एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे नेमकं चाललंय काय असा प्रश्न नागरिकांना वारंवार पडत आहे. कारण योजना किंवा विकास कार्याच्या बाबतीत गैरव्यवहाराचे एक प्रकरण संपत नाही तोच दुसरे प्रकरण समोर येत आहे, दुसरे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत तिसरे प्रकरण समोर येत आहे. म्हणजेच ग्रामसेवकांनी गावात सगळा गोंधळच करून ठेवलाय की काय असा सवालही उपस्थित होवू लागला आहे.
गावासाठी योजना !
घनकचरा व सांडपाण्याचे योग्य ते व्यवस्थापन झाले नाही तर अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होतात. घाण, कचरा व सांडपाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढते शिवाय सांडपाणी जमिनीत मुरल्याने बोअर किंवा हातपंप यातील पाणीही दुषित होण्याची शक्यता असते, लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढते, त्यामुळे शासनाने ग्रामीण भागांसाठी स्वच्छ भारत मिशन टप्पा २ अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यास सुरूवात केली, या अंतर्गतच कुंभार पिंपळगांव करीता सांडपाणी व व्यवस्थापन करीता ५४ लाख रूपये मंजूर करण्यात आले होते.
५४ लाख गेले कुठे ?
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे शासनाने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करीता एप्रिल २०२३ मध्ये ५४ लाख २७ हजार ६७२ रूपये मंजूर केले होते. अर्थात टेंडरच्या माध्यमातून हे काम अजिंक्य राठोड नावाच्या व्यक्तीला देण्यात आले होते, कामाचा कालावधी ९० दिवसांचा म्हणजेच ३ महिन्यांचा होता, मात्र आश्चर्य म्हणजे आजघडीला २ वर्षे उलटून गेली असली तरी ही योजना किंवा योजनेचे काम कुंभार पिंपळगावात शोधूनही कुठे सापडत नाही. त्यामुळे कुंभार पिंपळगांवसाठी आलेले ५४ लाख रूपये गेले कुठे ? असा प्रश्न उपस्थित होत असून दाल में कुछ काला नहीं, पूरी दालही काली है अशीच काही परिस्थिती दिसत आहे.
हर घर जल घोटाळ्याचे आका येथे पण !
जालना जिल्ह्यात हर घर जल घोटाळा ज्यांच्या आशिर्वादाने झाल्याचे दिसत आहे त्याच कार्यकारी अभियंता या टेंडर प्रक्रियेत सुध्दा सुरूवाती पासून शेवटपर्यंत असल्याचे दिसत आहेत. (स्क्रीनशॉट खाली दिला आहे) त्यामुळे कुंभार पिंपळगांव येथील ५४ लाखाचे काम गायब करण्यात कार्यकारी अभियंता यांची काय भूमिका आहे आणि यामध्ये त्यांना काही मलाई मिळाली आहे का ? याची चौकशी होणे आवश्यक आहे.

विहिरी प्रमाणे प्रकल्प हरवलाय का ?
मकरंद अनासपुरे यांच्या एका चित्रपटामध्ये विहीर हरवल्याचे दाखवण्यात आले होते, अर्थात तसाच काही प्रकार कुंभार पिंपळगांव येथे झाल्याचे दिसत आहे. गावाला ५४ लाख रूपयांचे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर झाला होता, टेंडर फायनल होवून संबंधिताला कामही देण्यात आले होते, मात्र संबंधित गुत्तेदाराने ३ महिन्यात तर सोडाच, २ वर्षे उलटूनही या प्रकल्पाचे काम केले नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी आलेले ५४ लाख रूपये गेले कुठे ? विहीरी प्रमाणे हा प्रकल्प सुध्दा हरवलाय म्हणून नागरिकांनी तक्रार करावी का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सगळ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली !
कार्यकारी अभियंत्यांनी टेंडर प्रक्रिया पूर्ण करून गुत्तेदाराला काम दिले, मात्र गाव ते जिल्हा सर्वांनी डोळ्यावर पट्टी बांधली का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण ग्रामसेवकांनी आतापर्यंत यावर भ्र शब्दही काढला नाही, तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी सुध्दा बघ्याची भूमिका घेतली, पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी तर आशिर्वादच दिल्याचे दिसत आहे, तर तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांनीही एवढ्या मोठ्या कामाकडे दुर्लक्ष केले, शिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही जिल्हयातील सदरील योजनांचा आढावा का घेतला नाही ? हा सुध्दा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणात गुत्तेदाराने कोणकोणाला पाकिट किंवा मलाई पोहोच केली हा सुध्दा चौकशीचा भाग आहे.
चौकशी का नाही ?
जर या प्रकरणात संबंधित अभियंते अथवा अधिकारी दोषी नाहीत तर मग त्यांनी ५४ लाख रूपयांचे काम न करता सदरील कामच गायब करणाऱ्या गुत्तेदारावर कारवाई का केली नाही ? काम झाले आहे किंवा नाही याची साधी चौकशी सुध्दा केली आहे का ? ५४ लाखाचे काम न करता जर गुत्तेदाराने बिले उचलली असतील तर ग्रामसेवक (ग्रा.पं.अधिकारी) झोपा काढत होते का ? ग्रामसेवकाने वरिष्ठांना अहवाल का दिला नाही ? पंचायत समिती स्तरावरून किंवा पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंता यांच्या स्तरावर या कामाचा फॉलोअप का घेण्यात आला नाही ? पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग सुध्दा एवढे दिवस झोपा काढत होते का ? गुत्तेदाराने गाव ते जिल्हा सगळ्यांना मॅनेज केले आहे का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
कारवाई होणार का ?
५४ लाख रूपये ही रक्कम छोटी नाही, शासनाने दिलेला कुंभार पिंपळगांव येथील नागरिकांच्या हक्काचा पैसा अशा प्रकारे गायब केला जात असेल तर कारवाई होणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी हे या प्रकरणाची चौकशी करणार का ? आणि चौकशी अंती संबंधित गुत्तेदारावर आणि इतर दोषींवर कारवाई करणार का ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पुढील पंचनामा लवकरच…
