Your Alt Text

प्रशासनाने कुंभार पिंपळगावला सोडले वाऱ्यावर ! घरोघरी कचरा साचून अळ्या पडल्‍या ! ग्रामपंचायत समोर सुध्‍दा कचऱ्याचे ढीग !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
वारंवार मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्‍यात येत असेल, वारंवार अन्‍याय होत असेल आणि वारंवार त्रास सहन करावा लागत असेल तरीही समाज शांतपणे अन्‍याय सहन करून तमाशा पाहत बसत असेल तर नागरिकांना नेमकं झालंय काय असा प्रश्‍न पडल्‍याशिवाय राहत नाही.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथील ग्रामसेवक (ग्रा.पं.अधिकारी) यांनी गावाला वाऱ्यावर सोडून दिलं आहे. एक तर ग्रामसेवक ८ ते १५ दिवस गावात फिरकत सुध्‍दा नाहीत, कधी आलेच तर मर्जीतल्‍या लोकांचे कामे करून पळ काढतात. गावाबाहेर, धाब्‍यावर, हॉटेलमध्‍ये किंवा घनसावंगीला बोलावून घेणं-देणं करून खिसे गरम होत असल्‍याने गावात येण्‍याची त्‍यांची मानसिकता राहीलेली नाही, मात्र त्‍यांच्‍या या कृतीमुळे गावात अनेक समस्‍या निर्माण झाल्‍या असून नागरिकांचे आरोग्‍य सुध्‍दा धोक्‍यात आले आहे. तरीही घनसावंगी पंचायत समिती किंवा जिल्‍हा परिषद प्रशासन गावाकडे दुर्लक्ष करत असल्‍याचे दिसत आहे.

Gram Panchat New ff

घरोघरी कचरा साचला !

घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगावात ग्रामपंचायत कडून अनेक दिवस कचरा उचलला जात नसल्‍याने घरोघरी मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून त्‍यात अळ्या सुध्‍दा पडू लागल्‍या आहेत. त्‍यामुळे शासनाने ग्रामसेवकाला कुंभार पिंपळगावात नुसत्‍या गोट्या खेळण्‍यासाठी किंवा उंटावर बसून शेळ्या हाकण्‍यासाठी पाठवलं की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर !

कुंभार पिंपळगांवात साधारण दिड ते २ हजार घरे आहेत, मार्केट मध्‍ये १ हजार च्‍या आसपास व्‍यापारी दुकाने आहेत. तसेच अनेक शाळा, महाविद्यालय, बॅंका, पतसंस्‍था आहेत. नियमितपणे कचरा उचललला जात नसल्‍याने घरोघरी निघणारा कचरा आणि मार्केट मधील दुकानाचा कचरा नेमका टाकायचा कुठे असा गंभीर प्रश्‍न सर्वांसमोर उभा राहीला आहे.

घंटागाडी बंद !

कुंभार पिंपळगावाची लोकसंख्‍या जवळपास २० हजाराच्‍या आसपास आहे, काही वर्षांपूर्वी जिल्‍हा परिषदेकडून ग्रामपंचायतला घंटागाडी देण्‍यात आली होती, ती घंटागाडी लहान व छोट्या गल्‍ल्‍यांसाठी योग्‍य असल्‍याने त्‍याचा फायदा नागरिकांना होत होता, परंतू गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून ही घंटागाडी बंद असल्‍याने कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

ग्रामपंचायतचे ट्रॅक्‍टर !

काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतने कोणत्‍या तरी (?) निधीमधून कचरा उचलण्‍यासाठी स्‍वत:चे ट्रॅक्‍टर घेतल्‍याचे समजते. मात्र हे ट्रॅक्‍टर सुध्‍दा १५- १५ दिवस गल्‍ली मध्‍ये येत नसल्‍याचे नागरिक सांगत आहेत. त्‍यामुळे घरात मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारचा कचरा साचत आहे. कदाचित इनकमिंग कमी पडत असावी त्‍यामुळे ट्रॅक्‍टरचा वापर खाजगी किंवा दुसऱ्याच कामासाठी होत असल्‍याचे नागरिक सांगत आहेत.

कचरा टाकायचा कुठे ?

घरातील महिला किंवा सर्वसामान्‍य नागरिक हे घरातील कचरा २ ते ३ दिवस घरात ठेवू शकतात, परंतू त्‍यानंतर सदरील घरातील ओला कचरा सडत असल्‍याने तसेच त्‍यातून दुर्गंधी येत असल्‍याने नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे. कचरा टाकण्‍यासाठी पर्यायी जागा सुध्‍दा उपलब्‍ध नसल्‍याने नागरिकांनी स्‍वत:हून कचरा टाकायचा कुठे असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

ग्रामपंचायत समोर कचऱ्याचे ढीग !

गावात घरोघरी कचरा साचून दुर्गंधी पसरली आहेच, शिवाय गावात जिकडे तिकडे सुध्‍दा कचरा दिसत आहे, मात्र एवढे कमी होते की काय आता तर चक्‍क ग्रामपंचायत समोर कचऱ्याचे ढीग झाल्‍याने ग्रामपंचायतचा कारभार पूर्णपणे ढेपाळल्‍याचे चित्र दिसत आहे. ग्रामपंचायत समोर कचऱ्याचे एवढे मोठे ढीग पाहून ग्रामसेवकाचे डोके ठिकाणावर आहे का ? असा सवाल नागरिक करत आहेत. पावसाळ्याला सुरूवात झाली असून गावात तुंबलेल्‍या नाल्‍या, गल्‍लोगल्‍ली कचरा, घाण व दुर्गंधीमुळे डेंग्‍यू, मलेरिया व इतर साथीचे आजार पसरल्‍यास याची सर्वस्‍वी जबाबदारी ग्रामपंचायतसह पंचायत समिती आणि जिल्‍हा परिषदेवर राहील अशी संतप्‍त प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे.

ग्रामसेवकाची गैरहजेरी !

कुंभार पिंपळगांवचे ग्रामसेवक अर्थात ग्रामपंचायत अधिकारी (महादेव रूपनर) हे वारंवार गैरहजर राहत असून ८ – १५ दिवस गावात दिसत सुध्‍दा नाहीत अशी भावना नागरिक व्‍यक्‍त करत आहेत. त्‍यांच्‍या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे गावातील घाण, कचरा व दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे. शिवाय तुंबलेल्‍या नाल्‍याचा प्रश्‍न, पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न व इतर प्रश्‍न निर्माण झाले असून नागरिकांना कागदपत्रे व इतर समस्‍यां संदर्भात ग्रामपंचायतच्‍या चकरा माराव्‍या लागत आहेत.

वरिष्‍ठ अधिकारी लक्ष घालणार का ?

कुंभार पिंपळगावातील कचऱ्याचा गंभीर प्रश्‍न आणि गावात निर्माण झालेल्‍या इतर समस्‍या पाहता गटविकास विकास अधिकारी, जि.प.उपमुख्‍य कार्यकारी (पंचायत) तसेच मुख्‍य कार्यकारी अधिकारी या प्रकरणी लक्ष घालणार का ? की लाडका ग्रामसेवक म्‍हणून त्‍यांना पाठीशी घालणार आणि नागरिकांना वाऱ्यावर सोडून देणार ? असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करत आहेत.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!