Your Alt Text

कोणत्‍याही वादापेक्षा महाराष्‍ट्र मोठा, दोन दशकानंतर राज व उद्धव ठाकरे एकत्र ! ऐतिहासिक व भावनिक क्षण !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
महाराष्‍ट्रासह दिल्‍ली पर्यंत चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला आणि राज ठाकरे व उध्‍दव ठाकरे यांचा मराठीच्‍या मुद्यावर असलेला संयुक्‍त मेळावा आज दि.५ रोजी प्रचंड उत्‍साहात संपन्‍न झाला. या मेळाव्‍याच्‍या निमित्‍ताने जवळपास २० वर्षानंतर दोघे भाऊ एकत्र आल्‍याचे भावनिक क्षण आज राज्‍यातील जनतेला पहायला मिळाले.

तुमची सत्‍ता विधानभवनात, आमची सत्‍ता रस्‍त्‍यावर – राज ठाकरे

खरं तर मोर्चा निघायला पाहिजे होता, मराठी माणूस कसा एकवटतो याचे चित्र पहायला मिळाले असते. नुसत्‍या मोर्चाने सरकारला माघार घ्‍यावी लागली. आजचा मेळावा हा शिवतीर्थावर व्‍हायला पाहिजे होता परंतू पावसामुळे हे शक्‍य झाले नाही. कोणत्‍याही वादापेक्षा महाराष्‍ट्र मोठा म्‍हणून उध्‍दव ठाकरे आणि मी एकत्र आलो आहे असे राज ठाकरे यांनी भाषणात सांगितले.

पुढे बोलतांना राज ठाकरे म्‍हणाले की, आम्‍हाला एकत्र आणायचं बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, कुणालाच जमलं नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांना ते जमलं. आजच्‍या मेळाव्‍याला घोषणा हीच आहे की, कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा आहे. तुमच्‍याकडे विधानभवनात सत्‍ता आहे आमच्‍याकडे रस्‍त्‍यावर सत्‍ता आहे. मराठीकडे कोणी वाकड्या नजरेने पहायचे नाही असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

आता सगळे तुम्‍ही मराठी म्‍हणून एकत्र आला आहात, त्‍यामुळे आता पुढे जातीपातीचे राजकारण सुरू होईल. मात्र जातीपातीच्‍या राजकारणात पडू नका. नुकतंच कुणाला तरी मारलं म्‍हणता, पण अजून तर काहीच केलं नाही, विनाकारण मारामारी करत नाहीत, मात्र जास्‍त डोकं लावलं तर कानाखाली आवाज काढला जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

आमच्‍या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्‍वाचं ! – उद्धव ठाकरे

आजच्‍या मेळाव्‍याची घोषणा झाल्‍यानंतर सगळ्यांचं लक्ष आमच्‍या भाषणाकडे आहे. मात्र आमच्‍या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्‍वाचं आहे. आम्‍ही आता एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्‍यासाठी. मधल्‍या काळात मी आणि राज यांनी त्‍या नतदृष्‍ट्यांचा अनुभव घेतलाय, वापरायचं आणि फेकायचं हे त्‍यांचे काम आहे. मात्र आता आम्‍ही दोघं त्‍यांना फेकून देणार आहोत असे उद्धव ठाकरे यांनी भाषणा मध्‍ये सांगितले.

पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्‍हणाले की, मराठी माणूस न्‍याय मागत असेल आणि तुम्‍ही त्‍याला गुंड म्‍हणत असाल तर आम्‍ही गुंड आहोत. सात पिढ्या उतरल्‍या तरी हिंदीची सक्‍ती करू देणार नाही. तुमच्‍या डोक्‍यावर बाळासाहेबांचा हात नसता तर तुम्‍ही कुठे असता ? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी सत्‍ताधाऱ्यांना केला.

बाळासाहेबांची इच्‍छा पूर्ण !

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून स्‍वतंत्र पक्ष स्‍थापन केल्‍यानंतर शिवसेनाप्रमुख स्‍व.बाळासाहेब ठाकरे यांची कायम इच्‍छा होती की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, परंतू त्‍या काळात हे शक्‍य झाले नाही. मात्र आता मराठीच्‍या मुद्यावर का असेना दोन्‍ही भाऊ एकत्र आल्‍याचा ऐतिहासिक क्षण जवळपास २० वर्षानंतर महाराष्‍ट्रातील तमाम जनतेला पहायला मिळाला. आज झालेल्‍या या मेळाव्‍यात दोन्‍ही भाऊ एकत्र येवून भेटत असल्‍याचे चित्र पाहून उपस्थितांपैकी अनेकांचे डोळे भरून आल्‍याचे पहायला मिळाले.

दोघांचे मनोमिलन !

मराठीच्‍या मुद्यावर मेळाव्‍याच्‍या निमित्‍ताने दोघे एकत्र आले असून दोघांनी पुढील वाटचाल एकत्रित करण्‍याचे संकेत दिले आहेत, अधिकृतपणे तशी घोषणा झालेली नसली तरी दोघांनी एकत्रितपणे पुढील वाटचाल करावी अशी राज्‍यातील जनतेची भावना असल्‍याची प्रतिक्रिया अनेकांनी व्‍यक्‍त केली आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!