Your Alt Text

अरे थोडी लाज बाळगा लाज..! नागरिकांना अजून थेंबभर पाणी मिळालं नाही अन पाणी पुरवठा विभागानं कागदोपत्री अख्‍ख्‍या गावाला पाणी पाजलं !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
पाणी पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी शुद्धीवर आहेत का ? किंवा पाणी पुरवठा विभागाचे डोके ठिकाणावर आहे का ? अशी म्‍हणण्‍याची वेळ आली आहे. गलेलठ्ठ पगार असतांना कदाचित बसल्‍या जागी खुर्च्‍या गरम करून विना तपासणी मलाई खाण्‍याची जरा जास्‍तच सवय पडली आहे का ? असा सवाल सुध्‍दा उपस्थित होवू लागला आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथे गेल्‍या २ वर्षांपूर्वी संपूर्ण गावाला पाणी पुरवठा व्‍हावा यासाठी शासनाने जलजीवन मिशन योजने अंतर्गत १ कोटी ९५ लाखांची म्‍हणजेच जवळपास २ कोटींची योजना मंजूर केली होती, कामाचा कालावधी ५४५ दिवस होता, म्‍हणजेच दिड वर्षे, परंतू आज रोजी २ वर्षे उलटूनही सदरील पाणी पुरवठा योजनेचे काम अर्धे सुध्‍दा झालेले नाही, उलट काही महिन्‍यांपासून सदरील योजने काम बंद आहे. सर्वात महत्‍वाचे म्‍हणजे या योजने अंतर्गत पाणी पुरवठ्याचे काम गावाच्‍या आत सुध्‍दा अजून सुरू झाले नाही, म्‍हणजेच जे काही थोडेफार काम झाले आहे ते गावाच्‍या बाहेरच आहे.

अर्थातच कामच अर्थवट असून गावात अद्याप पाईपलाईनचे एक पाईप सुध्‍दा टाकण्‍यात आलेले नाही, त्‍यामुळे गावाला थेंबभर सुध्‍दा पाणी मिळण्‍याचा प्रश्‍नच नाही. याबाबतीत पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता हे मोबाईल बंद करून ठेवत आहेत तर जि.प. कार्यकारी अभियंता यांनी तर जिल्‍ह्यातील कुठल्‍याही योजनेवर शब्‍द सुध्‍दा बोलायचं नाही असं ठरवलेलं दिसत आहे. अनेकवेळा त्‍यांच्‍याशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला परंतू जिल्‍ह्यात काय चाललंय याच्‍याशी त्‍यांना काहीच देणंघेणं नाही कदाचित या भावनेतून त्‍या काहीच बोलायला तयार नाहीत. शिवाय ज्‍या एजन्‍सीला देखरेख करण्‍याची जबाबदारी देण्‍यात आली आहे ती एजन्‍सी सुध्‍दा मुग गिळून गप्‍प बसली आहे.

एवढं कमी होतं काय ?

कुंभार पिंपळगावाला जलजीवन मिशन योजने अंतर्गत अजून थेंबभर पाणी सुध्‍दा मिळालेले नाही आणि जिल्‍हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांनी “हर घर जल” गाव प्रमाणपत्र देवून गावातील १०० टक्‍के कुटुंबांना पाणी पुरवठा होत असल्‍याचे प्रमाणपत्र जारी केले आहे. सदरील प्रमाणपत्र इकडे तिकडे नाही तर थेट शासनाच्‍या जलजीवन मिशन च्‍या वेबसाईटवर अपलोड करण्‍यात आले आहे. एवढंच नव्‍हे तर दुसऱ्या एका पत्रामध्‍ये ग्रामसेवक (ग्रा.पं.अधिकारी) यांनी सुध्‍दा हर घर जल घोषित करण्‍यासाठी ग्रामपंचायतीच्‍या वतीने द्यावयाच्‍या ठरावाच्‍या नमुन्‍यावर सही शिक्‍का दिलेला आहे. त्‍यामुळे अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

उपअभियंत्‍याच्‍या प्रमाणपत्रात काय ?

एल्‍गार न्‍यूजला शासनाच्‍या वेबसाईटवरून प्राप्‍त झालेल्‍या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्‍या उपअभियंत्‍यांच्‍या “हर घर जल” गाव प्रमाणपत्रात जे नमूद करण्‍यात आले आहे, त्‍यानुसार कुंभार पिंपळगांव, ता.घनसावंगी, जि.जालना गावातील खालील नमूद बाबींची पूर्तता होत असल्‍याची पाहणी करून आज दि………………….. (दिनांक नमूद नाही) रोजी सदर गाव “हर घर जल” गाव म्‍हणजेच गावातील १०० टक्‍के कुटुंबांना वैयक्तिक कार्यात्‍मक नळ जोडणीद्वारे जल जीवन मिशनच्‍या मानका प्रमाणे पाणी पुरवठा होत असल्‍याचे प्रमाणित करण्‍यात येत आहे.

यासह १२ मुद्दे सांगण्‍यात आले आहे व त्‍यानंतर उपअभियंता यांची स्‍वाक्षरी आहे.

थेंबभर पाणी नाही !

योजनेतून गावाला अजून थेंबभर पाणी नाही आणि उपअभियंत्‍यांनी प्रमाणपत्राच्‍या माध्‍यमातून गावातील १०० टक्‍के कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पाणी देवून टाकले आहे. गावात अजून एकही पाईप टाकण्‍यात आले नाही अन अभियंत्‍यांनी पाईप सिमेंट कॉंक्रीट मध्‍ये घट्ट बसविल्‍याचे सांगितले आहे. पिण्‍यायोग्‍य किंवा पुरेसे पाणी तर सोडाच अजून गावात थेंबभर सुध्‍दा पाणी आले नाही. कुठल्‍याही शाळांना किंवा अंगणवाडीला पाणी देण्‍याचा प्रश्‍नच नाही, शिवाय वितरण वाहिणीमध्‍ये पाणी गळतीचाही प्रश्‍नच नाही कारण गावाच्‍या आत मध्‍ये अजून योजनेचे एक पाईप सुध्‍दा टाकण्‍यात आलेले नाही.

भुतांना पाणी पुरवठा केलाय का ?

गावातील एकाही नागरिकाला जलजीवन योजने अंतर्गत अजून थेंबभर सुध्‍दा पाणी मिळालेले नसतांना पाणी पुरवठा विभागाने प्रमाणपत्राच्‍या आधारे १०० % म्‍हणजे अख्‍ख्‍या गावाला पाणी पाजलं आहे. त्‍यामुळे माणसं सोडून पाणी पुरवठा विभागाने भुतांना तर पाणी पाजलं नाही ना ? असा सवाल नागरिक करत आहेत.

याआधीची योजना खाऊन टाकली !

कुंभार पिंपळगांव सन २०११ मध्‍ये राष्‍ट्रीय पेयजल योजने अंतर्गत गावाला १ कोटी १७ लाखांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती, परंतू अधिकारी आणि गुत्‍तेदाराच्‍या संगणमताने ही योजना अर्धवट अवस्‍थेत बंद पडली आणि त्‍या योजनेचे पाणी सुध्‍दा गावाला मिळू शकले नाही.

दाल मे कुछ काला है ?

उपअभियंता यांनी शासन परिपत्रक जलजीवन मिशन २०२१ नुसार असलेल्‍या पत्राच्‍या आधारे प्रमाणपत्र जारी केले असल्‍यामुळे आणि योजनेचे थेंबभर पाणीही गावाला मिळालेले नसल्‍यामुळे दाल कुछ काला नही पुरी दालही काली है म्‍हणण्‍याची वेळ आली आहे.

दरवर्षी पाण्‍याचे टॅंकर !

कुंभार पिंपळगांवला दरवर्षी पाण्‍याचे टॅंकर सुरू करावे लागते, १५ ते २० हजार लोकसंख्‍येचे गाव असल्‍यामुळे दरवर्षी लाखो रूपये पाण्‍यावर खर्च होतात. टॅंकर सुरू करूनही गावातील अनेक भागात छोट्या गल्‍ल्‍या असल्‍यामुळे टॅंकर तेथे जावू शकत नाही आणि पर्यायाने असंख्‍य माता भगीनींना दूरवरून पाणी आणावे लागते अर्थात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.

लाज राहिली नाही का ?

कुंभार पिंपळगांवची यापूर्वीची १ कोटी १७ लाखांची योजना अधिकारी आणि गुत्‍तेदाराने संगणमत करून खाऊन टाकली आहे, आता संपूर्ण गावाला शुद्ध पाणी पुरवठा व्‍हावा या चांगल्‍या हेतूने शासनाने जवळपास २ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर केली, परंतू आता सुध्‍दा अधिकारी आणि गुत्‍तेदार योजना खाऊन टाकणार असतील तर संबंधितांनी लाज सोडलीय असं म्‍हणायला हरकत नाही.

वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं !

कार्यकारी अभियंत्‍यांकडून अपेक्षा करण्‍यात अर्थ नाही, त्‍यामुळे किमान आता तरी कार्यकारी अभियंत्‍यापेक्षा वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे जे दोषी असतील त्‍यांच्‍यावर कडक कारवाई करावी व जलजीवन योजनेचे काम चांगल्‍या दर्जाचे पूर्ण करून नागरिकांना नळ कनेक्‍शन द्वारे पाणी पुरवठा करण्‍याची सोय करावी एवढीच माफक अपेक्षा नागरिक व्‍यक्‍त करत आहेत.

एल्‍गार न्‍यूजचा पाठपुरावा !

जो पर्यंत जलजीवन मिशन योजने अंतर्गत गावातील प्रत्‍येक घरात नळ कनेक्‍शन द्वारे पाणी पुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत एल्‍गार न्‍यूजचा रोखठोक आणि तिखट शब्‍दात पाठपुरावा सुरूच राहणार असून कुठल्‍याही दबावाला एल्‍गार न्‍यूज बळी पडणार नाही एवढे मात्र निश्चित.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!