एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्ह्यातील अंबड ते आष्टी या महामार्गावर नेहमीच अपघात होवून निष्पाप नागरिकांचे जीव जात असल्याने या महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जिवीतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अपघातांची संख्या वाढली !
अंबड ते आष्टी हा महामार्ग पाचोड (जि.छत्रपती संभाजीनगर) येथून सुरू झालेला आहे. पाचोड ते अंबड, घनसावंगी, कुंभार पिंपळगांव, आष्टी असा हा महामार्ग आहे. पुढे हाच महामार्ग पाथरी (जि.परभणी) पर्यंत जातो. सदरील महामार्ग झाल्याने प्रवासाची गती वाढली आहे, परंतू नियमांची पायमल्ली करून अनेकजण बेजबाबदारपणे वाहने चालवत असून वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांच्या जिवीतेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
विशेष करून अंबड ते कुंभार पिंपळगांव – आष्टी या महामार्गावर सातत्याने अपघात होवून नागरिकांचे जीव जात आहेत. कधी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांची धडक होवून कोणाचा जीव जात आहे तर कधी रात्रीच्या वेळेस रस्त्यावरच लावलेल्या वाहनाला किंवा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वाराचा जीव जात आहे.
निष्पाप नागरिकांचे बळी !
एखादा वाहनधारक सरळ आपल्या मार्गाने जात असला तरी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनधारकाच्या अक्षम्य चुकीमुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. रस्त्यावर कोठेही मोठमोठ्या गाड्या, ट्रक, ट्रॅक्टर, जीप, कार इत्यादी वाहन लागलेले असतात. वाहनांचे इंडिकेटर बंद करून ही वाहने रोडवर उभी केलेली असतात, तसेच ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला कुठल्याही प्रकारचे लाल स्टीकर किंवा इशारा देणारे पडदे सुध्दा लावलेले नसतात, ज्या कालावधीत ऊसाचे कारखाने सुरू असतात त्या कालावधीत तर ट्रॅक्टरच्या ट्रॉली या रस्त्यावर हमखास उभ्या दिसून येतात. मागील काळात अशाच वाहनांना किंवा ट्रॉलीला धडकून अनेक दुचाकीस्वाराचा किंवा नागरिकांचा जीव गेलेला आहे.
मृत्यूची संख्या जास्त !
हा महामार्ग झाल्यापासून आतापर्यंत जेवढे अपघात झालेत त्यापैकी अपवाद सोडल्यास बहुतांश जख्मी व्यक्तीचा मृत्यूच झालेला आहे. विशेष करून मोटारसायकल किंवा दुचाकीला झालेल्या अपघातात मृतांचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.
महामार्गावर अनेक गावे !
अंबड पासून ते आष्टी या महामार्गावर अनेक गावे आहेत, काही ठिकाणी शाळा किंवा महाविद्यालय सुध्दा आहे, अशा वेळी आवश्यक त्या ठिकाणी वाहनाची गती थोडी कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. रस्ता एक्सप्रेस असला तरी त्यासाठीही नियम आहेत आणि विशेष म्हणजे माणुसकी नावाची काही गोष्ट आहे की नाही ? १० मिनिट उशीराने पोहोचल्याने काही फरक पडत नाही, पण त्यामुळे अपघाताची शक्यता कमी होवून स्वत:चीही रक्षा होते आणि इतरांचाही जीव वाचू शकतो.
अनेक कुटुंब उध्वस्त !
अपघात होवून एखाद्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तो कुटुंब उध्दवस्त होत असतो. त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. मरण पावलेला व्यक्ती कुणाचा पती असतो, कुणाचा मुलगा असतो, कुणाचा बाप असतो तर कुणाचा भाऊ असतो. मात्र नियम कायदे पायदळी तुडवून वाहन चालवणाऱ्यांना या गोष्टींचे भान राहीलेले दिसत नाही. अर्थातच शासन, प्रशासनाने कठोर भूमिका घेवून बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांवर आणि नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय या अपघातांचे प्रमाण कमी होणार नाही.
उपाययोजना करणे आवश्यक !
या महामार्गावर नियमांची पायमल्ली करून बेजबाबदारपणे भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. विशेष करून दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक झाले आहे. वेळोवेळी या महामार्गावर नियमापेक्षा जास्त गतीने चाहने चालवणाऱ्यांवर कारवाई होणे आणि वाहनांची तपासणी होणे सुध्दा गरजेचे झाले आहे, शिवाय अशा महामार्गांवर दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करणे आणि नियमांबाबत जनजागृती करणे सुध्दा आवश्यक आहे. तसेच रस्त्यालगत शाळा, महाविद्यालय, गांव असल्यास लहान आकाराचे सौम्य का असेना गतिरोधक बसवणे सुध्दा आवश्यक आहे. अर्थातच वाहनचालकांनी सुध्दा नियमांचे पालन केल्यास आणि योग्य ती काळजी घेतल्यास अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होवू शकते. रस्ते चांगले होत आहेत, वाहनांना आधीपेक्षा अधिक गतीही मिळाली आहे, परंतू नियमांचे पालन करणे सुध्दा अत्यंत गरजेचे आहे, कारण जीव सर्वात महत्वाचा आहे.