एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून नुकतंच महायुतीचे उमेदवार डॉ.हिकमत उढाण हे विजयी झाले आहेत. कोणताही उमेदवार निवडून आल्यास अर्थात आमदार झाल्यास त्यांच्याकडून मतदारांच्या काही अपेक्षा असतात. एल्गार न्यूजने घनसावंगी मतदारसंघातील जनतेला नवनिर्वाचित आमदार डॉ.हिकमत उढाण यांच्याकडून काय अपेक्षा आहेत याबाबत प्रतिक्रिया पाठवण्याबाबत आवाहन केले होते. असंख्य बांधवांनी एल्गार न्यूजला प्रतिक्रिया पाठवल्या आहेत. त्या प्रतिक्रिया खालील प्रमाणे आहेत.
मुलभूत प्रश्न सोडवावेत !
मतदारसंघातील प्रत्येक गावाला जोडणारे रस्ते होणे आवश्यक आहे, जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था दूर करून चांगल्या दर्जाच्या शाळा कशा होतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, मतदारसंघात विविध प्रकारचे उच्च शिक्षण उपलब्ध करणे, जनतेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, वीजेचा प्रश्न मार्गी लावणे, रोजगार निर्मिती असे मुलभूत प्रश्न सन्माननीय आमदार महोदयांनी मार्गी लावावेत हीच अपेक्षा…
- एम.एन. गायकवाड, कुंभार पिंपळगांव
लायब्ररी सुरू करावी !
आमदार महोदयांनी मुलभूत प्रश्न तर सोडवावेच, सोबतच कुंभार पिंपळगांव सह मतदारसंघातील सर्कलच्या गावांमध्ये लायब्ररी (वाचनालय) सुरू करावे. सदरील लायब्ररी मध्ये सर्व प्रकारची पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध असावीत. जेणेकरून विद्यार्थी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करू शकतील शिवाय सर्वसामान्य नागरिकांना सुध्दा विविध पुस्तके वाचायला मिळतील. तसेच शक्य असल्यास कुंभार पिंपळगांव, तिर्थपुरी, घनसावंगी अशा सर्कलच्या ठिकाणी बेरोजगार युवकांना शासकीय योजनेच्या माध्यमातून EV रिक्शा मिळवून द्यावा जेणेकरून त्यांना रोजगारही मिळेल आणि शहराअंतर्गत व जवळ असलेल्या परिसरात जाणेही शक्य होईल.
- डॉ.के.एस.देशमुख, कुंभार पिंपळगांव
जनतेचे मुलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे !
समाज मुलभूत प्रश्नांपासून वर्षानुवर्षे वंचित आहे. हे मुलभूत प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत, यामध्ये रस्ते, पाणी, आरोग्य, वीज, शिक्षण, रोजगार इत्यादी प्रश्न आहेत. सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्नही प्रलंबित आहेत, शिवाय शेतकऱ्यांचेही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांना ज्या विविध अडचणींना सामोरे जावे लागते त्या अडचणी दूर होणे आवश्यक आहे. अधिकारी किंवा प्रशासनाकडून शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची तातडीने दखल घेतल्या जात नाही, वारंवार टाळाटाळ केली जाते त्यामुळे एका मर्यादित कालावधी मध्ये शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत अशी नवनिर्वाचित आमदार महोदयांकडून अपेक्षा आहे.
- अनुरथ (चाचू) गाढू, कुं.पिंपळगांव
गुंज परिसरातील रस्ते करावे !
एल्गार न्यूज जनतेच्या भावना आणि प्रतिक्रिया जाणून घेत आहे, त्याबद्दल अभिनंदन… नवनिर्वाचित आमदार यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व इतर विकास निधी मधून मतदारसंघातील रस्त्यांची कामे प्रामुख्याने करावीत, गुंज, श्रीपत धामनगांव, सावरगाव, काळूंकामाता वस्ती, नागोबाची वाडी, शिरसवाडी, भादली व गोदाकाठ परिसरातील गावांना जोडणारे रस्ते करावेत. मतदारसंघातील प्रत्येक गावाला जोडणारे रस्ते व्हावेत ही सर्वांची भावना आहे. तसेच मतदारसंघातील मुलभूत प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत.
- अनिल आर.वाघमारे
रस्त्यांचा प्रश्न गंभीर !
घनसावंगी मतदारसंघात रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे, या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. अंबड ते तिर्थपुरी, तिर्थपुरी ते भोगाव, तिर्थपुरी ते मंगरूळ, तिर्थपुरी ते कुंभार पिंपळगांव आणि महत्वपूर्ण असलेला तिर्थपुरी शहागड हे रस्ते येत्या काळात होणे अत्यंत गरजेचे आहे. येणाऱ्या ५ वर्षात जरी मतदारसंघातील रस्ते झाले तरी मतदारसंघातील जनता पुढील १० वर्षे दादांना विसरणार नाही.
- बाबासाहेब वाघमारे
एस.टी.आणि जि.प.शाळा वाचवा !
नवनिर्वाचित आमदार महोदयांनी एस.टी.बस आणि जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवाव्यात, कारण या दोन गोष्टी गरीबांसाठी खूप महत्वाच्या आहेत. कोणताही श्रीमंत व्यक्ती एसटीने प्रवास करत नाही आणि कुठल्याही श्रीमंत व्यक्तीची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत नाहीत. गावागावांपर्यंत एस.टी. बस कशी पोहचेल आणि नियमित कशी सुरू राहील यासाठी प्रयत्न करावेत तसेच जिल्हा परिषद शाळांची अत्यंत दुरावस्था झाली आहे त्यामुळे या शाळा सुध्दा चांगल्या व्हाव्यात आणि येथे चांगल्या दर्जाचे शिक्षण सुध्दा मिळावे यासाठी आमदार महोदयांनी प्रयत्न करावेत हीच अपेक्षा..
- आण्णासाहेब आडागळे, मुर्ती
भादली परिसरातील प्रश्न सोडवावेत !
गोरगरीब जनतेचे प्रश्न जाणून घेत आहात त्याबद्दल एल्गार न्यूजचे अभिनंदन… २५ वर्षे झाले तरी आमचे अनेक प्रश्न सुटले नाहीत, नवनिर्वाचित आमदार डॉ.हिकमत उढाण यांनी मतदारसंघातील मुलभूत प्रश्न सोडवावेत. तसेच सिंचनाच्या दृष्टीने डाव्या कालव्याच्या चारी नं.३२ च्या दोन्ही बाजुला भर देवून क्षमता वाढवावी, पांदन रस्ते मजबूत करून पुलाचे काम करणे, शेतमालाला योग्य भाव आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. मतदारसंघातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे, रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा ही अपेक्षा..
- दिनकर तौर, भादली
रोजगार उपलब्ध व्हावा !
घनसावंगी मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. मतदारसंघात औद्योगिक वसाहत (Mini MIDC) होणे गरजेचे आहे. यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि त्यामुळे या युवकांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य होईल. डॉ.हिकमत उढाण यांनी मतदारसंघात शाळा, महाविद्यालय, सहकारी बॅंक स्थापन करावी जेणेकरून मतदारांच्या अनेक अडचणी दूर होतील. याशिवाय रस्ते, वीज, पाणी, आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे, त्यामुळे मुलभूत प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे.
- कुलदीप पवार, विरेगव्हाण तांडा
मुलभूत प्रश्न सोडवावेत !
कुंभार पिंपळगांव शहरातील विजेची प्रश्न सोडवावा, शहरात आधुनिक कला, वाणिज्य व विज्ञान आणि आयटी कॉलेज स्थापन करावे. गावातच रोजगाराची संधी उपलब्ध करावी. पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करावी, अंतर्गत आणि परिसरातील रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करावे. चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध कराव्यात, प्रशासकीय अधिकाऱ्यांना गावात किमान 8 तास थांबण्याची ताकीद द्यावी, गाव परिसरातील अवैध धंदे बंद करावेत, गावातील दारूची दुकाने गावाबाहेर करावी. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तातडीने मार्गी लागतील याबाबत योग्य ती पाऊले उचलावीत ही अपेक्षा..
- गणेशलाल वैष्णव, कुं.पिंपळगांव
सर्वप्रथम रस्ते करा !
घनसावगी मतदारसंघात सर्वात आधी रस्ते व्हावेत हीच सर्वांची भावना आहे. रस्ते नसल्यामुळे अनेक गावांना जात येत नाही. पावसाळ्यात तर अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरून चिखल तुडवीत पायी जावे लागते, या रस्त्यावरून चालणे मुश्किल असते मग वाहन घेवून जाण्याचा तर विचारच करता येत नाही. २५ वर्षात मतदारसंघात रस्ते झाले नाहीत त्यामुळे यंदा लोकांनी परिवर्तन केले. डॉ.हिकमत उढाण यांनी मतदारसंघातील गावांना जोडणारे रस्ते चांगल्या दर्जाचे केले तर पुढील वेळेस लोकं त्यांना डोळे झाकून मतदान करतील.
- युसूफ सिद्दीकी
लांब पल्ल्याच्या बसेस सुरू व्हाव्यात !
अंबड आगाराच्या काही बसेस अंबड – कुंभार पिंपळगांव या मार्गावर सुरू आहेत, परंतू अंबड ते आष्टी, अंबड ते पाथरी, अंबड ते कुंभार पिंपळगांव – माजलगाव, जालना ते कुंभार पिंपळगांव माजलगाव, परतूर ते गेवराई, परतूर ते अंबड या बसेसही सुरू कराव्यात आणि सोबतच इतर आगार जसे की, पाथरी, परभणी, माजलगाव, गेवराई, बीड, छत्रपती संभाजीनगर अशा आगारांच्या माध्यमातूनही लांब पल्ल्याच्या कुंभार पिंपळगाव मार्गे बसेस सुरू कराव्यात यासाठी आमदार महोदयांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण या भागातून लांब पल्ल्याच्या गाड्या नसल्यामुळे प्रवाशांना अनेक टप्पे करून किंवा गाड्या बदलून प्रवास करावा लागतो.
- भागवत राऊत, कुं.पिंपळगांव
जनतेच्या समस्या सोडवा !
सर्वसामान्य जनतेला लागतंय तरी काय ? रस्ते, पाणी, निवारा, वीज, आरोग्य, रोजगार अशा मुलभूत समस्या आणि प्रश्न आहेत जे वर्षानुवर्षे संपलेले नाहीत. योजनांचा लाभ सहजपणे मिळत नाही, घनसावगी मतदारसंघातील सदरील प्रलंबित मुलभूत प्रश्न डॉ.हिकमत उढाण यांच्या माध्यमातून सुटतील अशी अपेक्षा आहे. मतदारसंघातील जनतेने खूप अपेक्षेने डॉ.हिकमत उढाण यांना निवडून दिलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा सर्वांगिण विकास होईल अशी मतदारांची भावना आहे.
- अंबादास गायकवाड
गुमनाम प्रतिक्रिया !
एल्गार न्यूजला अनेक बांधवांनी प्रतिक्रिया पाठवल्या आहेत, कोणी ४ ओळीत, कोणी १० ओळीत कोणी १५ ओळीत अशा प्रकारे मतदारसंघातील अनेक बांधवांनी आपापल्या प्रतिक्रिया पाठवल्या आहेत, मात्र यापैकी अनेकांनी नाव प्रकाशित न करण्याची विनंती केली आहे. नाव प्रकाशित न करण्याची त्यांनी कारणे सांगितली नसली तरी त्यांची अडचण आम्ही समजू शकतो, मात्र नाव न टाकता त्यांच्या अपेक्षा किंवा मागणीचा सारांश खाली देत आहोत.
मुलभूत प्रश्नांसाठी जनता आग्रही !
मतदारसंघातील बहुतांश नागरिकांना सर्वप्रथम मतदारसंघातील रस्ते व्हावेत, अर्थातच प्रत्येक गावाला रस्ता असावा जेणेकरून दळणवळणाची सुविधा योग्य प्रकारे सुरू होईल. यासह मतदारसंघातील आरोग्य सेवा सुमार दर्जाची असून आधुनिक दर्जाच्या शासकीय आरोग्य सेवा मिळाव्यात. कुंभार पिंपळगांव येथे ग्रामीण रूग्णालय व्हावे, तिर्थपुरी, घनसावंगी उपजिल्हा रूग्णालयात आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, मतदारसंघातील वीजेचा प्रश्न मार्गी लागावा, मतदारसंघातील कोरडवाहू शेती ओलीताखाली येण्यासाठी प्रयत्न व्हावेत, शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण मिळावे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा. चांगल्या दर्जाच्या KG to PG शाळा, महाविद्यालय सुरू व्हावेत, युवक युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा.
मतदारसंघात Mini MIDC व्हावी, विविध योजनांच्या माध्यमातून तरूणांना कर्ज पुरवठा व्हावा, बॅंकांनी सहजतेने कर्ज द्यावे, व्यापारी बांधवांचे प्रश्न मार्गी लागावेत, मतदारसंघात रोजगार निर्माण करणारे नवीन प्रोजेक्ट यावेत, महिला माता भगीनींचे प्रश्न सुटावेत, शासकीय योजनांचा लाभ सहजतेने मिळावा, सर्व शासकीय कार्यालयात ठराविक वेळेत जनतेची कामे व्हावीत, मतदारसंघातील गावागावात सार्वजनिक वाहतूक सेवा (बस) सुरू व्हावी, लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू व्हाव्यात, कुंभार पिंपळगावात पोलीस ठाणे व्हावे, गल्हाटी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागावा, मतदारसंघातील जनतेला स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी, सर्व जाती धर्माच्या नागरिकांना समानता आणि न्यायाच्या भुमिकेतून सहकार्य मिळावे, एकता रहावी, मतदारसंघात गुंडगिरीला थारा न देता भयमुक्त वातावरण निर्माण व्हावे, यासोबतच आमदार महोदयांना सहज संपर्क साधता यावा यादृष्टीने यंत्रणा असावी अशी अपेक्षा मतदारसंघातील जनतेने व्यक्त केली आहे.
पाठपुरावा करणार !
येत्या काळात घनसावंगी मतदारसंघाच्या विविध प्रश्नांवर एल्गार न्यूज द्वारे लेखणीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार आहे. शिवाय पुढील काळात विविध क्षेत्रातील नागरिकांच्या तटस्थपणे प्रतिक्रिया सुध्दा प्रकाशित केल्या जाणार आहेत. एकूणच आहे ती परिस्थिती बदलावी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत अशी जनतेची भावना आहे, त्यामुळे या प्रसंगी एका शायरच्या दोन ओळी नमूद कराव्याशा वाटतात की, “माना की अंधेरा घना है मगर दिया (दीप) जलाना कहां मना है”….