ही बातमी का घेतली, तुम्ही प्लॉटिंगचा विषय SDM, तहसीलदार आणि BDO यांच्यापर्यंत का नेला ? त्यांची प्रतिक्रिया का घेतली ? तुमच्या बातम्यांमुळे आमचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होवू शकते, या प्लॉटिंगवर १०० च्या वर लोक अवलंबून आहेत, आता आम्ही सहन करणार नाही, तुम्हाला गावात राहू देणार नाही, असे सांगून धक्काबुक्की केली, ऑफीस मधल्या सामानाची नासधूस करून नुकसानही केले, यामध्ये कॉम्प्यूटरच्या मॉनिटरचे नुकसान झाले, कॉम्प्यूटरच्या अनेक केबल तुटल्या, विद्युत बोर्डातल्या पीन तूटून पडल्या, काही काचा फुटल्या. सदरील लोक हे संपादकांवर जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशानेच आले होते हे त्यांच्या कृत्यातून आणि रागाच्या भरात बोलण्यातून स्पष्ट दिसत होते.
यावेळी संपादक आणि प्लॉटिंगवाल्यांमध्ये बाचाबाची झाल्याने, तसेच सदरील प्रकार अचानक घडल्यानंतर परिसरातील लोकांनाही नेमकं काय झालं हे समजेनासे झाले होते. ऑफीस मार्केट मध्येच असल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ऑफीसकडे धाव घेवून जमावाला बाहेर काढले आणि संपादक परवेज पठाण यांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला.
मान्यवरांकडून विनंती !
सदरील प्रकार साधारण दुपारच्या वेळेस झाला, त्यानंतर सायंकाळपर्यंत गाव, परिसरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी संपादक परवेज पठाण यांची भेट घेवून कोणतेही कायदेशीर पाऊल उचलू नये, राग शांत करावा, संयमाने विषय हाताळावा अशी वारंवार विनंती केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून अक्षरश: अनेकांनी हात जोडून विनंती केली. त्यामुळे सर्व मान्यवरांनी केलेल्या विनंतीला मान देवून कोणतेही कायदेशीर पाऊल उचलण्यात आले नाही. दुसऱ्या दिवशी झालेल्या हल्ल्याची बातमी प्रकाशित केल्यानंतर जिल्ह्यासह राज्यातून कॉल करून अनेक मान्यवर मित्रांसह पत्रकार बांधवांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत, कोणतीही मदत लागल्यास किंवा कायदेशीर पाऊल उचलायचे असल्यास आम्ही सोबत असल्याचे कळवले. घटनेचा प्रचंड संताप असला तरी स्थानिक मान्यवर व मित्रांनी वारंवार केलेल्या विनंतीला मान देवून कायदेशीर पाऊल उचलण्यात आले नाही.
बदनामीचा प्रयत्न !
मुख्य विषय होता बातमीचा, धक्काबुक्की करून किंवा धमकावून जास्त फरक पडला नसल्याचे लक्षात आल्यानंतर सदरील प्लॉट विक्रेत्यांपैकी अनेकांनी काही तरी मागणी केल्याचा आरोप करून बदनामीचा प्रयत्न केला, परंतू स्थानिक सर्व नागरिकांना याची पूर्ण कल्पना आहे की, सर्व प्रकार बातमीमुळेच झालेला आहे. (बातमी यापूर्वी सुध्दा आली होती) आणि संपादकांचा १७ वर्षांचा स्वच्छ रेकॉर्ड सुध्दा समस्त नागरिकांना माहित आहे.
तरीही माहितीस्तव विचार केल्यास, कोणीही सामान्यत: ३ प्रकारे मागणी करू शकतो, एक तर थेट कॉल द्वारे, दुसरे म्हणजे स्वत: भेटून आणि तिसरे म्हणजे एखाद्या मध्यस्था मार्फत मागणी करू शकतो, परंतू या तिन्ही पर्यायापैकी कोणत्या माध्यमातून मागणी केली हे ते सांगू शकले नव्हते. अर्थातच असे काहीच घडलेले नाही. (तंत्रज्ञानाचे युग आहे तपास करता येईल.) मात्र लोकं प्रश्न विचारू लागल्याने या विक्रेत्यांनी स्वत:च्या बाजूने काही तरी बोलावे म्हणून बदनामी करण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला. खरं तर मराठीत एक म्हण आहे की, “बाप दाखव नाही तर श्राध्द घाल” परंतू नैतिकतेची अपेक्षा कोणाकडून करावी हा सुध्दा प्रश्न आहे.
चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न !
संपादकांना अडचणीत आणण्यासाठी या लोकांनी किती भयंकर चक्रव्युह रचला होता हे त्यांनी मॅनेज केलेल्या लोकांकडे पाहून लक्षात येते. हल्ला करण्यासाठी आलेल्यांपैकी ९९ % हे प्लॉटिंगशी संबंधित होते. (प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विक्रेते, फायनान्सर, एजंट होते) जे छूपे रुस्तूम असतात ते सुध्दा घटनेच्या वेळी दिसून आले, एवढंच नव्हे तर अक्षरश: पोलीस चौकीला ३ ते ४ दिवस असे काही प्रकरण घडले हे माहित नसावे हे आश्चर्यकारकच आहे. हल्ला झाला त्यावेळी ऑफीसच्या खाली अनेकजण उभे होते, त्यापैकी अनेकजण सांगत आहेत की, आम्ही फक्त काय झालं म्हणून पाहत उभे होतो आणि काही जास्त झालं असतं तर आम्ही सोडवायला येणार होतो. किती हास्यास्पद म्हणायचे हे… एवढंच नव्हे तर हल्ला झाल्यानंतर पत्रकारिता क्षेत्रातील एक व्यक्ती स्थानिक पत्रकार ग्रुप (यात मोजक्याच व्यक्ती होत्या) मध्ये पुढील पाऊल उचलण्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेचे स्क्रीनशॉट काढून हल्लेखोरांना पाठवत होता. (अर्थातच गद्दारी) मात्र यानिमित्ताने आपले कोण परके कोण हे लक्षात आले.
१७ वर्षांचा रेकॉर्ड तपासावा !
संपादकांनी एल्गार न्यूज सुरू करण्याआधी विविध वर्तमानपत्रात असतांना असो किंवा स्वत:चे एल्गार न्यूज सुरू केल्यानंतर असो, एकाही व्यक्तीकडून एक पैसाही घेतला असेल तर कोणीही सांगावे, एवढंच नव्हे तर मागील १७ वर्षात गाव ते जिल्हा कोणताही अधिकारी असो त्यांनी सांगावे, मग तो १७ वर्षातील ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, कृषि मंडळ अधिकारी, तहसीलदार, एसडीएम, बीडीओ, बांधकाम विभाग किंवा तालुका व जिल्हा स्तरावरील कोणत्याही कार्यालयातील कोणताही अधिकारी असो किंवा पोलीस विभागातील PSI, API, PI, Dy.SP किंवा कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी असो, किमान एकाने तरी सांगावे की त्यांच्याकडून कधी काही मागणी केली किंवा कधी काही घेतले असेल, एवढंच नव्हे तर १७ वर्षात मटका, गुटखा, गांजा, पत्ते, दारू, वाळू अशा अवैध धंद्यापैकीही कोणीही सांगावे की त्यांच्याकडून १ पैशाचीही कधी मागणी केली आहे का ? कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीने सांगावे. संपादक कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहेत.
जाहिरातींचा पुरावा !
मागील १७ वर्षात ज्यांनी स्वखुशीने जाहिरात दिली त्याच जाहीराती प्रकाशित करण्यात आल्या आहेत, दोन वर्षापूर्वी एल्गार न्यूज सुरू केल्यापासून आजपर्यंत सुध्दा विविध सन्माननीय राजकीय नेते, पक्ष-संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, व्यावसायिक, मित्र मंडळी इत्यादी मान्यवरांनी स्वखुशीने दिलेल्या जाहीराती प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत आणि सर्व जाहिरातींचे पुरावे, डिझाईन, प्रकाशित केलेली तारीख इत्यादी सर्व पुरावे उपलब्ध आहेत.
लोकशाही मान्य आहे का ?
खरं तर ज्यांना बातमीचा त्रास झाला ते लोक गावातील ज्येष्ठ मंडळी, नातेवाईक किंवा मित्र मंडळींच्या माध्यमातून त्यांना काय त्रास होतोय किंवा त्यांचे काय म्हणणे आहे हे त्यांच्या धर्माच्या शिकवणीनुसार (जर धर्म कळत असेल तर) आणि नियम कायद्याच्या चौकटीत बोलू शकले असते. परंतू जमाव करून थेट ऑफीस मध्ये घुसून जो काही प्रकार करण्यात आला आहे, तो नियम कायद्याची पायमल्ली करणारा असून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. कदाचित लोकशाही म्हणजे काय याचा अर्थ या टोळक्यातील लोकांना अजूनही कळाला नसेल.
संभाषणच नाही !
ज्या व्यक्तीने धक्काबुक्की केली त्याला कमी वेळेत अरबपती व्हायचे असावे, त्यामुळे बेकायदेशीर प्लॉटिंगच्या व्यवसायातून जिकडे तिकडे पार्टनर होत असून आता धमक्या आणि गुंडगिरीची भाषा करत आहे. हाच व्यक्ती आहे ज्याने धक्काबुक्की केली, या व्यक्तीला संपादक किमान १० वर्षांपासून बोलत सुध्दा नाही किंवा १० वर्षात दोघांची कधीही भेटही झालेली नाही, अर्थातच दोघांचे संभाषणच १० वर्षांपासून बंद आहे मग पैसे मागण्याचा संबंध काय ? अर्थातच हा सर्व प्रकार म्हणजे बातमी घेतल्याने राग काढण्याच्या उद्देशानेच बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हा प्रकार म्हणजे एक प्रकारे मानहानीच आहे. संपादकांना गैरमार्गाने पैसेच कमवायचे असते तर १७ वर्षात किमान एखाद्या कोटीची बिल्डींग बांधायला काहीच अडचण नसती. मात्र संपादकांनी इमानदारीचाच मार्ग निवडला ज्यामुळे पत्रकारितेवर आजपर्यंत एकही डाग लागलेला नाही, मात्र याच इमानदारीचा पुरस्कार अशा प्रकारे मिळेल हे अपेक्षित नव्हते.
कट कुठे शिजला !
खरं तर (स्वधर्मीय) धार्मिक स्थळात प्रार्थना आणि धार्मिक गोष्टींशिवाय इतर कोणत्याही गोष्टीची चर्चा करू नये, बोलू नये असे धार्मिकदृष्ट्या स्पष्ट सांगितलेले आहे आणि तसे फलक सुध्दा प्रार्थना स्थळाच्या आत लावले आहेत, मात्र ज्या दिवशी बातमी प्रकाशित झाली त्याच दिवशी सायंकाळी प्लॉट विक्रेत्यांची बैठक येथील प्रार्थना स्थळाच्या गेटच्या आत झाली, साधारण २० ते २५ प्लॉट विक्रेते या बैठकीत असल्याचे कळते. मग प्रश्न उपस्थित होतो की, या पवित्र ठिकाणी पत्रकारावर हल्ला करण्याचा कट शिजला का ? जर असे असेल तर या लोकांचे डोके ठिकाणावर होते का ? असं म्हणायची वेळ आली आहे.
धंदा १ नंबर की २ नंबर ?
हल्ला करण्यासाठी आलेल्यापैकी एक जण म्हणत होता की, आमचा व्यवसाय २ नंबरचा आहे का ? तर भारतीय कायद्याच्या कक्षेत नियमान्वये कोणताही व्यवसाय केला तर तो १ नंबर मध्ये येतो, परंतू तोच व्यवसाय भारतीय कायद्या विरूध्द असेल तर तो २ नंबरच्या कक्षेत येतो. उदाहरणच द्यायचे झाल्यास दारूचे दुकान परवाना घेवून सुरू केले तर ते नियमान्वये असते, परंतू तेच जर विनापरवाना सुरू केले तर ते २ नंबरच्या कक्षेत येते. या विक्रेत्यांनी गाव ते जिल्हा कोणाकडून परवानगी घेतली आहे हे त्यांनी सांगावे. किंवा गांव ते जिल्हा कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव सांगावे जे सांगेल की सध्या जे सुरू आहे ते १ नंबर किंवा नियम व कायद्यान्वयेच आहे.
असे करून धार्मिक कार्य करणार का ?
ज्या धर्मात दुसऱ्यांना (मग तो कोणत्याही समाजाचा असो) कुठलाही त्रास होणार नाही, कोणाचीही हानी होणार नाही, कोणाचेही मन दुखावणार नाही असे वागा हे स्पष्ट सांगितलंय, त्याच धर्मातील लोक स्वधर्मीय व्यक्तीलाच धक्काबुक्की करत असतील, हल्ला करत असतील, ऑफीसची नासधुस करत असतील, नुकसान करत असतील तर या व्यक्ती धर्माचा पालन करत आहेत का ? असे कृत्य करून धार्मिक कार्यासाठी जाणार का ? असे कृत्य करून कोणत्या तोंडाने धर्माचा उपदेश करणार ? असे कृत्य करून विदेशात धार्मिक कार्यासाठी जाता येते का ? भारतीय कायद्याच्या विरूध्द केलेला कोणताही व्यवसाय २ नंबरच्या श्रेणीत येतो, मग २ नंबरचे धंदे करून जमा केलेला पैसा धार्मिक कार्यासाठी चालतो का ? धक्काबुक्की, अरेरावी, नासधूस आणि अहंकाराची भाषा करून हे लोक समाजासमोर काय उदाहरण ठेवत आहेत. असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
कायद्याचे राज्य !
५० लोकंच काय, १००, २०० आणि त्यापेक्षाही जास्त लोकं गोळा करून नियम कायदे पायदळी तुडवले म्हणजे कायद्यातून सूट मिळत नाही. हल्ल्याच्या वेळी संपादकांना गावातून बाहेर काढण्याची भाषा कोणीतरी केली होती. त्याच्या बापाने, आजोबा, पंजोबाने गाव विकत घेतलेलं आहे का ? किंवा गावावर बापाची, आजोबा, पंजोबाची मालकी आहे का ? याचेही उत्तर मिळणे गरजेचे आहे. गांव असो किंवा शहर, जिल्हा असो किंवा राज्य, येथे छत्रपती शिवाजी महाराज, फुले- शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेला कायदा चालतो. कायद्यान्वये प्रत्येकाला बोलण्याचा, लिहीण्याचा आणि व्यक्त होण्याचा अधिकार आहे. येथे लोकशाही असून कोणाचीही दडपशाही चालणार नाही. कोणी कितीही ताकदवान किंवा श्रीमंत असला तरी त्याला कायद्यानेच वागावे लागेल. हम करे सो कायदा येथे चालणार नाही.
खोट्या गुन्ह्याचा पण कट ?
संपादकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा सुध्दा या रताळ्यांचा कट होता अशी माहिती मिळाली, परंतू यदाकदाचित असे झाले असते, तर इतरांच्या प्रयत्नाचं माहित नाही पण संपादकांनी स्वत:हून जामीन साठी मुळीच प्रयत्न केले नसते. खुशाल आत मध्ये जावून बसले असते. मात्र बाहेर आल्यावर कायद्यान्वयेच योग्य तो कार्यक्रम नक्कीच हाती घेतला असता, तेव्हा माफीचा विषयच राहिला नसता, कारण असं म्हटलं जातं की, जख्मी वाघ जास्त घातक असतो.
हीच का तुमची मर्दानगी !
ज्या माणसाने घर जाळून कोळशे करत आयुष्यातील १७ वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून सर्व समाजासाठी दिली, ज्याने अनेक अडचणी असतांनाही कधीही कुठलीही अपेक्षा केली नाही, जो कोणत्याही समाजासाठी नेहमी तत्पर राहीला, नि:पक्ष, निर्भीड व रोखठोकपणे सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढला, एवढे दुख भोगले की त्याची सीमा नाही. त्याच्यावर हल्ला करायला या टोळक्याला लाज का वाटली नाही ? एकटा माणूस ऑफीस मध्ये असतांना ३० ते ४० जणांचा जमाव करून जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने धक्काबुक्की करणे, अरेरावी करणे, नासधुस व नुकसान करणे, धमक्या देणे हे शौर्य आहे की गुंडगीरीचं प्रदर्शन ? हीच का त्यांची मर्दानगी ? हा सुध्दा प्रश्न उपस्थित होतो.
हल्ला करणाऱ्यांना भितीचा मुळव्याध !
कुठेतरी शायरी ऐकली होती की… जिनके घर शिशे के होते है, वो दूसरो पर पत्थर मारा नही करते, और जो बारूद के ढेर पर बैठे होते है वो चिंगारीयों से खेला नही करते… मात्र अक्कली गहान ठेवलेल्या रताळ्यांना पैशांचा एवढा माज आणि अहंकार होता की, त्यांना नियम कायदे काहीच सुचलं नाही आणि ते नको ते करून बसले. घटना होवून एवढे दिवस झाले असले तरी अनेकांचा भितीचा मुळव्याध वारंवार उठत असून ते झोपेतून दचकून उठत असल्याचे कळते. माफी कोणी मागावी किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतू सार्वजनिकपणे हल्ला करायचा आणि एकांतात दुसऱ्याच्या माध्यमातून माफी मागून मोकळं व्हायचं हे चालणार नाही. खरंच पश्चाताप झाला असता तर (प्रत्यक्ष शक्य नसेल तरी) किमान गाव परिसरातील सोशल मीडियातील ग्रुप मध्ये माफी मागितली असती.
कोणाच्या जीवावर उड्या ?
हल्लेखोर कोणाच्या जीवावर उड्या मारत होते याची कल्पना नाही, परंतू एखाद्या नेत्याच्या / पदाधिकाऱ्याच्या जीवावर उड्या मारत असतील तर समजुतदार नेता / पदाधिकारी असल्या बेकायदेशीर कृत्याला, दादागिरीला, दहशत माजवणाऱ्यांना आणि नियम कायदे पायदळी तुडवणाऱ्यांना पाठीशी घालणार नाहीत. वाटलेच तर एखादा नेता / पदाधिकारी तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेईल परंतू जळत्या आगीत ते हात घालणार नाहीत. आणि यदाकदाचित तसे काही असेल तर येत्या काळात पडद्यामागील ती व्यक्ती सुध्दा समोर येईलच.
..तर रस्ते सापडले नसते !
ज्या दिवशी कार्यालयात हल्ला झाला त्या दिवशी सदरील जमाव संपादकांना खाली बोलावून मारहाण करणार होता अर्थात जमावाची तशी मानसिकता होती हे नंतर कळाले, परंतू जर यदाकदाचित असे झाले असते तर ही त्या सर्वांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरली असती. अर्थातच कायद्यानेच या रताळ्यांची अशी अवस्था झाली असती की कुणीकडं पळावं म्हणून त्यांना रस्ते सापडले नसते आणि त्यांचा बेकायदेशीर व्यवसाय तर कायद्यानेच नावाला सुध्दा शिल्लक राहिला नसता. यावेळेस सुध्दा त्यांना मोठी चपराक बसणार होती, परंतू सर्व मान्यवरांच्या विनंतीचा मान ठेवावा लागला. झालेला प्रकार पहिला आणि शेवटचा सर्वांनी समजावा, यापुढे धक्काबुक्कीचा तर विषयच सोडा, कोणत्याही प्रकारे त्रास, बदनामी, दबाव, धमकी असे काहीही करण्याचा प्रयत्न केल्यास चुकीला माफी नसेल आणि भारतीय कायद्यानुसार कठोरात कठोर आवश्यक ते सर्व कायदेशीर पाऊल उचलण्यात येतील यात तिळमात्र शंका नाही.
समाज मागे का राहीला ?
हल्ला करणाऱ्यासाठी आलेल्या जमावातील स्थानिक लोकांकडे पाहिल्यानंतर समाज मागे का राहिला याची प्रचिती पुन्हा आली. समाजाला विशेष करून (स्वधर्मीय) समाजाला शिक्षणाची आवश्यकता का आहे हे पुन्हा अधोरेखित झाले.
एवढं सविस्तर लिहायची गरज काय ?
खरं तर जनतेला संपादकांवर आणि त्यांच्या पत्रकारितेवर पूर्ण विश्वासच नव्हे तर खात्री आहे त्यामुळे स्पष्टीकरण द्यायची गरज नव्हती, ही बातमी किंवा आर्टीकल शेअर करण्याची सुध्दा आवश्यकता नव्हती, परंतू एक म्हण आहे की, “सत्य चप्पल घालुन तयार होईपर्यंत खोटं गांवभर हिंडून आलेलं असतं.” त्यामुळे नाईलाजाने माहितीस्तव हा विषय मांडावा लागत आहे.
पत्रकारिता मर्यादित !
संपादक परवेज पठाण यांना शिक्षण व अनुभवाच्या जोरावर मोठ्या किंवा मेट्रो शहरांमध्ये संधी असतांनाही संपादकांनी गावातच राहून लेखणीच्या माध्यमातून आतापर्यंत सर्व जाती धर्माच्या हजारो नागरिकांना न्याय मिळवून दिला. हजारो प्रश्नांवर आवाज उठविला, ज्या विषयाला कोणी हात लावत नव्हते ते विषय मांडले. (ग्रामीण पत्रकारांना शासनाचा कुठला पगार किंवा लाभ नसतो.) १७ वर्षे आयुष्याची, स्वप्नांची राखरांगोळी झाली. घर जाळून कोळशे करीत सर्व समाजासाठी निष्पक्ष, निर्भीड व रोखठोक पत्रकारिता करत असतांना मागील १७ वर्षात अनेक संकटे, अडचणींना सामोरे जावे लागले, तरीही न डगमगता सडतोडपणे रेकॉर्डब्रेक बातम्या घेतल्या. परंतू हल्ला झाल्यानंतर तालुक्यासह जिल्हा आणि राज्यभरातून विचारणा झाली, मदतीसाठी कॉल आले, कुठलेही सहकार्य करण्याची अनेकांनी भावना व्यक्त केली, मात्र विशेष करून ज्या गांव परिसर व तालुक्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी हा लढा सुरू होता, तीच जनता (काही अपवाद सोडून) हल्ला झाल्यावर फक्त बघ्याची भूमिका घेणार असेल, साधा कॉल करण्यासही त्यांना वेळ मिळत नसेल तर लढायचं कोणासाठी ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
एक म्हण आहे की, जिथं पिकतं तिथं विकत नाही, तसाच काही प्रकार म्हणावा लागेल. पत्रकारिता सुटणार नाही किंवा सोडणारही नाही, तो आयुष्याचा अविभाज्य अंग बनला आहे, परंतू यापुढील काळात पत्रकारिता मर्यादित (Limited) करून मुलाबाळांच्या भवितव्याकडे लक्ष देणे, उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून वाटचाल करणे आणि थोडा वेळ कुटुंबासाठी देणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे यापूर्वी संपादकांनी (१७ वर्षे) जसा वेळ दिला त्याप्रमाणे यापुढील काळात वेळ देण्याची अपेक्षा जनतेने ठेवू नये हीच माफक अपेक्षा.
जय हिंद, जय महाराष्ट्र…