एल्गार न्यूज :-
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली असून सदरील फोटो पाहून प्रत्येक संवेदनशील मन अस्वस्थ झाले आहे.
स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच धनंजय मुंडे व सदर घटनेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या इतरांना देखील सह आरोपी करून सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यांनाही शिक्षा व्हावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. सदरील घटनेच्या निषेधार्थ समाज बांधवांच्या वतीने कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील व्यापारपेठ दि. ६ रोजी कडकडीत बंद ठेवण्यात आली.
राज्यभरात निषेध व बंद !
स्व.संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे व अमानुषपणे हत्या करण्यात आली होती, त्याचे फोटो न्यूज चॅनल्ससह सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. गांव असो की शहर प्रत्येक ठिकाणी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध करण्यात येत असून ठिकाठिकाणी व्यापारीपेठ कडकडीत बंद ठेवण्यात येत आहेत.