एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील जवळपास ३५ ते ४० वर्षे जुनी पाण्याची टाकी कोसळण्याची दाट शक्यता असून यामुळे सदरील पाण्याच्या टाकीला लागूनच असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील पोलीस चौकीच्या बाजूला, नुतन वसाहत जि.प.शाळेलगत असलेली पाण्याची टाकी अत्यंत जिर्ण अवस्थेत उभी आहे, गांवकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील पाण्याची टाकीला ३५ ते ४० वर्षे झालेले आहेत. सदरील पाण्याच्या टाकीला तडे गेले असून जिर्ण झालेली ही टाकी केव्हा कोसळेल काही सांगता येत नाही.
टाकी लगतच शाळा !
सदरील पाण्याची टाकी परिसरातील पाणी पुरवठ्यासाठी ग्रामपंचायतकडून वापरण्यात येत होती, मात्र टाकीतून होत असलेली गळती, जीर्ण झालेली अवस्था आणि खूप जुनी झाल्यामुळे ग्रामपंचायतने यामध्ये पाणी भरणे बंद केले होते, परंतू तरीही संकट टळलेले नाही. सदरील पाण्याच्या टाकी लगत म्हणजे अवघ्या २० फुट अंतरावरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, सदरील शाळेतील लहान लहान मुले टाकी लगत किंवा टाकीच्या खाली असलेल्या जागेत खेळतात. त्यामुळे दुर्दैवाने जर पाण्याची टाकी कोसळल्यास मोठी जिवीत हानी होवू शकते.
अंगणवाडी व दवाखाना !
सदरील पाण्याच्या टाकी लगत जि.प. शाळा तर आहेच, परंतू बाजूलाच अंगणवाडी सुध्दा आहे, ज्यामध्ये सुध्दा लहान चिमुकले मोठ्या प्रमाणावर येत असतात, त्यांच्याही जिवीतेला धोका आहे, शिवाय बाजूलाच पशुवैद्यकीय दवाखाना सुध्दा आहे. म्हणजेच गोल सर्कल मध्ये शाळा, अंगणवाडी व पशुवैद्यकीय दवाखाना आहे व टाकीला लागूनच एका बाजूने रस्ता सुध्दा गेलेला आहे, त्यामुळे ही टाकी सर्वच दृष्टीने धोकादायक बनली आहे.
शाळेकडून पूर्वकल्पना !
सदरील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या जिल्हा परिषद शाळेकडून ग्रामपंचायतला गेल्यावर्षी आणि त्याआधी सुध्दा कळविण्यात आलेले आहे, परंतू अद्याप त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. एवढंच नव्हे तर घनसावंगी पाणी पुरवठा विभाग घनसावंगी आणि पंचायत समिती पातळीवर यांना सुध्दा पाण्याची टाकी बाबत कल्पना आहे, परंतू वरिष्ठ पातळीवरून सुध्दा दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
ग्रामसेवकांचे दुर्लक्ष !
कुंभार पिंपळगांव येथील ग्रामसेवक (ग्रा.पं.अधिकारी) यांना सदरील पाण्याच्या टाकीबद्दल सर्वकाही माहित आहे, कारण ते जवळपास ५ वर्षांपासून गावाची अहोरात्र सेवा (?) करत आहेत, पण दुसऱ्या गावात किंवा शहरात राहून ही सेवा सुरू आहे. ग्रामपंचायतने वरिष्ठांच्या समन्वयाने ही टाकी आतापर्यंत पाडणे आवश्यक होते, परंतू ग्रामपंचायत कडून स्वत:ची जबाबदारी झटकून वरिष्ठांकडे बोट दाखवण्यात आल्याने आतापर्यंत मुहूर्त लागलेला नाही.
यंत्रणेला केव्हा जाग येणार ?
सदरील शाळेजवळ असलेल्या व खिळखिळी झालेल्या पाण्याच्या टाकीमुळे केव्हाही दुर्घटना होवू शकते किंवा कुणाचा जीव सुध्दा जावू शकतो. त्यामुळे ग्रामपंचायत किंवा संबंधित यंत्रणेला कुणाचा जीव गेल्यावर जाग येणार का ? दुर्दैवाने पाण्याची टाकी कोसळून जिवीत हानी झाल्यास याची जबाबदारी कोणाची ? संबंधित प्रशासन दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.