एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
भारताच्या कठोर भुमिका आणि कारवाईनंतर पाकिस्तानला भारतासमोर गुडघे टेकावे लागले आहेत. पाकिस्तानने अमेरिकेला मध्यस्थी करायला लावले आणि त्यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताला कॉल केला. अर्थातच शस्त्रसंधी करण्याबाबत विनवणी केली त्यानंतर भारताने (दि.१०) शस्त्रसंधी करण्यास सहमती दशर्वली. परंतू अवघ्या काही तासातच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवर गोळीबार केल्याचे समोर आले आहे.
भारताची ताकद !
चार दिवस चाललेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) मुळे पाकिस्तानला भारताच्या ताकदीचा अंदाज आला आणि त्याने अमेरिकेला मध्यस्थी करण्याची विनवणी केली (अमेरिकेवर सुध्दा विश्वास ठेवता येणार नाही) शिवाय पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक (DGMO) यांनी स्वत: भारताला संपर्क साधून शस्त्रसंधीची विनवणी केली.
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले शिवाय पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल्स हल्ले अयशस्वी करून दाखवले, त्यामुळे भारतीय लष्कर किती मजबूत आणि कार्यक्षम आहे हे त्यांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे सदरील झालेली शस्त्रसंधी ही भारताने स्वत:च्या अटीवर केली आहे.
शस्त्रसंधीचे उल्लंघन !
शस्त्रसंधी झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार करण्यात आले आहे. मात्र आम्ही गोळीबार केला नसल्याचा खोटारडेपणा पाकिस्तान पुन्हा करत आहे. सद्यस्थितीत भारताने पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की, पाकिस्तान पुरस्कृत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यास सरळ युद्धाची कार्यवाही समजले जाईल असे सांगितले आहे.
तनाव निर्माण करण्याचा प्रयत्न !
भारतीय विदेश सचिव यांनी सांगितले आहे की, पाकिस्तान हा भारतामध्ये धार्मिक तणाव वाढवून अस्थिरता पसरवू इच्छित आहे. कारण थेट युद्धात तो भारताशी कधीच सामना करू शकत नाही, पण १४० कोटी भारतीयांचे एकत्रित बळ आणि निर्धारामुळे पाकिस्तानचा हा डाव देखील अपयशी ठरणार असल्याचे सांगितले.
कुत्र्याचे शेपूट वाकडेच !
शस्त्रसंधी झालेली असली तरी पाकिस्तानचे डोके अद्याप ठिकाणावर आलेले दिसत नाही, कदाचित एवढ्या सहजासहजी त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही. कारण कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच असते. खरं तर दहशतवाद्यांची फॅक्ट्री असलेला पाकिस्तान हा विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच नाही. त्यामुळे शस्त्रसंधी झालेली असली तरी पाकड्यांवर किंचीतही विश्वास ठेवता येणार नाही.
नागरिकांची भूमिका !
पाकिस्तानकडून वारंवार होणारे दहशतवादी हल्ले, निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी, धार्मिक तणाव निर्माण करण्याचा आणि देशाला अस्थिर करण्याचा होत असलेला प्रयत्न पाहता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अजून कठोर कारवाई व्हायला पाहिजे होती, अर्थातच भविष्यात भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची त्यांची हिंमत झाली नाही पाहिजे, शिवाय या कारवाई दरम्यान पाकव्याप्त काश्मीर सुध्दा परत मिळवायला पाहिजे होता अशीही भावना नागरिक व्यक्त करत आहेत. अर्थातच पाकिस्तान बद्दल देशभरात अत्यंत तिव्र रोष आहे. पाकिस्तानला ठिकाणावर आणण्यासाठी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) पहिला टप्पा झाला असला तरी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद असाच सुरू राहील्यास ऑपरेशन सिंदूर 2.0 आणि 3.0 सुध्दा पुढील काळात हाती घेण्यास भारत मागे पुढे पाहणार नाही हेही तितकेच खरे…
