एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
राज्याच्याच नव्हे तर देशाच्या नकाशावर रोल मॉडेल म्हणून ज्याचं नाव घेता येईल असं गाव म्हणजे आमचं कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना)… पण याचं खरं श्रेय जातं ते ग्रामसेवकाला… सेवकाचा आदर्श नमुना ! म्हणून ओळख निर्माण करत परिश्रमाने स्वत:च्या नावासह गावाच्या नावाचा डंका त्यांनी वाजवला. त्यांच्या कामाची महती लहान पोरांपासून ते अंथरूणावर पडलेल्या वयस्कर व्यक्तीच्या तोंडून देखील ऐकायला मिळेल, इतकं आदर्श त्यांचं व्यक्तिमत्व आहे. असं पारावर निवांत बसलेली गावातील मंडळी त्यांच्याच पाहुण्याला सांगत होती. पाहुण्याला पण हे ऐकून बरं वाटत होतं आणि उत्सुकतेपोटी ते सर्वांचं ऐकूण घेत होते, एक एक करत लोकं वाढत गेली आणि प्रत्येक जण आपली प्रतिक्रिया देवू लागला.
आमचे ग्रामसेवक लई भारी !
अहो, आमचे ग्रामसेवक (ग्रा.पं.अधिकारी) जिल्ह्यात १ नंबर आहेत, त्यांच्या सारखा माणूस जिल्ह्यात शोधूनही सापडणार नाही. त्यांच्यावर कुंभार पिंपळगांवातील नागरिक एवढं प्रेम करतात की ते अनेक वर्षे झाली तरी येथेच आहेत, जेव्हा पासून ते कुंभार पिंपळगांवला आले आहेत तेव्हापासून त्यांनी विकास कामांचा सपाटा लावला आहे, अक्षरश: त्यांनी गावाचा कायापालट करून टाकला आहे. आमच्या ग्रामसेवकाने गावात सगळीकडे रस्ते एवढे चांगले, दर्जेदार आणि चकाचक केले आहेत की, विदेशात आपण फिरत आहोत असा भास होतो. उन्हाळ्यात कधी टॅंकरची गरज पडत नाही, घराघरात स्पेशल नळ कनेक्शन आहे, फक्त तुट्टी फिरवली की एवढं पाणी येतं की, बघायचं कामच नाही, २४ तास पाणी असतं, बरं पाणी पण असं तसं नाही, प्यायला तर फिल्टरच आणि कपडे ध्वायला पण फिल्टरचंच पाणी आहे. असे एका नागरिकाने सांगितले.
असा ग्रामसेवक भेटणार नाही !
अहो, आमचे ग्रामसेवक एवढे कर्तव्यदक्ष आहेत की, गावातील लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण येवू नये म्हणून अपडाउन न करता गावातच राहून ते २४ तास सेवा देतात, कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र लागत असेल आणि त्यांना कॉल केला की लगेच सांगतात की, घरी येवून देतो ना ! अहो अर्ध्या रात्री सुध्दा त्यांना फोन केला तरी ग्रामपंचायत उघडून बसतात अन काय पाहिजे सांगा म्हणतात. मीठाबरोबर भाकर खात त्यांनी पोटाला चिमटे घेत चारचाकी गाडी घेतली तीही फक्त जनसेवेसाठीच. त्यांनी इमानदारीतून घेतलेली ही चार चाकी सुध्दा कोणाला लागत असेल तर तशीच घेवून जा म्हणून ते सांगतात आणि डिझेल पण टाकून देतात, असे दुसऱ्या नागरिकाने सांगितले.
इकडे तिकडे बसत नाहीत !
अहो, आमच्या ग्रामसेवकांनी मनात आणलं असतं, तर तिकडं अंबड रोडला धाब्यावर बसून, हॉटेल मध्ये बसून, रस्त्याने हिरव्यागार झाडाखाली बसून वेगवेगळ्या अर्थपूर्ण सह्या केल्या असत्या. अंबडला किंवा घनसावंगीला बोलावून मर्जीतल्या लोकांची कामे केली असती. पण आमच्या ग्रामसेवकांचं तसं नाही, ते दिवसभर आणि रात्री उशीरापर्यंत ग्रामपंचायत मध्येच बसतात. ग्रामपंचायत त्यांनी एवढी हायटेक करून टाकली आहे की, गावातील एखाद्या नागरिकाने ग्रामपंचायत मध्ये पाय ठेवला की त्यांना कळतं की याला काय हवंय, असं तिसऱ्या नागरिकाने सांगितलं.
टक्केवारी तर त्यांना माहितच नाही !
शासनाचा लाखो किंबहुना कोट्यावधी रूपयांचा निधी गावाला येत असतो आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून महत्वाचे अधिकार हे ग्रामसेवक यांनाच असतात. अहो आमच्या ग्रामसेवकांच्या मनात असतं तर प्रत्येक कामात टक्केवारी घेतली असती, गावातील काही मोजकेच गुत्तेदार हाताशी धरून खिसा गरम केला असता. पण आमचे ग्रामसेवक तसे नाहीत, ते एवढे प्रामाणिक आहेत की, गुत्तेदारालाच ते सांगतात की, काही कमी पडत असतील तर माझ्या खिशातले देतो पण काम चांगले करा. कोणतीही विकासकामे करतांना ती कामे किमान ३० ते ४० वर्षे टिकतील अशा प्रकारची दर्जेदार आणि मजबूत करून ते घेत असतात. असे चौथ्या नागरिकाने सांगितले.
कोणता पुरस्कार द्यावा हा प्रश्न !
आमच्या ग्रामसेवकांचं काय सांगावं बाबा, लईच भारी माणूस आहे. आमच्या ग्रामसेवकला चॅलेंज नाही. असा इमानदार माणूस शोधून सापडणार नाही. त्यांनी गावासाठी एवढं काम केलं आहे की, गावात करण्यासारखं काहीच राहिलं नाही असं वाटतं. योजना एवढ्या राबविल्या की लोकंच म्हणायलेत की बस्स झालं. आमचे ग्रामसेवक जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत १ नंबरवर असतील. त्यांनी तूफान विकास केलाय त्यामुळे म्हटलं की, साहेबांना साष्टांग दंडवत घालावं, पण दंडवत घातल्यावर साहेबांना गैरसमज होवू शकतो की, लोकं दंडवत घालायले म्हटल्यावर संपूर्ण विकास झाला आहे आणि ते पुढील विकास करायचं थांबवतील. म्हणून थांबलो होतो. त्यामुळे त्यांना डिस्टर्ब केलं नाही. खरं तर अशा कर्तव्यदक्ष माणसाला कोणता पुरस्कार द्यावा असा प्रश्न आम्हाला पडला आहे. असे एका नागरिकाने सांगितले.
दर आठवड्याला ग्रामसभा !
अहो, आमचे ग्रामसेवक एवढे भारी आहेत की, शासनाने वर्षातून किमान ६ ग्रामसभा घेण्याचे सांगितले असले तरी आमचे ग्रामसेवक ८ दिवसाला, १५ दिवसाला ग्रामसभा घेतात. एवढ्या ग्रामसभा घेतल्या जातात की, ग्रामसभेचा रेकॉर्ड गिनीज बुक मध्ये नोंद होवू शकतो. महिला नामधारी पुरूष कारभारी असा प्रकार आमच्याकडे नाही. अंधारातून सह्या घेवून कागदोपत्री ग्रामसभा घेण्याचे प्रकार आमच्याकडे नाहीत. ग्रामसभेसाठी स्वत: ग्रामसेवक घरोघरी आणि गावात फिरून ग्रामसभेचं महत्व सांगतात, ग्रामसभेत जनता मालक असते हे ग्रामसेवकांच्या लक्षात आलेले असून लोकांनी ग्रामसभेत काही सांगितलं की त्याचा ठराव घेवून लगेचच अंमलबजावणी केली जाते. असे एका नागरिकाने सांगितले.
कचरा तर दिसतच नाही !
अहो, आमचे ग्रामसेवक स्वच्छते बाबतीत एवढे गंभीर आहेत की, घंटागाडी एक दिवस सुध्दा बंद राहत नाही. यदाकदाचित घंटागाडी बंद पडली तर मेकॅनिक अवघ्या १० मिनिटात येतो आणि गाडी सुरू होवून जाते. गावात कुठेही कचऱ्याचे ढीग किंवा कचरा दिसणार नाही. गावात दिवसातून २ ते ३ वेळा कचरा उचलला जातो. थोडा सुध्दा कचरा साचू नये म्हणून ग्रामसेवक स्वत: घरोघरी जावून विचारतात, कचरा असेल तर घंटागाडी सोबत घेवून आलोय, लगेच गाडीत कचरा टाका असे सांगतात. गावात प्रचंड स्वच्छता असल्याने सर्दी तापासारखे व्हायरल आजार होतच नाहीत. गावात नाल्या तुंबलेल्या कुठेही दिसणार नाहीत, डास (मच्छर) तर गावात दिसेनासे झाले आहेत. एवढी स्वच्छता पाहून त्या डासांना (मच्छरांना) सुध्दा प्रश्न पडला आहे की गाव सोडावं लागतं की काय ? असे दुसऱ्या एका नागरिकाने सांगितले.
खर्चाचा हिशोब दिला जातो !
आमच्या ग्रामसेवकाने रस्त्यावर जेथे तेथे कचरा कुंडी ठेवली आहे. घरोघरी शौचालय तर आहेच पण बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी गावातील प्रत्येक रस्त्यावर सार्वजनिक शौचालय आहे. अशा अनेक सुविधा आहेत. एवढंच नव्हे तर शासनाचा किती निधी आलाय, कुठे खर्च झालाय याची सर्व माहिती आमचे ग्रामसेवक ग्रामपंचायतच्या बाहेर बोर्डावर ठळक अक्षरात लावत असतात. गावात कोणतेही विकास काम होत असेल तर त्याच्या इस्टीमेटची माहिती सुध्दा ग्रामपंचायतच्या बाहेर लागलेली असते. असे एका नागरिकाने सांगितले.
अजून कसा विकास हवाय ?
अहो, आमच्या ग्रामसेवकांच्या अमुल्य योगदानतून गावात सर्व काही व्यवस्थित सुरू असून गावाचा सर्वांगिण विकास झाला आहे, त्यामुळे ग्रामसेवकांनी जास्त धावपळ न करता स्वत:ची सुध्दा काळजी घ्यायला पाहिजे, कारण जास्त धावपळीमुळे त्यांचं वजन सुध्दा कमी झाल्याचं दिसत आहे, गावाचा तर कायापालट झाला आहे, विकास करण्यासारखं काहीच उरलं नाही त्यामुळे त्यांनी आराम केला तरी चालेल असं एकजण बोलले, तेवढ्यात दुसऱ्या एकाने सांगितले की, एवढंच नाही तर आमच्या ग्रामसेवकाने जागोजागी एच.डी. सीसीटीव्ही कॅमेरे सुध्दा लावले आहेत……. असं सांगत असतांनाच, अजून कोणी काही बोलण्याआधीच अचानक इकडे अलार्म वाजला, स्वप्नातून बाहेर पडत जाग आली, मग पुढं काय तेच रोजचं आपलं प्रपंच… असं एका मित्राने सांगितले….
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मग खरं काय ? तर सध्याची वस्तुस्थिती किंवा सत्य परिस्थिती रोखठोकपणे लवकरच एल्गार न्यूजवर….