Your Alt Text

जांबसमर्थच्‍या तलाठ्याने एजंटच्‍या माध्‍यमातून शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे का ? कागदावर वजन ठेवावेच लागते का ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
शासनाचा पगार कमी पडत असावा, सुख सुविधा कमी पडत असाव्‍यात त्‍यामुळे एजंटच्‍या माध्‍यमातून शेतकऱ्यांची लूट करून कदाचित त्‍याची भरपाई करण्‍याचा प्रयत्‍न जांबसमर्थ येथे होत असावा अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्‍यक्‍त केली आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, जांबसमर्थ (ता.घनसावंगी) येथील तलाठी यांच्‍याशी संबंधित एजंटच्‍या माध्‍यमातून शेतकऱ्यांची लूट होत असल्‍याचे समोर आले आहे. वाटणीपत्र, वारसफेर, खरेदीखत इत्‍यादी फेरफारसह इतर कारणांसाठी जांबसमर्थ मध्‍ये एजंट च्‍या माध्‍यमातून शेतकऱ्यांची लूट करण्‍यात येत असल्‍याचे नागरिक सांगत आहेत.

काही दिल्‍याशिवाय बहुतेक कागद जागचे हलत नसावे, कदाचित कागदावर योग्‍य ते वजन ठेवल्‍याशिवाय कागदावर शाई उमटत नसावी, त्‍यामळे सर्वकाही सुरळीत करण्‍यासाठी जांबसमर्थ येथे एजंट नेमून शेतकऱ्यांची सर्रास लूट करण्‍यात येत असावी अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.

कोणत्‍या खिशात ठेवायचे ?

एका नागरिकाने सांगितले की, घनसावंगी येथे संबंधित एजंटला मोबदला दिल्‍यावर एजंटाला प्रश्‍न पडला होता की कोणत्‍या खिशात ठेवू ? कारण आधीच खिसा नोटांनी भरलेला होता, मग कसं तरी दुसऱ्या खिशात दक्षणेसाठी जागा करण्‍यात आली व काटकसर करून दक्षणा जागेवर जावून बसली. अर्थातच एजंटकडे दिवसभरातील दक्षणा जरा जास्‍तच झाली होती असे त्‍या शेतकरी बांधवाने सांगितले.

गेल्‍यावर्षी शेतकऱ्याला असभ्‍य भाषा !

नैसर्गिक आपत्‍तीमुळे नुकसान झालेल्‍या शेतकऱ्यांना गेल्‍या वर्षी अनुदान येणार होते, तत्‍पूर्वी Ekyc करणे आवश्‍यक होते, त्‍यामुळे जांबसमर्थ येथीलच एका शेतकऱ्याने कुंभार पिंपळगांव येथे जांबसमर्थचे तलाठी विजय बुजूडे यांना VK नंबरची यादी मागितली होती. सदरील तलाठी यांनी यादी देण्‍याऐवजी अचानक शेतकऱ्यास असभ्‍य भाषा बोलण्‍यास सुरूवात केली होती व यादी जांबसमर्थ येथील ग्रामपंचायतला लावलेली आहे तेथे पहा, मी कोणालाही यादी द्यायला रिकामा नाही आणि कोणाला यादी द्यायला मी बांधिलही नाही असे सांगितले होते. विशेष म्‍हणजे शेतकरी फक्‍त pdf मोबाईलवर द्या म्‍हणून विनंती करत होता तेव्‍हा त्‍यांनी सांगितले होते की, यादीची पाने ही वेगवेगळी आहेत त्‍यांना एकत्र करून PDF बनवून तुम्‍हाला द्यायची आणि खिशातून पैसे खर्च करायचे हे कोणी शिकवले. विशेष म्‍हणजे त्‍यांच्‍याकडून जेव्‍हा दुसऱ्याने ही यादी घेतली ती pdf च होती आणि अवघ्‍या १ मिनिटात ही pdf त्‍यांच्‍या मोबाईवरून घेण्‍यात आली. तेव्‍हा या तलाठ्याकडे काहीही उत्‍तर नव्‍हते.

एजंटच्‍या माध्‍यमातून लूट !

सदरील तलाठी (ग्रा.म.अधिकारी) यांच्‍याकडे जांबसमर्थसह परिसरातील अनेक गावे आहेत. संबंधित एजंट जांबसमर्थसह परिसरातील शेतकऱ्यांकडून वाटणीपत्र, वारसफेर, खरेदीखत व इतर कारणांसाठी मोठी दक्षणा घेत असल्‍याचे शेतकरी सांगत आहेत. विशेष म्‍हणजे सह्यांसाठी संबंधित नातेवाईकांना सुध्‍दा हाच एजंट कॉल करत असून तोडपाणी सुध्‍दा या एजंटच्‍या माध्‍यमातूनच होत असल्‍याचे शेतकरी सांगत आहेत. जर या एजंटचा आणि तलाठ्याचा काही संबंध नाही तर मग हा एजंट फेरफारशी संबंधित शेतकऱ्यांना कॉल का करत आहे. बहुतांश वेळा एजंट हा तलाठ्यासोबत का असतो ? शेतकऱ्यांची कागदपत्रे या एजंटकडे का असतात ? जेव्‍हा तलाठी जांबमर्थला नसतात तेव्‍हा एजंट घनसावंगी पर्यंत कागदपत्र घेवून टाईमपाससाठी जातो का ? असे अनेक प्रश्‍न यानिमित्‍ताने उपस्थित होत आहेत.

विशेष म्‍हणजे येथील मंडळ अधिकाऱ्याचा सुध्‍दा या तलाठ्याला आशिर्वाद असल्‍याचे शेतकरी सांगत असून याबाबत कोणाला काही प्रश्‍न केल्‍यास कामच होत नसल्‍याचे शेतकरी सांगत आहेत. त्‍यामुळे शेतकरी निमुटपणे दक्षणा देत असल्‍याचे दिसत आहे.

वरिष्‍ठ अधिकारी लक्ष घालणार का ?

श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथे शेतकऱ्यांकडून संबंधित एजंट च्‍या माध्‍यमातून लूट केली जात असेल तर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, निवासी उपजिल्‍हाधिकारी, अपर जिल्‍हाधिकारी व जिल्‍हाधिकारी लक्ष घालणार का ? शेतकऱ्यांची लूट थांबवणार का ? एजंटगिरी बंद करणार का ? नियमान्‍वये शेतकऱ्यांना आवश्‍यक ती सेवा देणार का ? शेतकऱ्यांचा त्रास कमी करणार का ? असे अनेक प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत असून वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालावे अशी माफक अपेक्षा शेतकरी व्‍यक्‍त करत आहेत.


Elgaar News baner01
व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!