Your Alt Text

कुंभार पिंपळगाव व परिसरात कोट्यावधीची बेकायदेशीर प्‍लॉटिंग ! SDM, तहसीलदार, BDO चौकशी करणार !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे सगळे नियम कायदे धाब्‍यावर बसवून कोट्यावधी रूपयांची बेकायदेशीर प्‍लॉटिंग काढून विक्री केली जात आहे. आश्‍चर्य म्‍हणजे सदरील बेकायदशीर प्‍लॉटिंगचा आकडा हा 100 कोटींच्‍या वर असल्‍याचे दिसत आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव व लगतच्‍या परिसरात जवळपास 25 ते 30 ठिकाणी बेकायदेशीर प्‍लॉटिंग काढण्‍यात आली आहे. गंभीर बाब म्‍हणजे अपवाद सोडल्‍यास कोणीही एन.ए. केलेले नाही अथवा शासनाची परवानगी घेतलेली नाही. सदरील प्‍लॉटिंगचा आकडा हा 100 कोटींच्‍या वर असल्‍याचे दिसत आहे.

गावाच्‍या चारही बाजुला प्‍लॉटिंग !

घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव व गावालगत कोट्यावधी रूपयांची बेकायदेशीर प्‍लॉटिंग झाली आहे आणि अजूनही सुरूच आहे. यामध्‍ये अंबड रोड, आष्‍टी रोड, एसबी शाळेजवळ, आष्‍टी रोडवरील मुर्ती फाटा व पेट्रोलपंप जवळ, गावातील झोपडपट्टीच्‍या मागे, नुतन वसाहतच्‍या मागे, राजाटाकळी रोड, भेंडाळा रोड, कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या जवळचा परिसर, तिर्थपुरी रोड, आझाद नगर मधून मागे जाणारा पांदन रस्‍ता, अरगडे गव्‍हाण रोड, बस स्‍थानक परिसर अशा अनेक ठिकाणी नियम कायदे धाब्‍यावर बसवून कोट्यावधीची बेकायदेशीर प्‍लॉटिंग काढण्‍यात आली आहे.

नियमांची पायमल्‍ली !

शहर असो किंवा ग्रामीण भाग असो, जो पर्यंत एन.ए. केले जात नाही म्‍हणजेच शासनाची परवानगी घेतली जात नाही तो पर्यंत प्‍लॉटिंग काढता येत नाही, विनापरवानगी प्‍लॉटिंग काढल्‍यास ती बेकायदेशीर असते आणि सदरील प्‍लॉटिंग काढणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, परंतू सगळे नियम कायदे धाब्‍यावर बसवून कोणाचीही भिती न बाळगता येथे सर्रासपणे प्‍लॉटिंग काढून प्‍लॉट विक्री केले जात आहेत.

धाक राहिला नाही का ?

बेकायदेशीर प्‍लॉटिंग काढून प्‍लॉट विकणारे विक्रेते हे कधी रोख पैसे देवून खरेदीची व्‍यवहार करत आहेत तर बहुतांश वेळा काही पैसे अॅडव्‍हान्‍स देवून शेतकऱ्याकडून किमान 1 वर्षानंतर पैसे देण्‍याचा करार करून जमीन ताब्‍यात घेत आहेत आणि सदरील जमिनीवर मनमर्जीप्रमाणे उभ्‍या आडव्‍या रेषा मारून प्‍लॉटिंग काढून प्‍लॉट विक्री करत आहेत. अनेकवेळा तर असेही प्रकार होत आहेत की, जमीन शेतकऱ्याच्‍याच नावावर आहे, आणि प्‍लॉटिंगवाल्‍याच्‍या नावावर जमीन ट्रान्‍सफर झालेली नसतांनाही प्‍लॉटिंग काढून प्‍लॉट विक्री केले जात आहेत. विशेष म्‍हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्‍लॉटिंग काढणारे ठिकठिकाणी जमिनी खरेदी करत असल्‍याने त्‍यांच्‍याकडे एवढा पैसा येतोय कुठून ? आणि त्‍यांचा फायनान्‍सर कोण ? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

ग्रामसेवकाचा आशीर्वाद !

सदरील बेकायदेशीर प्‍लॉटिंगला कुंभार पिंपळगांव येथील ग्रामसेवक (ग्रा.पं.अधिकारी) यांचा विशेष आशीर्वाद आहे यात शंका नाही. कारण सर्वात आधी बेकायदेशीर प्‍लॉटिंगच्‍या प्‍लॉटची बेकायदेशीर नोंद ग्रामपंचायतला केली जात आहे. त्‍यानंतर हे प्‍लॉट रजिस्‍ट्री ऑफीस मध्‍ये चहापानी करून नोंद केले जात आहेत. सदरील ग्रामसेवक हे सांगत आहेत की, आम्‍ही फक्‍त ग्रामपंचायतला कर भरणा करून घेत आहोत, परंतू त्‍यांच्‍या बोलण्‍यामुळे वस्‍तुस्थिती बदलत नाही, कारण ग्रामपंचायतला नोंद केल्‍यानंतरच रजिस्‍ट्रीची प्रक्रिया पुढे राबवली जात आहे. म्‍हणजे सुरूवात ग्रामपंचायत पासूनच होत आहे.

प्‍लॉटिंगवाल्‍यांचा कॉन्फिडन्‍स !

बेकायदेशीर प्‍लॉटिंग काढून प्‍लॉट विक्री करणारे विक्रेते हे प्‍लॉट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना किंवा प्‍लॉट बद्दल विचारणा करणाऱ्या लोकांना सांगत आहेत की, आम्‍ही खालपासून वर पर्यंत सगळे मॅनेज केले आहे, त्‍यामुळे चिंता करण्‍याची आवश्‍यकता नाही. अर्थातच पाणी कुठं तरी मुरतंय, कदाचित त्‍यामुळेच प्‍लॉटिंगवाल्‍यांना एवढा कॉन्फिडन्‍स आला असावा.

रजिस्‍ट्री ऑफीसची भूमिका संशयास्‍पद !

सदरील बेकायदेशीर प्‍लॉटिंगवाले ग्रामपंचायत स्‍तरावर ग्रामसेवक यांच्‍यासोबत मॅनेजमेंट झाल्‍यावर रजिस्‍ट्री ऑफीस (दुय्यम निबंधक कार्यालय) येथे प्‍लॉटची रजिस्‍टी करून देत आहेत. रजिस्‍ट्री ऑफीसला साधारणपणे कोणीही विचारणा केल्‍यास रजिस्‍ट्री बऱ्याच दिवसापासून बंद असल्‍याचे सांगितले जाते, परंतू अंधारातून घेणं-देणं करून कार्यक्रम फत्‍ते केला जात आहे. विशेष म्‍हणजे अनेकदा संबंधित अधिकारी 2 / 4 दिवस सुट्टीवर गेल्‍यावर त्‍या काळात मोठ्या प्रमाणात रजिस्‍ट्री होत असल्‍याचे सुत्रांनी सांगितले.

SDM, तहसीलदार, BDO चौकशी करणार !

याबाबत अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्‍याशी संपर्क साधला असता सदरील प्रकाराबाबत माहिती घेण्‍यात येईल व तथ्‍य आढळल्‍यास चौकशी करण्‍यात येईल असे त्‍यांनी सांगितले. तर घनसावंगीच्‍या प्र.तहसीलदार मोनाली सोनवणे यांच्‍याशी संपर्क साधला असता कोणकोणत्‍या गटात अशा प्रकारची प्‍लॉटिंग काढण्‍यात आली आहे ही माहिती घेण्‍यात येईल तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांच्‍या माध्‍यमातून चौकशी करून योग्‍य ती कार्यवाही करण्‍यात येईल असे त्‍यांनी सांगितले. तर विषय ग्रामपंचायतशी सुध्‍दा संबंधित असल्‍याने गटविकास अधिकारी समीर जाधव यांच्‍याशी संपर्क साधला असता याबाबत नक्‍कीच चौकशी करण्‍यात येईल व संबंधितांना स्‍पष्‍टीकरण मागितले जाईल असे त्‍यांनी सांगितले.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!