एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
शासनाने जालना जिल्ह्याला हर घर जल चे उद्दिष्ट लवकरच पूर्ण करण्याबाबत जेव्हा फर्मान काढले होते, तेव्हा जालना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमख असलेले अधिकारी (कार्यकारी अभियंता) भलतेच काळजीत होते.
पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख तथा कार्यकारी गोलमाल अभियंता हे अलादीनराव यांच्या भूमिकेत असून अलादीनराव व जिन्न (किंवा जिनी) या दोघांवर आधारित स्टोरी…
Story :- शासनाने जलजीवन मिशन हाती घेवून २०२४ पर्यंत ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी देण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले होते. उद्देश चांगला होता, प्रत्यक्षात जिल्ह्यातील गावात पाईपलाईन टाकण्यापासून ते घरोघरी पाणी पोहोचवण्यापर्यंत खूप मेहनत घ्यावी लागणार होती, ! पण बहुसंख्य गावात पाईपलाईनचं नाव नाही, टाकीचा पत्ता नाही, आणि इकडे वरिष्ठांचे फोन आणि फायलींचा डोंगर! त्यामुळे प्रत्यक्षात टार्गेट पूर्ण करण्याचे कामचुकार पाणी पुरवठा विभागाच्या खूप जीवावर आले होते. विभागप्रमुख (कार्यकारी गोलमाल अभियंता) असलेले अलादीनराव यांच्या टेबलावर फायली रचलेल्या होत्या आणि वरिष्ठांकडून कामाच्या प्रगतीबद्दल सतत विचारणा होत होती.
डोक्याला हात लावून अलादीनराव (कार्यकारी गोलमाल अभियंता) विचारात पडले की, हे कसं शक्य होणार? प्रत्यक्ष काम तर काहीच नाही, पण कागदोपत्री उद्दिष्ट कसं साधणार?” वैतागलेल्या अलादीनरावांनी टेबलाच्या कोपऱ्यात पडलेला, धूळ खात असलेला एक जुना पितळेचा दिवा (जो कोणीतरी जुन्या काळात सजावटीसाठी आणला असावा) उचलला आणि रागाने फडक्याने घासला. उद्देश होता धूळ झटकणे, पण झाले भलतेच!
आणि काय आश्चर्य! गडगडाट करत दिव्यातून धूर बाहेर आला आणि एक प्रचंड, हसरा जिन्न (जिनी) प्रकट झाला ! आणि म्हणाला… “क्या हुक्म है मेरे आका?” जिन्नने डोळे चोळत विचारले. “फार वर्षांनी कोणीतरी या दिव्याला जागं केलं!”
अलादीनरावांची क्षणभर बोबडी वळली, पण पुढच्याच क्षणी त्यांच्या डोक्यात एक भन्नाट, पण तितकीच धोकादायक घोटाळ्याची ट्यूब चमकली. ‘हाच आपला तारणहार आहे असे ते स्वतःशी म्हणाले.
अलादीनराव (कार्यकारी गोलमाल अभियंता) सावरून म्हणाले. “ऐक जिन्न,” “एक अत्यंत महत्त्वाचे आणि गोपनीय काम आहे.”
जिन्नने स्वत:च्या कमरेवर हात ठेवत म्हटले. “बोलो मेरे आका! आपके हुक्म की तामील होगी!”
तेव्हा अलादीनराव दबक्या आवाजात म्हणाले, “माझा हुकूम नीट ऐक,” “मला जालना जिल्ह्यातील एकाही गावाला प्रत्यक्ष पाणीपुरवठा करायचा नाही, नळ कनेक्शन द्यायचे नाही ! कारण तसं केलं तर आम्हाला वर्षानुवर्षे मलाई मिळणार नाही.”
जिन्न गोंधळला. “तो फिर हुक्म क्या है, आका?”
“हुकूम असा आहे की,” (अलादीनरावांनी डोळे मिचकावत म्हटले), “तू अशी काही जादू कर की, सरकारच्या सर्व कागदपत्रांवर, फाईल्समध्ये, ऑनलाईन रिपोर्ट्समध्ये असं दिसलं पाहिजे की, जिल्ह्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक घरात नळ कनेक्शन पोहोचले आहे आणि सर्वांना शुद्ध पाणी मिळत आहे. शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती झाली पाहिजे, फक्त कागदावर !”
आवश्यकता असेल तर आमचे उपअभियंते सही शिक्के घेवून बसलेले आहेत, त्यांचीही मदत घे…
जिन्न खळखळून हसला. “वाह आका, वाह ! इन्सान की फितरत आसानी से बदलनेवाली नही है – मतलब कागजी करिश्मा करना है ! चिंता मत करो, अभी लो, आपका काम करता हॅूं !” आणि मग जिन्नने जादूची छडी फिरवली…
जादुई प्रमाणपत्रे:
क्षणात शेकडो गावांची ‘हर घर जल’ प्रमाणपत्रे तयार झाली. ज्या गावात पाईपलाईनचा पत्ता नव्हता, तिथेही १००% काम पूर्ण झाल्याचे शिक्के मारले गेले. अलादीनराव यांचे मोहरे म्हणजेच उपअभियंत्यांच्या सह्या आपोआप उमटल्या.
बनावट ठराव:
शेकडो ग्रामपंचायतींमधून ‘सर्वांना पाणी मिळते’ असे ग्रामसभेचे ठराव जादूने तयार झाले आणि फाईलींमध्ये दाखल झाले. गटविकास अधिकारी (BDO) आपल्या खुर्चीवर बसून राहिले, त्यांना वाटले सर्व काही नियमानुसारच होत आहे.
वरिष्ठ अधिकारी खुश :
सर्व बनावट कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि ठराव वाऱ्याच्या वेगाने जिल्हा परिषदेत पोहोचले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आणि प्रशासकीय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या टेबलावर यशस्वी कामांच्या फाईली अशा रचल्या गेल्या की, त्यांना वाटले जालना जिल्हा योजनेत राज्यात अव्वल आहे !
DWSM समितीवर धुळीचा पडदा:
जिन्नने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन (DWSM) समितीच्या बैठकीवर जादुई धूर सोडला. समितीचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी महोदय आणि समितीच्या सचिव, म्हणजेच स्वतः अलादीनराव, यांना फक्त यशस्वी आकडेवारी आणि हिरवेगार तक्तेच दिसत होते. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहण्याची किंवा Random तपासणी करण्याची गरजच कोणाला वाटली नाही!
बघता बघता, जालना जिल्हा कागदोपत्री ‘हर घर जल’ म्हणून घोषित झाला! शासन दरबारी अलादीनरावांची (कार्यकारी गोलमाल अभियंता), त्यांचे मोहरे आणि एकूणच जि.प. सह जिल्हा प्रशासनाची पाठ थोपटली गेली.
जिन्न अदृश्य होण्याच्या तयारीत होता, पण तो थांबला. त्याच्या चेहऱ्यावरचे हसू आता गंभीर झाले होते. तो म्हणाला. “आका, “तुमचं काम तर झालं, पण माझ्या मनात काही प्रश्न आहेत.”
“काय प्रश्न?” अलादीनराव थोडेसे अस्वस्थ होत म्हणाले.
“एवढे मोठे कार्यकारी गोलमाल अभियंता तुम्ही, तुमच्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, थेट जिल्हाधिकारी… एवढी मोठी फौज असताना, साधं पाणी पोहोचवण्याचं टार्गेट तुमच्यापैकी कोणालाच कसं पूर्ण करता आलं नाही? तुम्ही सगळे झोपा काढत होता का?”
अलादीनराव (कार्यकारी गोलमाल अभियंता) निरुत्तर झाले.
जिन्न पुढे म्हणाला : “मी तर जादूने कागद रंगवले,” “पण जेव्हा गावकरीच सांगतील की पाणी आलं नाही, तेव्हा काय कराल? जिल्हा स्तरावरची चौकशी तुम्ही कदाचित मॅनेज करालही तुमच्या ‘वरच्या’ अधिकाऱ्यांच्या मदतीने… पण विचार करा, जर उद्या राज्य पातळीवरून किंवा थेट दिल्लीतून एखादे केंद्रीय पथक आले आणि त्यांनी निष्पक्ष चौकशी केली, तर ?”
अलादीनराव (कार्यकारी गोलमाल अभियंता) यांच्या कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले.
“तेव्हा तुमची ही कागदी जादू, तुमचे हे फाईलींचे इमले पत्त्यांसारखे कोसळतील, आका,” जिन्न म्हणाला…. “या ‘घर घर झोल’ची जेव्हा इमानदारीने चौकशी होईल, तेव्हा तुम्ही, तुम्हाला आशीर्वाद देणारे तुमचे वरिष्ठ, ‘सब ठीक है’ म्हणणारे दुर्लक्ष करणारे अधिकारी, खोटे ठराव देणाऱ्यांपासून ते कागदावर सह्या करणाऱ्यांपर्यंत – कुणीही कायद्याच्या कचाट्यातून वाचणार नाही. याचा अंदाज आहे का तुम्हाला?”
एवढे बोलून जिन्नने एक थंड उसासा टाकला. “मी तर निघालो, आका. या दिव्याला पुन्हा घासून काही होणार नाही. माझी मदत एकदाच ! आता तुमचं तुम्ही बघा! मी तुमचा हुकूम बजावला ! आता कागदावर पाण्याची गंगा वाहत आहे. पण लक्षात ठेवा, कागद तहान भागवत नाही आणि सत्य नावाचं भूत कधी ना कधी बाटलीतून बाहेर येतंच !” मला तुम्ही बिन पाण्याचे ऑपरेशन हाती घ्यायला लावले, पण जेव्हा शासन तुम्हा सर्वांचे बिन टाक्याचे ऑपरेशन करेल तेव्हा काय कराल ?
असे म्हणून जिन्न धुराच्या लोटात गायब झाला. अलादीनराव (कार्यकारी गोलमाल अभियंता) आपल्या खुर्चीवर सुन्न बसून राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर आता यशाचा आनंद नव्हता, तर भविष्यात येणाऱ्या वादळाची स्पष्ट भीती होती.
काही दिवस अलादीनराव (कार्यकारी गोलमाल अभियंता) अस्वस्थ राहिले आणि नंतर काहीच झाले नाही म्हणून निवांत झाले, त्यांना वाटलं आता काही होत नाही, मात्र अचानक या घोटाळ्याला उघडं पाडण्यासाठी “एल्गार” झाला आणि घोटाळ्याशी संबंधित अनेकांच्या पाचावर धारण बसली.
इतकंच नाही, तर ज्यांनी आधी डोळे झाकून घेतले होते, त्या गाव ते जिल्ह्यापर्यंत जबाबदार असलेल्या अनेकांच्या पोटात आता भीतीचा गोळा उठला होता. रात्री शांत झोप लागणं मुश्किल झालं होतं. नावाला जालना जिल्ह्यात ‘हर घर जल’ योजनेचे कागदोपत्री यश ढोल बडवून साजरे झाले होते. पण शेकडो गावातील नागरिकांना खऱ्या पाण्याची आणि खऱ्या न्यायाची प्रतीक्षा मात्र तशीच होती… अचानक “एल्गार” झाल्यामुळे ज्यांनी हर घर जल घोटाळ्यात योगदान दिले त्यांच्या मनात आता एकच धास्ती होती – ‘मुंबई किंवा दिल्लीचं पथक अचानक आलं तर ?’…….
घोटाळा करणारे रात्री झोपण्याचा प्रयत्न करत असतांना झोप लागत नव्हती, काळोख रात्र आणि सर्वत्र शांत वातावरण असतांना भिंतीवर लावलेल्या घड्याळीमधील फक्त आवाज ऐकू येत होता…. टीक…टीक…टीक..टीक…टीक… आणि पुन्हा पुन्हा तोच प्रश्न सतावत होता…. खरंच मुंबई / दिल्लीचे पथक अचानक आले तर ?……
……