एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्ह्यात जि.प. पाणी पुरवठा विभागाने अनेकांच्या संगणमताने केलेला हर घर जल महाघोटाळा एल्गार न्यूजने उघडकीस आणल्यानंतर आता संबंधित गावांची सविस्तर माहिती एक एक करून समोर येत आहे. घनसावंगी तालुक्यातील जवळपास सर्वच गावात हा घोटाळा झालेला असून गावांची यादी यापूर्वीच प्रकाशित करण्यात आली आहे. सदरील घोटाळा फक्त घनसावंगी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जालना जिल्ह्यात झालेला असून अनेक पुरावे एल्गार न्यूजच्या हाती लागले आहेत, त्यापैकी घनसावंगी तालुक्यातील काही गावांची पुराव्यासह सविस्तर माहिती या भागात देण्यात येत आहे.
घोटाळा काय ?
जालना जिल्ह्यातील शेकडो गावात जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने लग्नात बुंदी वाटल्या प्रमाणे हर घर जल प्रमाणपत्र जारी करून संबंधित गावांना कागदोपत्रीच पाणी पाजले आहे. विशेष म्हणजे त्या गावातील नागरिकांना नळ कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा तर सोडाच गावात पाईपलाईनचे पाईपच टाकण्यात आलेले नाहीत, त्यामुळे नळ कनेक्शनचा आणि पाण्याचा प्रश्नच येत नाही.
GR व नियम काय ?
कोणतीही पाणी पुरवठा योजना असो, जो पर्यंत संबंधित गावात प्रत्येक कुटुंबाला (१०० % नागरिकांना) घरामध्ये नळ कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा होत नाही आणि शासनाच्या जीआर प्रमाणे नियमांची पूर्तता होत नाही तो पर्यंत अशा प्रकारे “हर घर जल गांव प्रमाणपत्र” देताच येत नाही किंवा तसे घोषितही करता येत नाही. अर्थातच हे वरिष्ठ अधिकारी सुध्दा मान्य करतात. मात्र पाणी पुरवठा विभागाच्या संबंधित उपअभियंता यांनी (कार्यकारी अभियंता यांच्या आशिर्वादाने) सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून हर घर जल गांव प्रमाणपत्र जारी केले किंवा संबंधित गावांना हर घर जल घोषित केले. अर्थातच ज्या गावांना हर घर जल घोषित केले त्या गावातील नागरिकांना आज रोजी सुध्दा नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळत नाही.
पाणी पुरवठा विभागाने संबंधित गावात पाणी पुरवठा होत नसतांना त्या गावांना हर घर जल घोषित तर केलेच, सोबतच संबंधित ग्रामपंचायतींकडून ठराव सुध्दा घेतले आणि वरिष्ठ् अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने तशी नोंद शासन दरबारी करून टाकली. अर्थातच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय एवढा मोठा घोटाळा होणे अशक्य आहे.
घनसावंगी तालुक्यातील जवळपास सर्वच गावांना पाणी पुरवठा विभागाने हर घर जल गांव घोषित केले आहे. अर्थात या गावातील १०० % कुटुंबांना नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळत असल्याचे घोषित केले आहे. सदरील गावांपैकी काही गावांची माहिती खालील प्रमाणे आहे.
अरगडे गव्हाण
घनसावंगी तालुक्यातील अरगडे गव्हाण येथे शासनाने पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती, ज्याची वर्क ऑर्डर १६/०९/२०२२ रोजी निघाली, सदरील योजना ७३ लाखांची असून, त्याचे काम अर्धवट किंवा अपूर्ण आहे. मात्र गावात सर्वांना पाणी मिळत असल्याची नोंद करण्यात आली आहे. गावाची लोकसंख्या – ११५० असून यामध्ये अ.जा.-२११, अ.ज.- २३, जनरल – ९१६ अशी आहे. एकूण कुटुंब संख्या २४५ असून (१०० %) सर्व २४५ कुटुंबांना नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळत असल्याची शासन दरबारी नोंद पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. शासनाकडे नोंद करण्यात आलेल्या माहितीचा स्क्रीनशॉट खालील प्रमाणे आहे.

राजाटाकळी + विनायक नगर
घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी + विनायकनगर येथे शासनाने पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती, वर्क ऑर्डर १२/१२/२०२२ रोजी निघाली, सदरील योजना १ कोटी २८ लाखांची असून काम अर्धवट किंवा अपूर्ण आहे. मात्र गावात सर्वांना पाणी मिळत असल्याची नोंद करण्यात आली आहे. गावाची एकूण लोकसंख्या – ४३८९ असून त्यामध्ये अ.जा.-६३६, अ.ज.- ३५, जनरल – ३७१८ अशी आहे. गावात एकूण कुटुंब संख्या ८२४ असून (१०० %) सर्व ८२४ कुटुंबांना आजरोजी नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळत असल्याची शासन दरबारी नोंद पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. शासनाकडे नोंद करण्यात आलेल्या माहितीचा स्क्रीनशॉट खालील प्रमाणे आहे.

राजूरकर कोठा
घनसावंगी तालुक्यातील राजुरकर कोठा येथे शासनाने पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती, वर्क ऑर्डर १२/१२/२०२२ रोजी निघाली. सदरील योजना ४६ लाख ५६ हजाराची असून काम अर्धवट किंवा अपूर्ण आहे. मात्र गावात सर्वांना पाणी मिळत असल्याची नोंद करण्यात आली आहे. गावाची एकूण लोकसंख्या ६०२ असून त्यामध्ये अ.जा.-५, अ.ज.- ०, जनरल – ५९७ अशी आहे. गावात एकूण कुटुंब संख्या १२० असून (१०० %) सर्व १२० कुटुंबांना आज रोजी नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळत असल्याची शासन दरबारी नोंद पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. शासनाकडे नोंद करण्यात आलेल्या माहितीचा स्क्रीनशॉट खालील प्रमाणे आहे.

नागेश नगर + नाथनगर
घनसावंगी तालुक्यातील नागेशनगर + नाथनगर येथे शासनाने पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती, वर्क ऑर्डर २७/०९/२०२२ रोजी निघाली, योजना ६३ लाखांची असून काम अर्धवट किंवा अपूर्ण आहे. मात्र गावात सर्वांना पाणी मिळत असल्याची नोंद करण्यात आली आहे. नागेश नगर + नाथनगर गावाची एकूण लोकसंख्या – १८०८ असून त्यामध्ये अ.जा.-७६, अ.ज.- २८, जनरल – १७०४ अशी आहे. एकूण कुटुंब संख्या ३४० असून (१०० %) सर्व ३४० कुटुंबांना आजरोजी नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळत असल्याची शासन दरबारी नोंद पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. शासनाकडे नोंद करण्यात आलेल्या माहितीचा स्क्रीनशॉट खालील प्रमाणे आहे.

गुंज बु. + शिरसवाडी
घनसावंगी तालुक्यातील गुंज + शिरसवाडी येथे शासनाने पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती, २०१४ मध्ये ६९ लाख आणि २०२२ मध्ये १५ लाखाची पाणी पुरवठा योजना मंजूर असून काम अपूर्ण आहे. मात्र गावात सर्वांना पाणी मिळत असल्याची नोंद करण्यात आली आहे. गुंज बु. + शिरसवाडी गावाची एकूण लोकसंख्या – ३८४५ असून यामध्ये अ.जा.-४३५, अ.ज.- ८१, जनरल – ३३२९ अशी आहे. गावात एकूण कुटुंब संख्या ७३० असून (१०० %) सर्व ७३० कुटुंबांना आजरोजी नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळत असल्याची शासन दरबारी नोंद पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. शासनाकडे नोंद करण्यात आलेल्या माहितीचा स्क्रीनशॉट खालील प्रमाणे आहे.

शिवणगांव
घनसावंगी तालुक्यातील शिवणगांव येथे शासनाने पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती, वर्क ऑर्डर २२/०८/२०२२ रोजी निघाली, योजना ३५ लाख ७६ हजाराची असून काम अर्धवट किंवा अपूर्ण आहे. मात्र गावात सर्वांना पाणी मिळत असल्याची नोंद करण्यात आली आहे. गावाची एकूण लोकसंख्या १४४९ असून त्यामध्ये अ.जा.-२७४, अ.ज.- ९, जनरल – ११६६ अशी आहे. गावात एकूण कुटुंब संख्या २९० असून (१०० %) सर्व २९० कुटुंबांना आज रोजी नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळत असल्याची शासन दरबारी नोंद पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. शासनाकडे नोंद करण्यात आलेल्या माहितीचा स्क्रीनशॉट खालील प्रमाणे आहे.

उक्कडगांव
घनसावंगी तालुक्यातील उक्कडगांव येथे शासनाने पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती, वर्क ऑर्डर २७/०७/२०२२ रोजी निघाली, योजना १० लाखाची असून गावात सर्वांना पाणी मिळत असल्याची नोंद करण्यात आली आहे. गावाची एकूण लोकसंख्या १०३२ असून यामध्ये अ.जा.-२२९, अ.ज.- ३८, जनरल – ७६५ अशी आहे. एकूण कुटुंब संख्या १८५ असून (१०० %) सर्व १८५ कुटुंबांना आज रोजी नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळत असल्याची शासन दरबारी नोंद पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. शासनाकडे नोंद करण्यात आलेल्या माहितीचा स्क्रीनशॉट खालील प्रमाणे आहे.

हर घर जल घोषित केले म्हणजे ?
जि.प. पाणी पुरवठा विभागाने घनसावंगी तालुक्यासह जालना जिल्ह्यातील ज्या गावांना प्रमाणपत्र अथवा संबंधित कागदपत्रांच्या आधारे हर घर जल घोषित केले आहे त्यानुसार…
- गावात सगळीकडे पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
- गावात पाईपलाईन मध्ये कुठेही पाण्याची गळती होत नाही.
- गावातील प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळते.
- गावातील १०० टक्के कुटुंबाला नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळते.
- सर्वांना नळ कनेक्शनद्वारे पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
- पाण्याची क्वालिटी केंद्र शासनाच्या BIS 10500 मानकाप्रमाणे शुद्ध आहे.
- पाणी पुरवठ्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
- पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यावर खोदण्यात आलेले सर्व रस्ते दुरूस्त करण्यात आले आहेत.
- गावातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्र, आश्रमशाळा, ग्रामपंचायत इमारत, आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी नळ जोडणी देण्यात आली आहे.
- घरातील, गावातील शासकीय संस्थांमधील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे.
- पावसाचे पडणारे पाणी जमिनीत पुनर्भरण करण्यात येत आहे.
पाईपलाईनच अपूर्ण !
सदरील गावांमध्ये संबंधित योजने मधून अद्याप पाईपलाईनच टाकण्यात आलेली नाही किंवा अर्धवट अवस्थेत काम बंद आहे, त्यामुळे नळ कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा होण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही या सर्व गावांमध्ये नळ कनेक्शनद्वारे पाणी पुरवठा होत असल्याचे जि.प.पाणी पुरवठा विभागाने शासन दरबारी घोषित केले आहे. त्यामुळे घनसावंगी तालक्यातील या गावांमध्ये पाईपलाईनच झालेली नाही, मग नळ कनेक्शन आकाशातून दिलेले आहेत की काय ? असा सवाल विचारला जात आहे. विशेष म्हणजे संबंधित गावांमध्ये पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा कालावधी संपून १ ते दिड वर्षे अधिक झालेला आहे. तरीही काम पूर्ण का झाले नाही याचा जाब संबंधितांना विचारण्या ऐवजी उलट गावाला हर घर जल घोषित करून आणि महाघोटाळा करून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आली आहे.
बहुतांश गावे घोषित !
पाणी पुरवठा विभागाने घनसावंगी तालुक्यातील जवळपास ९० टक्के गावे हर घर जल घोषित करून प्रमाणपत्र शासन दरबारी सबमिट केले आहेत. तर जवळपास १० टक्के गावांचे प्रमाणपत्र जारी करण्यात आले नसले तरी त्या गावातील सर्व नागरिकांना सुध्दा पाणी मिळत असल्याची ऑनलाईन नोंद करण्यात आली आहे. याचाच अर्थ प्रमाणपत्र जारी करण्यात आले असेल किंवा नसेल तरीही अपवाद सोडल्यास ऑनलाईन मात्र तालुक्यातील जवळपास सर्व गावातील नागरिकांना पाणी मिळत असल्याची नोंद ऑनलाईन करण्यात आली आहे. वर देण्यात आलेल्या गावांपैकी दोन गावांचे प्रमाणपत्र जारी करण्यात आले नसले तरी स्क्रीनशॉट मध्ये दर्शवल्या प्रमाणे वरील सर्व गावांमधील कुटुंबांना नळ कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा होत असल्याची ऑनलाईन नोंद पाणी पुरवठा विभागाने शासन दरबारी केली आहे.
चौकशी समिती स्थापन !
एल्गार न्यूजने सर्वप्रथम जालना जिल्ह्यातील हा महाघोटाळा उघडकीस आणल्यानंतर हा विषय वरिष्ठ पातळीवर सुध्दा गेला आहे. आतापर्यंत एल्गार न्यूजने या महाघोटाळ्याचे ९ भाग (बातम्या) प्रकाशित केले आहेत. विधानसभेत सुध्दा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. नुकतंच सीईओ जगदीश मिनीयार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त सीईओ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. मात्र दुर्दैवाने सीईओ यांच्यासह समितीवर असलेला दबाव पाहता समितीकडून चौकशी अथवा तपास कासव गतीने होत असल्याचे दिसत आहे.
दबाव आणि चौकशी !
एल्गार न्यूजने सदरील घोटाळा उघडकीस आणल्यानंतर नव्याने जॉईन झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जगदीश मिनीयार यांनी चौकशी समिती स्थापन केली खरी परंतू त्या समिती मध्ये ज्यांच्यावर आरोप आहेत त्याच कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांना समिती मध्ये घेण्यात आले, मात्र एल्गार न्यूजने हा मुद्दा उचलल्यानंतर आता कार्यकारी अभियंता यांना समिती मधून वगळण्यात आले आहे, परंतू उपअभियंता यांना अद्यापही समिती मध्ये ठेवण्यात आले आहे. एकूणच या घोटाळ्यात गांव ते जिल्हा अनेकजण सहभागी असल्याने चौकशी समितीसह जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावरही दबाव असल्याचे तसेच प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अथवा शासनाने शक्य असल्यास जालना जिल्ह्यात झालेल्या या महाघोटाळ्याची उच्च स्तरीय समिती अथवा पथकाकडून चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.