Your Alt Text

कुं.पिंपळगांव व परिसरात १००+ कोटींची बेकायदेशीर प्‍लॉटिंग !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
सगळे नियम कायदे धाब्‍यावर बसवून १०० कोटींपेक्षा जास्‍त किमतीची बेकायदेशीर प्‍लॉटिंग काढली जात असेल आणि प्‍लॉटिंग करणाऱ्यांना कोणाचाही धाक राहिला नसेल तर त्‍यांना नेमका आशीर्वाद आहे तरी कोणाचा ? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव आणि परिसरात बेकायदेशीर प्‍लॉटिंगचा ऊत आला आहे, जिकडे नजर फिरवाल तिकडे बेकायदेशीर प्‍लॉटिंग दिसून येत आहे. आश्‍चर्य म्‍हणजे अपवाद सोडल्‍यास कोणीही एन.ए. केलेले नाही. जवळपास ३० ते ४० ठिकाणी ही बेकायदेशीर प्‍लॉटिंग काढण्‍यात आली आहे. सदरील प्‍लॉटिंगचा आकडा हा १०० ते २०० कोटींच्‍या घरात असल्‍याचे बोलले जात आहे.

गावाच्‍या चारही बाजूला प्‍लॉटिंग !

कुंभार पिंपळगांवात सध्‍या शेकडो कोटी रूपयांची बेकायदेशीर प्‍लॉटिंग सुरू आहे. यामध्‍ये अंबड रोड, आष्‍टी रोड, एसबी शाळेजवळ, आष्‍टी रोडवरील मुर्ती फाटा व पेट्रोलपंप जवळ, गावातील झोपडपट्टीच्‍या मागे, नुतन वसाहतच्‍या मागे, राजाटाकळी रोड, भेंडाळा रोड, कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या जवळचा परिसर, तिर्थपुरी रोड, आझाद नगर मधून मागे जाणारा पांदन रस्‍ता, अरगडे गव्‍हाण रोड, बस स्‍थानक परिसर अशा अनेक ठिकाणी नियम कायदे धाब्‍यावर बसवून शेकडो कोटींची बेकायदेशीर प्‍लॉटिंग काढण्‍यात आली आहे.

नियम काय ?

जो पर्यंत तहसील आणि जिल्‍हा प्रशासनाची रितसर परवानगी घेतली जात नाही आणि एन.ए. केले जात नाही तो पर्यंत कुठलीही प्‍लॉटिंग काढताच येत नाही, परंतू कुंभार पिंपळगांव आणि परिसरात शेकडो कोटींची बेकायदेशीर प्‍लॉटिंग राजरोसपणे काढून विक्री केली जात आहे. बहुतेकवेळा असे दिसून येत आहे की, एखाद्या शेतकऱ्याला थोडेफार पैसे अॅडव्‍हान्‍स दिले जात आहे आणि लगेचच प्‍लॉट पाडून विक्री करण्‍यात येत आहे.

पैसा येतोय कुठून ?

कुंभार पिंपळगावात कोट्यावधीची प्‍लॉटिंग सुरू असल्‍यामुळे हा पैसा आलाय कुठून ? अर्थात फायनान्‍सर कोण आहेत ? पार्टनर कोण कोण आहेत ? कुंभार पिंपळगांव व परिसरात बेकायदेशीर प्‍लॉटिंगचा एवढा मोठा नेटवर्क निर्माण झाला कसा ? असे अनेक प्रश्‍न सर्वसामान्‍य नागरिकांना पडले आहेत.

दलालांचा नेटवर्क ?

सदरील प्‍लॉटिंगवाल्‍यांनी बेकायशीर प्‍लॉटिंग काढून काही एजंट किंवा दलाल हाताशी धरले आहेत, या एजंटच्‍या माध्‍यमातून गांव व परिसरातील नागरिकांना प्‍लॉट विक्री केले जात आहे. भविष्‍यात प्‍लॉटचे भाव दुप्‍पट होतील असे अमिष दाखवून राजरोसपणे प्‍लॉट विक्री केली जात आहेत.

आशिर्वाद कोणाचा ?

प्‍लॉटिंगवाले चालता फिरता सहज एखाद़्या जमिनीचा सौदा करत असून त्‍यानंतर सर्वात महत्‍वाची भूमिका हे ग्रामसेवक पार पाडत आहेत, अर्थात दक्षणा घेवून बेकायदेशीर प्‍लॉटची ग्रामपंचायतला नोंद करण्‍यात येत आहे. प्‍लॉटिंगवाल्‍यांनी येथील ग्रामसेवक (ग्रा.पं.अधिकारी) यांच्‍यावर अशी काही जादू केली आहे की, रात्री झोपेतून उठवलं तरी ते प्‍लॉटिंगवाल्‍यांचे प्‍लॉट ग्रामपंचायतला नोंद करण्‍यास मागे पुढे पाहणार नाही अशी परिस्थिती आहे.

प्रशासन गप्‍प का ?

कुंभार पिंपळगांव व परिसरात नियम कायदे धाब्‍यावर बसवून शेकडो कोटींची बेकायदेशीर प्‍लॉटिंग सुरू असतांना प्रशासन गप्‍प का ? एन.ए. न करता सर्रास प्‍लॉटिंग काढून विक्री केली जात असतांना तहसील प्रशासन बघ्‍याची भूमिका का घेत आहे ? तलाठी आणि मंडळ अधिकारी गप्‍प का ? महसूल प्रशासनाची प्‍लॉटिंगवाल्‍यांसोबत काही डील झाली आहे का ? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

चौकशी होणार का ?

कुंभार पिंपळगांव व परिसरातील शेकडो कोटींची बेकायदेशीर प्‍लॉटिंग कोणाच्‍या आशिर्वादाने सुरू आहे ? प्‍लॉटिंग कोणत्‍या आधारावर झाली आहे ? मागील ५ ते ६ वर्षात झालेल्‍या बेकायदेशीर प्‍लॉटिंगला जबाबदार कोण ? ग्रामसेवक यांनी कोणत्‍या आधारावर ग्रामपंचायतला प्‍लॉटची नोंद केली आहे ? रजिस्‍ट्री ऑफीसने सदरील प्‍लॉटिंग पैकी अनेक प्‍लॉट्सची नोंद कोणत्‍या आधारावर केली आहे ? असे अनेक प्रश्‍न स्‍थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. त्‍यामुळे तहसील प्रशासन आणि जिल्‍हा प्रशासन कुंभार पिंपळगांव व परिसरात ज्‍या गट नंबर मध्‍ये बेकायदेशीर प्‍लॉटिंग झाली आहे त्‍या सर्वांची सखोल चौकशी करणार का ? ज्‍या अधिकाऱ्यांनी प्‍लॉटिंगवाल्‍यांना पाठीशी घातलं त्‍यांचीही चौकशी करून कारवाई होणार का ? हेच पाहणे महत्‍वाचे ठरणार आहे.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!