एल्गार न्यूज विशेष :-
Loan App Scam : आजकाल अनेकजण झटपट कर्ज मिळवण्याच्या नादात स्वत:चं नुकसान करून घेत असल्याचे भयावह चित्र पहायला मिळत आहे. इतर बँकांमध्ये कर्ज देण्यास होत असलेली टाळाटाळ, जास्तीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव, बँकांमध्ये वारंवार माराव्या लागणाऱ्या चकरा अशा अनेक अडचणींमुळे लोक इतर पर्याय शोधत असतात.
मात्र मोबाईल अॅप द्वारे झटपट लोन (कर्ज) मिळवण्याच्या नादात अनेकांचे आयुष्य उध्दवस्त होत असल्याच्या भयावह घटना समोर येत असल्यामुळे वेळीच सावधान होणे गरजेचे आहे. कारण आपल्याला माहितही नसते की, सहजपणे कर्ज देणारे अॅप आपल्यासोबत भविष्यात काय करणार आहेत.
लोन अॅप म्हणजे काय ?
काही सावकारी स्वरूपाच्या खाजगी कंपन्यांनी तात्काळ कर्ज देण्याच्या उद्देशाने मोबाईल अॅप बनवले आहेत किंवा त्यांची ऑनलाईन वेबसाईट सुध्दा असते. सदरील अॅपवाले कोणालाही तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखवतात, कोणताही चार्ज लागणार नसल्याचेही सांगण्यात येते.
आतापर्यंत या लोन अॅपच्या मानसिक छळाला कंटाळून अनेकांनी आपले जीवन संपवल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी भोपाळ येथील एका तरूण दाम्पत्याने आपला 8 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाच्या मुलीसह स्वत:ला संवपवलं, सुसाईड नोट मध्ये रिकव्हरी एजंटांनी खूप बदनामी आणि मानसिक छळ केल्याचा उल्लेख आहे.
बंगळूरू येथेही लोन अॅप वरून कर्ज घेतलेल्या इंजिनिअरिंगच्या 22 वर्षीय विद्यार्थ्याने आई वडीलांची माफी मागणारं पत्र लिहून त्यांना अलविदा केला. दुसऱ्या एका घटनेत मुलीने अॅप वरून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आजीचे दागिने विकून करता यावी यासाठी आजीची हत्या केल्याचा आरोप आहे.
Loan App Scam and Crime
कर्ज देतांना या अॅपच्या कंपन्या 2 हजारापासून लाखोंपर्यंत सहजपणे कर्ज देतात, मात्र नंतर होणारा प्रकार खूपच गंभीर आणि भयावह असतो, कोणत्याही प्रकारचे कागदपत्र न घेता आपल्या कंपनीचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले जाते, अॅप डाउनलोड केल्याबरोबर मोबाईल हॅक होतो, जो आपल्या लक्षात येत नाही.
मोबाईल मधील सगळे संपर्क क्रमांक, फोटो, व्हिडीओसह सारं नियंत्रणं या अॅपच्या कंपनीकडे जाते आणि त्याचाच फायदा या कंपन्या घेतात. भरमसाठ व्याज आकारल्याने मुदतीत हप्ते भरणे शक्य न झाल्यास वारंवार फोन करून हैराण केले जाते, जणू कंपनी हप्ते थकण्याचीच वाट पाहत असते.
गुंड प्रवृत्तीच्या रिकव्हरी एजंटकडून दिवसभरात किंवा रात्री, कधीही फोन करून त्रास दिला जातो, आधी नरमाईचा सूर असतो मात्र नंतर त्यांचा सूर बदलत जातो, अर्वाच्च शिवीगाळ सुरू होते, महिलांबद्दल अनुदगार काढले जातात. अपमान, अवहेलनना करण्याची काही सीमा राहत नाही.
हे रॅकेट फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही, संपूर्ण भारतात अॅपचे काम गोपनीय पध्दतीने चालत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सदरील अॅपच्या कंपन्या ह्या शक्यतो विदेशातील असल्याचे बोलले जाते, मात्र या अॅपच्या कंपन्या स्थानिक गुंड प्रवृत्तीचे लोकच हाताशी धरून पुढील प्रकार करतात. पुढील प्रकार तर अत्यंत भयंकर आहे. त्याची माहिती खाली दिली आहे.