एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे नुकतेच समोर आले होते, या प्रकरणी घनसावंगी मतदारसंघाचे आमदार डॉ.हिकमत उढाण यांनी सदरील मुद्दा विधानसभेत उचलल्यानंतर सदरील बालविकास प्रकल्प अधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यात अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. भरती प्रक्रियेत अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचा आरोप करून काही महिलांनी नुकतंच उपोषण केले होते. महिला व बाल कल्याण अधिकारी कोमल कोरे यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमून चौकशी केली होती. गैरप्रकारात एका अंगणवाडी सेविकाचाही सहभाग आढळून आल्याने त्या सेविकेवर कारवाई करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोप असलेल्या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.
याबाबत घनसावंगी मतदारसंघाचे आमदार डॉ.हिकमत उढाण यांनी विधानसभेत मुद्दा उचलल्यानंतर राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी सदरील बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद डाबेराव यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे सांगितले. शिवाय या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात येत असल्याचेही सांगितले. तुर्तास बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना निलंबित करण्यात आले असले तरी विभागीय चौकशी मध्ये अजून कोण कोण दोषी आढळतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.