एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
निवडणुकीच्या काळात कधी काय घडेल, कोण काय मागणी करेल आणि कोणत्या गोष्टीची चर्चा होईल काहीच सांगता येत नाही. आता एका अपक्ष उमेदवाराच्या अजब मागणीमुळे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना डोक्याला हात लावायची वेळ आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, परंडा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गुरूदास कांबळे यांची निशानी चप्पल आहे, आचारसंहितेचा भंग होवू नये म्हणून त्यांनी एक अजब मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे, त्यांनी केलेल्या मागणीचे पत्र आणि अर्थातच हा विषय राज्यभ्रात चर्चेचा विषय ठरत आहे.
उमेदवाराची मागणी काय ?
मी गुरुदास संभाजी कांबळे अपक्ष उमेदवार अनुक्रमांक 12 निशाणी चप्पल आपणास कळवू इच्छितो की सध्या आदर्श आचारसंहिता लक्षात घेता नियमाप्रमाणे मतदान बुथ पासून 200 मीटरच्या आत कोणत्याही उमेदवाराचे चिन्ह प्रकाशित किंवा प्रदर्शित करण्यास सक्त मनाई असल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ शकतो व आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारचा भंग होऊ नये म्हणून मी गुरुदास कांबळे आपणास लेखी अर्ज करतो की माझी निशाणी चप्पला असून त्याचा प्रचार व प्रसार मतदान बूथ पासून 200 मीटर च्या आत आचारसंहिता भंग होऊ नये याची मी स्वतः दखल घेत असून त्याकरिता दिनांक 20/11/2024 रोजी मतदानाच्या दिवशी मतदान बूथच्या 200 मीटर अंतरामध्ये कोणतेही कर्मचारी, पदाधिकारी, उमेदवार व मतदार यांनी जर 200 मीटरच्या आत चप्पल घालून प्रवेश केल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी.’कारण चप्पल ही माझी निशाणी असल्यामुळे ती पायात घातल्याने माझा प्रचार व प्रसार लोकांनी पायात घालून प्रवेश केल्याने होऊ शकतो व आचार सहितेचा भंग होवू शकतो, असं या पत्रकात म्हटलं आहे. शिवाय 200 मिटरच्या आत कोणाच्याही पायाला दुखापत होवू नये याचीही व्यवस्था करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
प्रतिबंध नाही !
चप्पल ही दैनंदीन वापरातील वस्तू असून याबाबतच्या वापरास कोणासही प्रतिबंध करता येत नाही, त्यामुळे ही तक्रार निकाली काढण्यात येत असल्याचे संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सर्वत्र चर्चा !
संबंधित उमेदवाराने केलेली अजब मागणी सध्या चर्चेचा विषय ठरत असून सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अर्थातच कधी कोणती गोष्ट चर्चेचा विषय ठरेल काही सांगता येत नाही एवढे मात्र नक्की…