Your Alt Text

संतोष देशमुख यांच्‍या निर्घृण हत्‍येमुळे राज्‍यभरात संतापाची लाट ! पोस्‍टमार्टम अहवाला वरून विधिमंडळातही तिव्र प्रतिक्रिया !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
बीड जिल्‍ह्यातील मस्‍साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्‍या किती निर्दयीपणे आणि क्रुरपणे करण्‍यात आली याबाबतची माहिती पोस्‍टमार्टम (शवविच्‍छेदन) अहवालातून समोर आली आहे. अहवालात सांगितलेल्‍या गोष्‍टी प्रत्‍येक संवेदनशील मनाला अस्‍वस्‍थ करणाऱ्या आणि प्रचंड संताप आणणाऱ्या आहेत.

सदरील अहवालानुसार संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करण्‍यात आली, शरीराच्‍या सर्वच भागांना मारण्‍यात आले, छाती, हात, पाय, चेहरा, डोके याला जबर मारहाण झालेली आहे. सदरील अहवाल आता समोर आल्‍यानंतर संपूर्ण राज्‍यात संतापाची लाट पसरली असून सर्व आरोपींना आणि त्‍यांना पाठीशी घालणाऱ्यांना कठोर शिक्षा व्‍हावी अशी मागणी सर्वस्‍तरातून होत आहे.

क्रूर मानसिकता !

विविध आमदारांनी सांगितल्‍यानुसार संतोष देशमुख यांच्‍या शरीरावर एवढा मार आहे की, शरीरातील दिड ते दोन लिटर रक्‍त शरीरात गोठले असून ५६ पेक्षा जास्‍त मार्क शरीरावर आहेत, तसेच त्‍यांना एक ते दिड तास मारण्‍यात आल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. संतोष देशमुख यांना एवढ्या भयंकर पध्‍दतीने आणि एवढ्या क्रूरतेने मारहाण करण्‍यात आली आहे की प्रत्‍येक संवेदनशील मनाला प्रचंड संताप येईल. सदरील घटनेमुळे कायदा व सुव्‍यवस्‍थेचे धिंडवडे निघाल्‍याची संतप्‍त प्रतिक्रिया जनतेतून येत आहे.

विधिमंडळातही संताप !

सदरील निर्घृण हत्‍येप्रकरणी विविध पक्षाच्‍या आमदारांनी विधिमंडळात आवाज उठवत कारवाईची मागणी केली. आ.सुरेश धस, आ.नमिता मुंदडा, आ.संदीप क्षिरसागर , आ.जितेंद्र आव्‍हाड, आ.विजयसिंह पंडीत, आ.नाना पटोले, आ.रोहित पवार इत्‍यादी आमदारांनी आवाज उठवत सखोल तपास करून कठोर कारवाईची मागणी केली.

सखोल तपास होणे आवश्‍यक !

सरपंच संतोष देशमुख यांच्‍या निर्दयीपणे झालेल्‍या हत्‍येचा तपास कोणाच्‍याही दबावाखाली न होता सखोल आणि जलदगतीने व्‍हावा, शिवाय यातील गुन्‍हेगार व त्‍यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई व्‍हावी अशी मागणी सर्वस्‍तरातून होत आहे.

दोषी कोणीही असो कारवाई करणार – मुख्‍यमंत्री

विधीमंडळात बोलतांना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले की, संतोष देशमुख प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, या प्रकरणाची पाळमुळं खोदावे लागतील, या प्रकरणात दोषी कोण आहे, कोणत्‍या पक्षाचा आहे, कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल, दोषींना मकोका लावण्‍यात येईल तसेच वाळू माफीया, उद्योगांना त्रास देणारे, भुमाफीया यांच्‍यावर संगठीत गुन्‍हेगारी म्‍हणून कारवाई करण्‍यात येईल. संतोष देशमुख प्रकरणाची आयजी स्‍तरावर एसआयटी चौकशी होईलच तसेच न्‍यायालयीन चौकशी देखील केली जाईल.

जिवाचं मोल पैशानं करू शकत नाही, पण एक छोटीशी मदत म्‍हणून संतोष देखमुख यांच्‍या परिवाराला १० लाख रूपयांची मदत करण्‍यात येईल. जी प्रकरणे बाहेर येत आहेत त्‍यानुसार पोलीसांची कुचराई सुध्‍दा दिसून येत आहे, त्‍यामुळे बीडच्‍या पोलीस अधिक्षकांचे ट्रान्‍सफर करण्‍याचा निर्णय देखील घेण्‍यात आल्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


इतर बातम्‍या खाली पहा….

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!