एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
केंद्र शासनाने प्रत्येक कुटुंबासाठी पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने जलजीवन मिशन ही योजना सुरू केली आहे. हर घर जल, हर घर नल या भुमिकेतून प्रत्येक घरात नळ कनेक्शनद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने सदरील योजना सुरू करण्यात आलेली आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जालना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये योजनेचे काम अर्धवट अवस्थेत बंद आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जलजीवन योजना राज्यात राबविली जात आहे. जालना जिल्ह्यातही अनेक गावांमध्ये सदरील योजने अंतर्गत कामे मंजूर होवून मागील काळात कामे सुरूही झाली होती, परंतू संबंधित अधिकाऱ्यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे अनेक गावात योजनेच्या गुत्तेदारांनी अधर्वट अवस्थेत काम बंद ठेवल्याचे दिसून येत आहे.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष !
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातही जलजीवन योजने अंतर्गत अनेक ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत बंद असल्याचे दिसून येत आहे. सदरील योजनेच्या कामाकडे लक्ष देण्याची जबाबदारी जि.प. कार्यकारी अभियंता यांच्याकडे आहे, तसेच संबंधित अधिकारी लक्ष देत नसतील तर योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आहे, परंतू दोघेही प्रमुख अधिकारी यावर शब्दही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे योजनेची कामे बंद करून गायब झालेल्या गुत्तेदारांना कार्यकारी अभियंता व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) या दोघांचा आशिर्वाद आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उदाहरण म्हणून घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील घेता येईल. सदरील गावात जलजीवन मिशन योजने अंतर्गत १ कोटी ९५ लाख म्हणजेच जवळपास २ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. काम पूर्ण करण्याचा कालावधी दिड वर्षांचा होता, परंतू २ वर्षे उलटूनही अद्याप काम अर्धवट अवस्थेत बंद असून गुत्तेदार गायब आहेत.
याबाबत एल्गार न्यूजने तालुका स्तरावर माहिती घेतली असता जिल्ह्याकडे बोट दाखवण्यात आले, तेव्हा जि.प. च्या कार्यकारी अभियंता व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता दोघेही काहीच बोलायला तयार नाहीत. त्यामुळे संबंधित गुत्तेदारांना सदरील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाच आशिर्वाद आहे का ? जर संबंधित गुत्तेदारांना अधिकाऱ्यांचा आशिर्वाद असेल तर त्यांचे कारण काय ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
माझी जबाबदारी नाही !
जलजीवनचे काम पाणी पुरवठा विभागा अंतर्गत चालत असले तरी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अंकुश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता सदरील जलजीवनच्या कामाबाबत पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना संपर्क करा, जबाबदारी त्यांचीच आहे, कार्यकारी अभियंता लक्ष देत नसतील तर मी काय करू असे त्यांनी सांगितले. त्यामुळे जालना जिल्हा परिषदे मध्ये एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचे प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
चौकशी करणार ! – पाणी पुरवठा मंत्री
गावागावात जलदगतीने पाणी पुरवठा योजना कार्यान्वित व्हावी या उद्देशाने शासनाने जि.प. ला ५ कोटी पर्यंतच्या कामांचा अधिकार दिलेला आहे. जिल्हानिहाय आढावा घेणे सुध्दा सुरू आहे. जालना जिल्ह्यात व घनसावंगी तालुक्यात कोणत्या कारणांमुळे काम बंद आहेत व अधिकारी याकडे दुर्लक्ष का करत आहेत याची नक्कीच माहिती घेवून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एल्गार न्यूजशी बोलतांना दिली आहे.