एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
शासनाच्या महिला व बाल विकास विभाग व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या माध्यमातून ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना दिला जाणारा पोषण आहार दिलेला नसतांना पोषण आहार (THR) दिल्याचे मॅसेज मोबाईलवर आल्याने नेमका गोंधळ काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बालकांच्या पोषण व आहार विषयक दर्जात सुधारणा करण्यासाठी अर्थात आरोग्याच्या दृष्टीने राज्यातील ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना, गरोदर स्त्रिया, स्तनदा मातांना घरी पॅकिंग मध्ये पोषण आहार (THR) दिला जातो, दर महिन्याला हा पोषण आहार देण्यात येत असतो. मात्र मात्र कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी) येथे पोषण आहार न देता मोबाईलवर पोषण आहार दिल्याचे मॅसेज आल्याने या विभागात नेमका काय गोंधळ सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
मोबाईलवर मॅसेज !
अंगणवाडीतून घरी घेवून जाण्यासाठी जेव्हा पोषण आहाराचे पाकिट दिले जातात त्याच्या नंतरच मोबाईलवर मॅसेज येत असतो, मात्र कुंभार पिंपळगांव येथे एका कुटुंबातील व्यक्तीला गेल्या महिन्यात म्हणजे ५ एप्रिल २०२५ रोजी ५.२६ वाजता पोषण आहार दिल्याचा मॅसेज आला होता, त्यावेळेस कदाचित एक दोन दिवसात पोषण आहार मिळेल म्हणून कोणी काही बोलले नाही, मात्र तेव्हा सुध्दा पोषण आहार मिळाले नाही फक्त मॅसेज आला होता. (स्क्रीनशॉट खाली दिला आहे.)

या महिन्यात सुध्दा म्हणजे दि.१९ मे २०२५ रोजी दुपारी १.२६ वाजता मोबाईल मॅसेज आला की, पोषण आहार संबंधित बालकाला अथवा कुटुंबाला देण्यात आले आहे, वास्तविक संबंधित कुटुंबाला कोणत्याही प्रकारचे पोषण आहार किंवा टीएचआर पाकिट देण्यात आले नाही. (स्क्रीनशॉट खाली दिला आहे.) त्यामुळे महिला व बाल विकास विभागात नेमका गोंधळ काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मग पोषण आहार कुठंय ?
जर संबंधित कुटुंबाला पोषण आहार (THR) देण्यात आले नाही तर मग या पोषण आहाराचे पाकिट गेले कुठे ? पोषण आहार न देता अशा प्रकारे मॅसेज येत असेल तर त्याचा अर्थ काय घ्यायचा ? लाभार्थ्यांना पोषण आहाराचा माल किंवा पाकिट न देता माल दुसरीकडेच पार्सल तर केला जात नाही ना ? महिला व बाल विकास विभाग किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालया अंतर्गत काही घोटाळा तर सुरू नाही ना ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
माहिती घेवून सांगतो / सांगते !
याबाबत घनसावंगीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद डाबेराव यांना विचारले असता अशा प्रकारे पोषण आहार / पाकिट देण्याआधी मोबाईलवर मॅसेज पाठवता येत नाही, पोषण आहार दिल्यावरच मोबाईलवर मॅसेज येत असतो, नेमका काय प्रकार आहे याची माहिती घेवून सांगतो असे त्यांनी सांगितले. तर महिला व बाल कल्याण अधिकारी श्रीमती कोमल कोरे यांच्याशी संपर्क साधला असता सदरील प्रकार काय आहे याची माहिती घेवून सांगते असे त्यांनी सांगितले.
म्हणजे काही तरी चुकतंय !
ज्या अर्थी दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा प्रकारे पोषण आहार दिल्याशिवाय मोबाईल वर मॅसेज येत नाही किंवा पाठवता येत नाही, त्या अर्थी काही तरी चुकतंय किंवा काही तरी गोंधळ सुरू आहे असेच दिसत आहे. यदाकदाचित २ महिन्याचा पोषण आहार एकाच वेळी देण्यात येणार असेल तरी मुळ प्रश्न तसाच राहतो की, पहिल्या महिन्यात सुध्दा फक्त मॅसेज आणि दुसऱ्या महिन्यात सुध्दा पोषण आहार देण्यापूर्वी मोबाईलवर मॅसेज कसा काय येवू शकतो ? त्यामुळे नुसते हवेतून पोषण आहार देणं सुरू आहे की काय ? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
महिला व बाल कल्याण अधिकारी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांनी या प्रकाराची चौकशी करणे आणि काही गोंधळ होत असेल तर योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. संबंधित प्रशासने वेळीच योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे कारण जिल्ह्यात आधीच घोटाळे सुरू आहेत, त्यात पुन्हा एखादा घोटाळा बाहेर आला तर आश्चर्य वाटणार नाही.
