Your Alt Text

राजेश भैय्यांनी यदाकदाचित अजित दादांना “हम तुम्‍हारे है सनम” म्‍हटल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
सध्‍याच्‍या राजकारणात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही आणि रात्रीतून काय घडेल याचाही अंदाज बांधता येत नाही. हिंदी मध्‍ये एक कहावत आहे ती म्‍हणजे “उंट कब किस करवट बैठेगा कोई नही जानता !” याचाच प्रत्‍यय मागील काही वर्षांमध्‍ये येत आहे. सरळ सरळ दिसणारी परिस्थिती अचानक वेगळ्या वळणावर कधी जावून पोहचेल याचाही नेम नाही.

महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि आपणही निवडून येवून मंत्री होवू अशीच काही भावना माजी मंत्री राजेश टोपे यांची निवडणुकीपूर्वी असेल मात्र निवडणुकीचे निकाल त्‍यांच्‍या अपेक्षेच्‍या उलट लागल्‍यामुळे तेलही गेलं अन तुपही गेलं असंच काही चित्र झाल्‍याची प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे. अर्थातच घनसावंगी मतदारसंघातून राजेश टोपे पराभूत झाल्‍यामुळे त्‍यांचा अपेक्षाभंग झाला असं म्‍हणता येईल.

उम्‍मीद की किरण !

तसं राजेश टोपे हे राष्‍ट्रवादी (SP) चे अध्‍यक्ष तथा जेष्‍ठ नेते शरद पवार यांचे अत्‍यंत विश्‍वासू व्‍यक्‍तींपैकी एक आहेत शिवाय राजेश टोपे यांची सुध्‍दा शरद पवार यांच्‍यावर प्रचंड श्रध्‍दा असल्‍याचे वेळोवेळी बोलले जाते, एवढंच नव्‍हे तर अजित पवार यांनी बंड केल्‍यानंतर राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्‍यासोबतच राहणे पसंत केले होते, विशेष म्‍हणजे अजित पवार आणि राजेश टोपे यांचे “अर्थ”पूर्ण विचार अधिक जुळतात असे अनेकदा समोर आले आहे. तरीही त्‍यांनी शरद पवार यांचीच साथ देण्‍याचे ठरवले होते.

रात्रीच्‍या शपथविधीच्‍या वेळेस अजित पवार समर्थक आमदारांच्‍या सह्यांमध्‍ये राजेश टोपे यांचेही नाव होते अशा बातम्‍या समोर आल्‍या होत्‍या. ही गोष्‍ट वेगळी आहे की शपथविधी संपल्‍यावर सकाळी हम आपके है कोन असे त्‍यांनी सांगितल्‍याचे (तत्‍सम भावना) समोर आले होते. पण राहून राहून अजित पवार यांच्‍या विषयी त्‍यांचे असलेले सुप्‍त प्रेम लपून राहिलेले नाही. महाविकास आघाडीच्‍या काळात मंत्रीमंडळात दोघे असतांना अजित पवार हे राजेश टोपे यांच्‍या विनंतीवरून कारखान्‍याच्‍या किंवा जालना जिल्‍ह्यामध्‍ये इतर कार्यक्रमासाठी अनेकदा आले होते.

मागील काळात राजेश टोपे यांनी अजित पवार यांच्‍या राष्‍ट्रवादीत यावे म्‍हणून राजेश टोपे यांना ऑफरही देण्‍यात आल्‍याच्‍या चर्चा ऐकायला मिळाल्‍या होत्‍या, परंतू राजेश टोपे यांनी मनोमन मविआचेच सरकार येणार आणि आपणही घनसावंगी मतदारसंघातून निवडून आल्‍यावर मंत्री होणार अशी खात्री उराशी बाळगली असावी, त्‍यामुळे त्‍यांनी शरद पवार यांच्‍या राष्‍ट्रवादीतच राहण्‍याचा निर्णय घेतला आणि शरद पवार यांच्‍या राष्‍ट्रवादी कडूनच निवडणूक लढवली सुध्‍दा, मात्र त्‍यांना अपयश आल्‍याने आता पुढं काय असा प्रश्‍न त्‍यांच्‍या समोर उभा राहिल्‍याची प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे.

पाण्‍याविना मासा !

असं म्‍हटलं जातं की, मासा पाण्‍यात आहे तो पर्यंत तो सुरक्षित असतो आणि पाण्‍याबाहेर आला की त्‍याचा जीव धोक्‍यात येतो, अस्‍वस्‍थ वाटू लागते, अशीच काही परिस्थिती काही राजकारणी मंडळीची असते. अर्थातच सर्वांच्‍याच बाबतीत माशांचे हे उदाहरण लागू पडत नसले तरी अनेकांच्‍या बाबतीत मात्र हे उदाहरण लागू पडत असल्‍याचे मागील काळात पहायला मिळालेले आहे. आता हे उदाहरण राजेश टोपे यांच्‍या बाबतीतही लागू पडते किंवा नाही हे आज सांगणे कठीण असले तरी येत्‍या काळात काही सांगता येत नाही अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे.

उगवत्‍या सूर्याला नमस्‍कार !

असं म्‍हटलं जातं की, प्रशासकीय अधिकारी मंडळी जो मंत्री, आमदार त्‍यांच्‍या समोर येईल त्‍यांना विशेष महत्‍व देतात. अर्थपूर्ण कामे करतात, सहकार्य करतात. त्‍यामुळे संबंधित आमदार महोदयांचे अर्थपूर्ण कार्यक्रम व्‍यवस्थित पार पडत असतात. कार्यकर्त्‍यांची गुत्‍तेदारी व्‍यवस्थित सुरू असते, सत्‍ता असल्‍यावर इकडून तिकडून बजेटची व्‍यवस्‍था सुरूच असते, यंत्रणा हातात असते. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्‍स अशा भानगडी नसतात, पण सत्‍ता नसली की मग सगळं उलटं होवून जातं. अर्थातच लोकं उगवत्‍या सूर्याला नमस्‍कार करतात अशी प्रतिक्रिया सुध्‍दा नागरिकांमधून येत आहे.

पर्याय अजितदादाच का ?

नुकत्‍याच बहुमत प्राप्‍त केलेल्‍या महायुती मध्‍ये 3 प्रमुख पक्ष आहेत, त्‍यापैकी एकनाथ शिंदे यांच्‍या शिवसेनेकडून डॉ.हिकमत उढाण हे घनसावंगी मतदारसंघातून निवडून आले आहेत, अर्थातच हिकमत उढाण आणि राजेश टोपे यांचा 36 चा आकडा असल्‍याचे बोलले जाते, त्‍यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्‍या शिवसेनेत जाण्‍याचा विचार सुध्‍दा करणार नाहीत असे बोलले जाते. दुसरा पर्याय भाजपचा आहे तर आतापर्यंत राजेश टोपे हे स्‍वत:ला धर्मनिरपेक्ष म्‍हणत आले आहेत अर्थातच सर्व धर्मीय समाज बांधवांसोबत त्‍यांचे फोटो बऱ्याचदा पहायला मिळतात. त्‍यामुळे मतदारसंघातील पुढील राजकारण लक्षात घेता ते भाजप बद्दल विचार करतील अशी शक्‍यता कमीच आहे. (अचानक विचार बदलल्‍यास काही सांगता येत नाही)

मग राहिला पर्याय अजित दादांचाच ! आता सत्‍ता स्‍थापन होणार असून अजित पवार उपमख्‍यमंत्री तथा अर्थमंत्री असणार हे जवळपास निश्चित आहे. अर्थातच अर्थमंत्री म्‍हणजे तिजोरीच्‍या चाव्‍या अजित पवार यांच्‍याकडेच असणार आहेत. अजित पवार आणि राजेश टोपे या दोघांनी अनेक वर्षे सोबत काम केलेलं आहे, अर्थपूर्ण नियोजन माहित आहे, विचार जुळतात, राजेश टोपेंना धर्मनिरपेक्ष शब्‍दप्रयोग करायला अडचण नाही. कारखाना, संस्‍था, प्रायवेट कामे इत्‍यादींना संरक्षण मिळेल. इनकम टॅक्‍स, ईडी, सीबीआय अशा भानगडी नाहीत, विधान परिषदेचे स्‍वप्‍नही पाहता येईल अशी चर्चा लोकांमधून ऐकायला मिळत आहे.

दुविधा मनस्थिती !

राजेश टोपे हे सन्‍माननीय शरद पवार यांच्‍याशी एकनिष्‍ठ आहेत, त्‍यांची इतरत्र जाण्‍याची 90% शक्‍यता नसेल, आतापर्यंतच्‍या त्‍यांच्‍या एकनिष्ठतेवर प्रश्‍नचिन्‍ह नसेलही, धर्मनिरपेक्षता, जनतेशी बांधिलकी, एकनिष्‍ठता, संयम, योद्धा हे सगळं खरं असेल, परंतू काय करावं राव, मजबुरी किंवा दुविधा मनस्थिती झाली आहे, गोड तलावातलं पाणी आटू द्यायचं की, त्‍यात पुन्‍हा वाढ करायची असा प्रश्‍न राहून राहून भैय्यासाहेबांना पडत असावा अशी प्रतिक्रिया काही ज्‍येष्‍ठ नागरिक देत आहेत.

मग आता पुढं काय ?

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, राजकारणात बेरीज आणि वजाबाकी दोन्‍हींचा विचार करून, शक्‍यतो आहे त्‍यात प्‍लस कसे होईल याचा विचार केला जातो. कोणता पक्ष किंवा गट चांगला आणि कोणता वाईट हा विषयच नाही, राजकारणात फायदा कुठं आहे शक्‍यतो आधी हे पाहिले जाते. वरील सांगितलेल्‍या गोष्‍टी होतीलच असे कोणीच ठामपणे सांगत नाही, परंतू तसं होण्‍याची शक्‍यता नाकारताही येणार नाही. त्‍यामुळेच की काय, मी येतोय, मी तुमचाच, हम साथ साथ है, हम आपके दिल में रहते है, तुमको ना भूल पाएंगे, या भावनेतून यदाकदाचित राजेश भैय्यांनी जर अजित दादांना “हम तुम्‍हारे है सनम” म्‍हटल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.


इतर बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!