Your Alt Text

आरटीओ आणि घनसावंगी पोलीस ठाण्‍याने अल्‍पवयीन मुलांना वाळूचे ट्रॅक्‍टर चालवायचा परवाना दिलाय का ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील गोदाकाठ परिसरासह कुंभार पिंपळगांव परिसरात वाळू, खडी, मुरूम इत्‍यादीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरवर चालक म्‍हणून अल्‍पवयीन मुले दिसून येत असल्‍याने आरटीओ कार्यालय, तहसील आणि घनसावंगी पोलीस ठाण्‍याने अल्‍पवयीन मुलांना वाळूचे ट्रॅक्‍टर चालवायचा विशेष परवाना दिलाय का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील गोदाकाट परिसर व कुंभार पिंपळगांव परिसरात वाळू, खडी, मुरूम इत्‍यादीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरची स्‍टेअरिंग अल्‍पवयीन मुलांच्‍या हाती दिसून येत आहे, म्‍हणजेच अल्‍पवयीन मुले सदरील ट्रॅक्‍टर चालवत आहेत. सदरील ट्रॅक्‍टर सोबत कधी एक ट्रॉली तर कधी २ ट्रॉली सुध्‍दा असते. ही अल्‍पवयीन मुले फक्‍त ट्रॅक्‍टर चालवत नाही तर कुंभार पिंपळगांव आणि परिसरातून भरधाव वेगाने ट्रॅक्‍टर चालवित असल्‍याने अपघात होण्‍याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे.

पाय सुध्‍दा पुरत नाही !

कुंभार पिंपळगावातून भरधाव वेगाने एक अल्‍पवयीन मुलगा ट्रॅक्‍टर चालवित असल्‍याचे दिसून आले, त्‍या मुलाचे वय अंदाजे १५ च्‍या आसपास असेल, त्‍याचे पाय सुध्‍दा ब्रेक पर्यंत पुरत नव्‍हते, तरीही तो मुलगा भरधाव वेगाने ट्रॅक्‍टर मार्केट मधून पळवित होता. मात्र त्‍याच्‍या या कृतीमुळे आणि त्‍याला या स्‍टेअरिंगवर बसवणाऱ्या वाहन मालकाच्‍या मानसिकतेमुळे लहान मुलाचा किंवा नागरिकाचा जीव जावू शकतो.

अल्‍पवयीनच मुले का ?

स्‍थानिक काही नागरिकांच्‍या म्‍हणण्‍यानुसार बेकायदेशीपणे वाळू, खडी, मुरूम इत्‍यादीची वाहतूक करतांना पोलीस किंवा पथकाने पकडले तरी अल्‍पवयीन असल्‍यामुळे त्‍या मुलावर किंवा वाहन मालकावर शक्‍यतो कारवाई होत नाही, याचाच गैरफायदा घेवून काही जण ट्रॅक्‍टरवर अल्‍पवयीन मुलांच्‍या हाती ट्रॅक्‍टर देत आहे.

फक्‍त ट्रॅक्‍रच नाही !

अल्‍पवयीन मुलांच्‍या हाती फक्‍त ट्रॅक्‍टरच नाही तर जीप, कार व इतर गाड्या सुध्‍दा दिसून येत आहेत. त्‍यामुळे अपघाताची दाट शक्‍यता दिसून येत आहे. या अल्‍पवयीन मुलांना ट्रॅक्‍टर, कार, जीप इत्‍यादी वाहने चालवतांना कदाचित मजा येत असेल तसेच संबंधित वाहनाचा मालक खर्च पाण्‍यासाठी त्‍या मुलाला काही देतही असेल परंतू त्‍यामुळे कुणाचा जीव धोक्‍यात येवू शकतो, शिवाय नियम कायदे पायदळी तुडवले जात आहेत याचं भान त्‍यांना राहीलेलं दिसत नाही.

यापूर्वी अनेक अपघात !

कुंभार पिंपळगांव शहरातून अंबड – पाथरी हा महामार्ग गेलेला आहे, या रस्‍त्‍यावर आतापर्यंत अपघात होवून अनेकांचा जीव गेलेला आहे. अल्‍पवयीन मुलाने टू व्हिलर किंवा फोर व्हिलर वाहन भरधाव वेगाने चालवून धडक दिल्‍याने गंभीर जख्‍मी किंवा अपंगत्‍व आल्‍याच्‍याही घटना घडल्‍या आहेत. म्‍हणजे लाखो रूपये दवाखान्‍यात खर्च करावे लागले असून अनेकजण आर्थिक संकटात सापडल्‍याच्‍याही घटना मागील काळात घडल्‍या आहेत.

कारवाई होणार का ?

अल्‍पवयीन मुलांच्‍या हाती ट्रॅक्‍टर, जीप, कार व इतर वाहने देणाऱ्या वाहन मालकावर कारवाई होणार का ? अल्‍पवयीन मुले वर्दळीच्‍या ठिकाणाचीही परवा न करता भरधाव वेगाने वाहने चालवत असल्‍याने नागरिकांचा जीव धोक्‍यात घालणाऱ्या संबंधित वाहन मालकाचे वाहन जप्‍त करणार का ? बेकायदेशीर वाहतूक थांबवणार का ? असा सवाल सर्वसामान्‍य नागरिक विचारत आहेत.



नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्‍या नियमित प्राप्‍त करण्‍यासाठी एल्‍गार न्‍यूजच्‍या व्‍हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्‍हा, किंवा 9890515043 हा क्रमांक तुमच्‍या व्‍हाट्सअॅप ग्रुप मध्‍ये अॅड करा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!