एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात मागील काळात काय काय गोंधळ किंवा घोटाळे करून ठेवण्यात आले आहेत हे सांगणे अवघड होवून बसले आहे, कारण एक प्रकरण बाहेर काढले की दुसरे प्रकरण अचानक समोर येवून प्रकट होत आहे. बरं प्रकरण पण असे आहेत की, पाणी पुरवठा विभागाने खरं सांगितलं तरी ते अडचणीत आणि खोटं सांगितलं तरी ते अडचणीत अशीच काही सध्याची परिस्थिती झाली आहे.
नुसता गोंधळ ?
पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता विद्या कानडे ह्या २०२२ मध्ये जॉईन झाल्याचे शासनाच्या वेबसाईटवर नमूद आहे, शिवाय या कार्यकारी अभियंता यांनी एका मुलाखतीत सुध्दा मी २०२२ मध्ये जॉईन झाल्याचे सांगितले आहे, परंतू याच कार्यकारी अभियंता यांचे नाव २०१७ – २०१८ मधील अनेक गावातील संपूर्ण टेंडर प्रक्रियेत कसे ? एखाद्या तालुक्यात नव्हे तर जालना जिल्ह्यातील ८ ही तालुक्यात अनेक टेंडर प्रक्रियेत सुरूवातीपासून शेवटपर्यंत त्यांचे नाव कसे ? जी व्यक्ती २०२२ मध्ये जि.प. मध्ये जॉईन होते तीच व्यक्ती २०१७ – २०१८ मध्ये टेंडर प्रक्रियेत कशी ? असा सवाल उपस्थित होत आहे. सदरील कार्यकारी अभियंता विद्या कानडे २०२२ मध्ये जॉईन झाल्याचे शासनाच्या वेबसाईटवर माहिती अधिकार कायद्या अंततर्गत जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे, जे खालील प्रमाणे आहे.

एल्गार न्यूजने ८ ही तालुक्यातील प्रत्येकी २ गावांच्या टेंडरची माहिती काढली असता सर्व तालुक्यात २०१७ – २०१८ मध्ये सध्याच्या कार्यकारी अभियंत्याचे नाव दिसत आहे. त्यापैकी एका गावाच्या टेंडर प्रक्रियेचे स्क्रीनशॉट किंवा पत्र खाली दिले आहे.

सर्व प्रक्रियेत सहभाग कसा ?
ज्या वेळेस कोणत्याही कामाची टेंडर प्रक्रिया ऑनलाईन राबविली जाते तेव्हा बोली लावण्यापासून ते टेंडर संबंधित व्यक्तीला देण्यापर्यंत अनेक टप्पे असतात, यामध्ये Technical Bid Opening Summery, Technical Evalution Summary, Finance Bid Opening Summary, Financial Evaluation Bid List, Finance Evaluation Summary Details आणि शेवटी AOC फायनल करून संबंधित गुत्तेदाराला काम दिले जाते. सदरील टप्पे वर स्क्रीनशॉट मध्ये दिले आहेत.
कोणत्याही कामासंदर्भात काही बदल किंवा कामाच्या रक्कमेत वाढ समजू शकेल परंतू टेंडरची सुरूवात पासून शेवटपर्यंत तो व्यक्ती कसा असू शकतो जो व्यक्ती त्या काळात संबंधित पदावर रुजू झालाच नव्हता. २०२२ मध्ये रुजू होणारा व्यक्ती २०१७ किंवा २०१८ मध्ये टेंडरची प्रक्रिया कशी काय राबवू शकतो ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
२०१८ मध्ये कोण ?
वरील माहितीनुसार विद्या कानडे ह्या २०२२ मध्ये जॉईन झाल्या आहेत. एल्गार न्यूजने २०१८ मधील एक वर्क ऑर्डर (कार्यारंभ आदेश) पाहिले असता त्यावर कार्यकारी अभियंता म्हणून दादाराव डाकोरे यांची सही दिसत आहे, अर्थात जर दादाराव डाकोरे हे २०१८ मध्ये कार्यकारी अभियंता असतील तर मग सध्याच्या कार्यकारी अभियंता विद्या कानडे यांचे नाव २०१८ मधील टेंडर प्रक्रियेत कसे ? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
एकच व्यक्ती २ ठिकाणी ?
चित्रपटा मध्ये एक सारखे दिसणारे २ व्यक्ती पाहिले होते, परंतू एकाच नावाच्या २ व्यक्ती ज्या एकाच जिल्हा परिषदेमध्ये, एकाच पाणी पुरवठा विभागात आणि त्याच पदावर वेगवेगळ्या वर्षात पहिल्यांदाच पाहण्यात येत आहे. म्हणजे जादूची कांडी फिरवून जसे जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि घरात नळ कनेक्शनद्वारे शुद्ध पाणी पुरवठा केलाय, त्याच जादूच्या कांडीने एकच व्यक्ती भुतकाळात सुध्दा टेंडर प्रक्रियेत सहभागी झाली की काय ? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.
जिल्ह्यात गोंधळ ?
जालना जिल्ह्यातील सर्व तालुके म्हणजे घनसावंगी, अंबड, बदनापूर, जालना, भोकरदन, जाफ्राबाद, परतूर, मंठा या आठही तालुक्यातील प्रत्येकी २ गावातील टेंडरची माहिती एल्गार न्यूजने पाहिली असता आठही तालुक्यात २०२२ मध्ये जि.प. मध्ये जॉईन होणारे सदरील कार्यकारी अभियंता विद्या कानडे २०१७ – २०१८ मधील टेंडर प्रक्रिया राबवत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेमका हा गोंधळ काय याचे उत्तर देणे आवश्यक झाले आहे. जेणेकरून आमच्यासह सर्वसामान्य नागरिकांच्या ज्ञानात भर पडेल.
हर घर जल घोटाळ्यात आरोप !
ज्या कार्यकारी अभियंत्याचे नाव जालना जिल्ह्यातील हर घर जल घोटाळ्यात प्रामुख्याने येत आहे त्याच कार्यकारी अभियंत्यांचे नाव वरील टेंडर प्रक्रियेत सुध्दा संशयाच्या भोवऱ्यात आल्याचे दिसत आहे. अर्थातच हर घर जल महाघोटाळ्यात कोणी एक व्यक्ती नसून गाव ते जिल्हा अनेकांनी या घोटाळ्यात योगदान दिले यात शंका नाही. मात्र विभागप्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता यांना जबाबदारी झटकता येणार नाही.
हर घर जल म्हणजे काय ?
ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत हर घर नल से जल (FHTC – Functional Household Tap Connection) प्रमाणे पाणी पुरवठा करण्याचा शासनाचा उद्देश होता. सन २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट होते. यात फक्त योजना पूर्ण करणे एवढाच उद्देश नव्हता तर कार्यक्षम पाणी पुरवठ्याची एक शाश्वत सेवा उपलब्ध करणे हा त्यामधील प्रमुख गाभा होता. सदरील जल जीवन मिशन योजना ५० : ५० टक्के केंद्र व राज्य हिश्श्याने राबविण्यात आली.
हर घर जल महाघोटाळा !
शासनाने २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, शासनाचा हेतू चांगला होता मात्र जालना जिल्ह्यातील जि.प. पाणी पुरवठा विभागाने संबंधित गावातील नागरिकांना पाणी पुरवठा न करता अक्षरश: लाज सोडून जिल्ह्यातील शेकडो गावांना हर घर जल गांव घोषित केले. एवढंच नव्हे तर हर घर जल घोषित करतांना ज्या गावात पाईपलाईनच टाकण्यात आली नाही त्या गावातील १०० % कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे पाणी मिळत असल्याचे “हर घर जल” प्रमाणपत्र जारी केले, एवढं कमी होतं की काय, पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींकडून सर्व नागरिकांना पाणी मिळत असल्याचे ग्रामसभेचे ठराव सुध्दा घेतले आणि हे सर्व कागदपत्रे शासन दरबारी सादर करून जालना जिल्ह्यातील शेकडो गावांना हर घर जल घोषित केले.
समितीकडून चौकशी !
एल्गार न्यजने जालना जिल्ह्यातील सदरील “हर घर जल” महाघोटाळा उघडकीस आणल्यानंतर नव्याने जॉईन झालेले जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनीयार यांनी अतिरिक्त सीईओ शिरीष बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली आहे, मात्र अद्याप या समितीचा अहवाल आलेला नाही. अजून किती कालावधी लागेल माहित नाही, परंतू सीईओ, अतिरिक्त सीईओ यांच्यासह समितीवर प्रचंड दबाव असल्याचे बोलले जात आहे.
पुढील भाग लवकरच….
