Your Alt Text

पिंपरखेड मध्‍ये जर चोरी ६ लाखांची झाली असेल तर पोलीसांनी फक्‍त दिड लाखाची नोंद का केली ? भानगड काय ? पोलीसांच्‍या भूमिकेवर प्रश्‍नचिन्‍ह !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील पिंपरखेड बु. येथे जर चोरी ६ लाखांची झाली असेल तर पोलीसांनी फक्‍त दिड लाखाची नोंद का केली ? भानगड काय ? असा सवाल गांवकऱ्यांनी केला आहे. त्‍यामुळे तिर्थपुरी येथील पोलीस ठाण्‍याच्‍या भुमिकेवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहेत.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, पिंपरखेड बु. येथील मदन अर्जुन रक्‍ताटे हे त्‍यांच्‍या कुटुंबियांसह दि.१३ रोजी ९ वाजता गावात नाटक पाहण्‍यासाठी गेले होते, रात्री उशीरा म्‍हणजेच दि.१४ रोजी १ वाजता सर्वजण नाटक पाहुन परतले. गेटला कुलुप लावून मदन रक्‍ताटे व त्‍यांचे कुटुंबीय झोपी गेले. बाजुच्‍या खोलीला कडी लावलेली होती, सकाळी साडे पाच वाजेच्‍या सुमारास झोपेतून उठुन मदन रक्‍ताटे बाहेर आले त्‍यावेळी त्‍यांना गेटचे कुलुप तुटलेले दिसले, बाजुच्‍या खोलीचा दरवाजाही उघडा दिसला. त्‍यामुळे खोलीत जावून त्‍यांनी पाहिले असता खोलीतील सामान अस्‍ताव्‍यस्‍त पडलेले होते, व दोन कोठ्या व तीन संदुक दिसून आले नाही, त्‍यामुळे त्‍यांनी कुटुंबियांना सदरची घटना सांगितली.

मदन रक्‍ताटे व त्‍यांच्‍या कुटुंबियांनी शोध घेतला असता कोठ्या व संदुक पत्र्याच्‍या शेडजवळ दिसून आले, त्‍यामध्‍ये ठेवलेले सोने व चांदीचे दागीने, साड्या तसेच इतर वस्‍तूंसह रोख रक्‍कम चोरीला गेल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले असे पोलीसांना दिलेल्‍या जबाबात नमूद करण्‍यात आले आहे.

चोरी ६ लाखांची अन नोंद दिड लाखाची !

तक्रारदार मदन अर्जुन रक्‍ताटे यांनी एल्‍गार न्‍यूजला झालेला प्रकार सांगितला. तक्रारदार मदन रक्‍ताटे यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सोने व चांदीचे दागिने, साड्या व इतर वस्‍तू मिळून अंदाजे ३ लाख आणि रोख रक्‍कम ३ लाख असे एकूण ६ लाखांची चोरी झाली आहे. तसे जबाब नोंदवतांना मी पोलीसांना सांगितले, परंतू पोलीसांनी फक्‍त दिड लाखांची नोंद जबाबात केली असल्‍याचे तक्रारदार मदन रक्‍ताटे यांनी सांगितले. तक्रारदार यांनी जबाब घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ६ लाखाची चोरी झाली आहे तेवढी नोंद करा असे सांगितले तेव्‍हा संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने पुरवणी जबाबाबत अधिकची रक्‍कम नोंदवू असे सांगितले. त्‍यामुळे प्रश्‍न उपस्थित होतो की पोलीसांनी जेवढी चोरी झाली तेवढी नोंद एफआयआर मध्‍ये का केली नाही ?

तक्रारदार मदन रक्‍ताटे यांनी सांगितले की, सोन्‍याचा भाव आजरोजी प्रति ग्राम ९ हजार (१० ग्राम ९० हजार) च्‍या आसपास आहे, मात्र पोलीसांनी ३ हजार प्रति ग्राम प्रमाणे सोन्‍याचा दर गृहीत धरला आहे. शिवाय रोख रक्‍कमेचाही जाणीवपूर्वक कमी उल्‍लेख केला आहे. म्‍हणजेच एकूण चोरी झाली ६ लाखांची आणि पोलीसांनी नोंद दिड लाखाची केली आहे. त्‍यामुळे तिर्थपुरी पोलीस ठाण्‍याच्‍या भुमिकेवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहेत.

चोरी कमी दाखवण्‍याचा उद्देश काय ?

चोरीची घटना होवून सकाळी पोलीसांना सांगुनही पोलीसांनी उशीरा तपास का सुरू केला ? डॉग स्‍क्‍वॉड ला सकाळी लवकर पाचारण करणे आवश्‍यक असतांना १२ च्‍या आसपास म्‍हणजेच उशीरा का बोलावण्‍यात आले ? चोरी जवळपास ६ लाखांची झालेली असल्‍यामुळे वरिष्‍ठांना उत्‍तर द्यावे लागेल यामुळे तर चोरीची रक्‍कम कमी टाकण्‍यात आली नाही ना ? असा सवाल सुध्‍दा गांवकरी करत आहेत. सदरील प्रकरणाची वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेवून चोरीचा सखोल तपास करावा व तक्रारदारास न्‍याय मिळवून द्यावा अशी मागणी गांवकऱ्यांनी केली आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!