Your Alt Text

कुं.पिंपळगावात २० लाखांची चोरी ! घनसावंगी पोलीस ठाण्‍याचा कारभार म्‍हणजे… “जागते रहो, हमारे भरोसे मत रहो !”

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्‍ह्यातील घनसावंगी पोलीस ठाणे अंतर्गत विविध गावांमध्‍ये वारंवार होत असलेल्‍या चोऱ्या पाहता व्‍यापारी व शेतकऱ्यांसह सर्वसामान्‍य जनतेने नेमकी अपेक्षा ठेवायची कोणाकडून ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. घनसावंगी पोलीस ठाण्‍याकडून कुंभार पिंपळगांव व परिसराला वाऱ्यावर सोडून देण्‍यात आले असून यंत्रणा निष्‍क्रीय झाल्‍याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील ज्ञानेश्‍वर मधुकर दहीवाळ यांचे मुख्‍य बाजारपेठेतील बस स्‍थानक रोड वर ज्ञानेश्‍वर ज्‍वेलर्स नावाने सोने-चांदीचे दुकान आहे. सीसीटीव्‍ही फुटेज नुसार सदरील दुकानात दि.२३ रोजी पहाटे ३.४२ ते ४ वाजेच्‍या दरम्‍यान मोठी चोरी झाली आहे. FIR नुसार दुकानातून सोने व चांदीचे दागिने मिळून अंदाजे १९ लाख ७६ हजार ५०० रूपयांची चोरी झाली आहे. म्‍हणजेच जवळपास २० लाखांची चोरी झाली आहे.

सीसीटीव्‍ही फुटेज नुसार ३.४२ ते ४ वाजेच्‍या दरम्‍यान ४ अज्ञात चोरटे दुकानाच्‍या गेटचे कुलुप व शटरच्‍या लॉकपट्ट्या तोडून दुकानात प्रवेश करून सदरील सोने व चांदीचे दागिने पिशवीमध्‍ये चोरून घेवून जातांना दिसत असल्‍याचे FIR मध्‍ये नमूद करण्‍यात आले आहे. सकाळी घटना घडल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर पोलीसांना माहिती मिळाल्‍यावर पोलीसांनी पंचनामा करून उशीरा FIR दाखल केली आहे, सीसीटीव्‍ही मध्‍ये चोरटे कार मधून आल्‍याचे दिसत आहे, शिवाय कुंभार पिंपळगावात अनेक ठिकाणी सीसीटीव्‍ही कॅमेरे लागलेले आहेत, त्‍यामुळे मनातून आणि प्रामाणिकपणे तात्‍काळ तपास केला तर तपास नक्‍कीच लागू शकतो. मात्र आतापर्यंतचा अनुभव पाहता तपास केव्‍हा लागेल आणि तपास मनातून होईल किंवा नाही, काहीच सांगता येत नसल्‍याची तिखट चर्चा नागरिकांमध्‍ये होत आहे.

पोलीसांचा धाक उरला नाही !

कुंभार पिंपळगाव व परिसरात वारंवार होत असलेल्‍या चोरीच्‍या घटना पाहता चोरट्यांना पोलीसांचा कुठलाही धाक राहीलेला दिसत नाही. उलट चोरटे घनसावंगी पोलीसांना वारंवार आव्‍हान देत असल्‍याचे दिसत आहे. परंतू तरीही घनसावंगी पोलीसांना किंवा पोलीस निरीक्षकांना काहीही फरक पडत नसल्‍याचे दिसत आहे. व्‍यापारी असो, शेतकरी असो किंवा सर्वसामान्‍य नागरिक असो, हतबल होवून आपली बर्बादी होतांना पाहत आहेत.

शेतातून मोटारी गायब !

घनसावंगी पोलीस ठाणे अंतर्गत कुंभार पिंपळगांव, मुर्ती, राजुरकर कोठा, नागोबाची वाडी, नाथनगर इत्‍यादी परिसरातून सातत्‍याने मोठ्या प्रमाणात पाण्‍याच्‍या मोटारी शेतातून गायब होत असल्‍याचे अर्थात चोरी होत असल्‍याचे शेतकरी सांगत आहेत, प्राप्‍त माहितीनुसार एका मोटारीची किंमत २० ते ३० हजार असल्‍याचे सांगितले जात आहे. तसेच मोटारीचे महागडे वायर सुध्‍दा वारंवार गायब होत आहे. आतापर्यंत असंख्‍य शेतकऱ्यांच्‍या मोटारी चोरीला गेल्‍या आहेत. शेतकऱ्यांनी वेळोवेळी स्‍थानिक पोलीसांकडे तक्रारी केल्‍या परंतू अपवाद सोडल्‍यास कोणाच्‍याच मोटारीचा तपास लागत नसल्‍याचे शेतकरी सांगत आहेत. वारंवार शेतातून मोटारी चोरीला जात असल्‍याने शेतकरी हतबल झाले असून अक्षरश: रडकुंडीला आहेत, परंतू तरीही घनसावंगी पोलीस ठाण्‍याकडून तपास न करता नुसती बघ्‍याची भूमिका घेण्‍यात येत असल्‍याने पोलीस ठाण्‍याविषयी शेतकऱ्यांमध्‍ये तर्कवितर्क लावले जात आहेत.

वाहन चोरीचे काय ?

कुंभार पिंपळगांव व परिसरातून यापूर्वी चोरी गेलेल्‍या अनेक मोटारसायकलचे काय झाले ? आतापर्यंत चोरीला गेलेल्‍या दुचाकी पैकी किती सापडल्‍या ? आतापर्यंत कोणाला अटक केली ? तपास केला की फक्‍त कागदी घोडे नाचवले ? असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. कारण अपवाद सोडल्‍यास चोरीला गेलेल्‍या मोटारसायकल सापडल्‍याच नाहीत. विशेष म्‍हणजे अनेक चोरीच्‍या प्रकरणात सीसीटीव्‍ही फुटेज उपलब्‍ध होते परंतू तरीही शोध लागू शकला नाही किंवा शोध लावण्‍यात आला नाही.

यापूर्वीच्‍या घटनांचे काय ?

कुंभार पिंपळगांव परिसर असो किंवा घनसावंगी पोलीस ठाण्‍या अंतर्गत येणारे गाव असो, आता पर्यंत किती घटना घडल्‍या ? आतापर्यंत किती दुकानांमध्‍ये चोरी झाली ? किती घरांमध्‍ये चोरी झाली ? शेतातील मोटार किंवा साहित्‍य चोरीच्‍या किती घटना घडल्‍या ? आणि त्‍यापैकी किती घटनांचा तपास लागला किंवा किती आरोपींना अटक केली ? याची आकडेवारी वरिष्‍ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घ्‍यावी म्‍हणजे त्‍यांना घनसावंगी तालुक्‍यात काय गोंधळ सुरू आहे ? काय तमाशा सुरू आहे ? याचा अंदाज येईल अशी भावना सुध्‍दा स्‍थानिक नागरिकांनी व्‍यक्‍त केली आहे.

खरंच चोरांची माहिती नाही का ?

घनसावंगी पोलीस ठाण्‍या अंतर्गत वारंवार चोरीच्‍या घटना घडत असतांना तपासच लागत नसल्‍यामुळे आता नागरिक पोलीस ठाण्‍याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले आहेत. शिवाय घनसावंगी पोलीस ठाण्‍यास खरंच या चोरट्यांची माहिती नाही का ? असा सवाल सुध्‍दा करू लागले आहेत. बऱ्याचदा तर चोरीच्‍या घटनांची नोंदच होत नाही, केली जात नाही किंवा जाणीवपूर्वक टाळली जाते अशी प्रतिक्रिया सुध्‍दा स्‍थानिक शेतकरी व नागरिक देत आहेत.

नावापुरती पोलीस चौकी !

कुंभार पिंपळगांव येथे नावापुरती एक पोलीस चौकी आहे, कुंभार पिंपळगांव हे जवळपास २० हजार लोकसंख्‍येचे गांव आहे, शिवाय सर्कल मध्‍ये २० ते २५ गावे आहेत. तरीही चौकीतील २ ते ३ कर्मचाऱ्यांवर कुंभार पिंपळगांवसह परिसरातील गावांची कायदा व सुव्‍यवस्‍था आहे. अर्थातच या कर्मचाऱ्यांना सुध्‍दा अर्थपूर्ण कामे असतात त्‍यामुळे बऱ्याचदा चौकीला कोणीही नसते. अपवाद सोडल्‍यास पोलीसांची गाडी सुध्‍दा या भागात दिसत नाही. अर्थातच कुंभार पिंपळगांव व परिसरातील नागरिकांनी आपापलं बघून घ्‍यावं आणि स्‍वत:ची रक्षा स्‍वत: करावी असा त्‍याचा अर्थ होतो.

पोलीस निरीक्षकांचे दुर्लक्ष !

घनसावंगी पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक राठोड हे जॉईन होवून अनेक महिने उलटले, परंतू ते तालुक्‍यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्‍या कुंभार पिंपळगांव येथे किती वेळेस आले याची माहिती वरिष्‍ठांनी घ्‍यावी. माहिती मिळत नसेल तर त्‍यांचे मोबाईल लोकेशन तपासावे म्‍हणजे जॉईन झाल्‍यापासून ते किती वेळेस कुंभार पिंपळगांवला आले याची माहिती वरिष्‍ठांना मिळेल. अर्थातच नुसतं उंटावर बसून शेळ्या हाकण्‍याचे प्रकार घनसावंगी पोलीस ठाणे प्रमुखांकडून करण्‍यात येत असल्‍याचे स्‍थानिक शेतकरी व नागरिक सांगत आहेत.

शेतकरी असो, व्‍यापारी असो किंवा सर्वसामान्‍य नागरिक असो कोणी फोन केला तर फोन घेत नाही, चुकून फोन उचलला तर नीट बोलत नाही. विनंती केली तरी कुंभार पिंपळगांव परिसरात फिरकत नाही. त्‍यांची वागणूक उपकार केल्‍यासारखी दिसत आहे, त्‍यामुळे वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी सबंधित पोलीस निरीक्षक राठोड यांना सेवा बजावण्‍यासाठी पाठवले आहे की उंटावर बसून शेळ्या हाकण्‍यासाठी पाठवले आहे असा प्रश्‍न शेतकरी, व्‍यापारी व नागरिकांना पडला आहे. आश्‍चर्य म्‍हणजे अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे हे सुध्‍दा पोलीस निरीक्षकांच्‍या पावलावर पाऊल टाकत वाटचाल करत असल्‍याचेही नागरिक सांगत आहेत.

जागते रहो, हमारे भरोसे मत रहो !

घनसावंगी पोलीस ठाणे हे Detection ऐवजी Collection केंद्र बनले आहे. घनसावंगी पोलीस ठाण्‍या अंतर्गत कुंभार पिंपळगांसह परिसरात वारंवार चोरीच्‍या घटना घडत असून चोरीच्‍या घटनांचा तपास होतांना दिसत नाही. चोरट्यांना पकडून मुद्देमाल परत मिळवल्‍याची घटना दुर्मिळ झाली आहे. वारंवार चोरीच्‍या घटना घडत असतांना गांभीर्याने तपास केला जात नाही, अर्थात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्‍यामुळे घनसावंगी पोलीस ठाण्‍याची भूमिका म्‍हणजे “जागते रहो, हमारे भरोसे मत रहो !” अशीच काही झाल्‍याची प्रतिक्रिया सुध्‍दा अनेक शेतकरी, व्‍यापारी व नागरिकांनी दिली आहे. त्‍यामुळे पालकमंत्री, आमदार, खासदार, पोलीस अधिक्षक या गंभीर प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देतात की ते सुध्‍दा दुर्लक्ष करतात हेच पाहणे महत्‍वाचे ठरणार आहे.



इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!