Your Alt Text

बातमीचा परिणाम : खड्डे बुजवण्‍यास सुरूवात ! मलमपट्टी नको, प्रश्‍नाचं उत्‍तर हवंय की, घनसावंगी – कुं.पिंपळगांव ते आष्‍टी या हायवेवर एवढ्या लवकर खड्डे पडलेच कसे ? आणि नेते गप्‍प का ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
निकृष्‍ट दर्जाचे रस्‍ते करून कोट्यावधीचा मलिदा लाटण्‍याची परंपराच झाली आहे का ? अवघ्‍या दोन वर्षांचा कालावधीही झाला नसेल तरीही एखाद्या हायवे (महामार्ग) वर मोठमोठे खड्डे पडत असतील तर त्‍याचा अर्थ काय घ्‍यायचा ? एल्‍गार न्‍यूजने याबाबत बातमी प्रकाशित केल्‍यानंतर बांधकाम विभागाने संबंधित गुत्‍तेदाराला कानपिचक्‍या दिल्‍यानंतर आता घनसावंगी ते कुंभार पिंपळगाव – आष्‍टी या महामार्गावर खड्डे बुजवण्‍यात येत असल्‍याचे दिसत आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, शासनाने जागतिक बॅंकेच्‍या सहकार्याने पाचोड-अंबड-घनसावंगी- कुंभार पिंपळगांव – आष्‍टी या महामार्गाचे म्‍हणजेच 4 तालुक्‍यातून जाणाऱ्या महामार्गाचे काम संबंधित एजन्‍सीच्‍या माध्‍यमातून केले, परंतू संबंधित एजन्‍सी अथवा गुत्‍तेदाराने कदाचित जास्‍त कमवण्‍याच्‍या नादात घनसावंगी – कुंभार पिंपळगांव ते आष्‍टी या रस्‍त्‍याचे काम एवढे निकृष्‍ट दर्जाचे केले आहे की जागोजागी या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अर्थातच आता मलमपट्टी सुरू आहे.

मागील जवळपास 20 वर्षात या रस्‍त्‍याचे काम झाले नव्‍हते, मागील काळात अंबड ते आष्‍टी पर्यंत (60 कि.मी.) प्रवास करण्‍यासाठी जवळपास 3 तासांचा कालावधी लागत होता एवढे खड्डे या रस्‍त्‍यावर होते, त्‍यामुळे या रस्‍त्‍यावरून प्रवास करावा किंवा नाही असा प्रश्‍न वर्षानुवर्षे नागरिकांना किंवा वाहनधारकांना पडत होता. त्‍यामुळे जेव्‍हा कधी रस्‍ता होईल तो चांगलाच व्‍हावा अशी सर्वांची भावना होती.

शासनाने जागतिक बॅंकेच्‍या सहकार्याने छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्‍या सार्वजनिक बांधकाम मंडळा अंतर्गत सदरील रस्‍त्‍याचे काम केले. मागील 2 वर्षांपूर्वी या महामार्गाचे काम करण्‍यात आले, आता चांगला रस्‍ता होईल आणि चिंता राहणार असे नागरिकांना वाटत होते, परंतू अवघ्‍या 2 वर्षातच या रस्‍त्‍यावर मोठमोठे खड्डे पडल्‍यामुळे या रस्‍त्‍यासाठी मंजूर असलेले कोट्यावधी रूपये खर्च कुठे करण्‍यात ? आले असा सवाल उपस्थित केला जात आहे.

fjslkfjlsfdlksfsfds22

रस्‍त्‍याचे काम निकृष्‍ट दर्जाचे  !

या महामार्गावर सदरील खड्डे काही एक दोन ठिकाणी पडले नसून घनसावंगी – कुंभार पिंपळगांव ते आष्‍टी पर्यंत जागोजागी हे मोठमोठे खड्डे दिसून येत आहेत. सदरील रस्‍त्‍याचे काम करतांना जेवढे मटेरियल वापरणे अपेक्षित होते तेवढे वापरण्‍यात आले नाही हे स्‍पष्‍टपणे दिसून येते. सदरील डांबरीकरण करण्‍यात आलेल्‍या रस्‍त्‍यावरील खड्डे पाहिल्‍यास या रस्‍त्‍यावर मटेरियल वापरतांना 2 इंच सुध्‍दा मटेरियल वापरण्‍यात आले आहे किंवा नाही असा प्रश्‍न पडतो. अक्षरश: रस्‍त्‍यावरील खड्डे पाहिल्‍यास आजूबाजूची लेयर अत्‍यंत पातळ असल्‍याचे दिसत आहे.  या रस्‍त्‍याला अंदाजे 2 वर्षांचा कालावधी सुध्‍दा झाला नसेल मग एवढ्या लवकर रस्‍ता खराब झालाच कसा ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

महामार्गावर मोठी वर्दळ !

सदरील महामार्ग हा पाचोड (जि.छत्रपती संभाजीनगर) येथून सुरू होतो, तेथून जालना जिल्‍ह्यातील अंबड – घनसावंगी – कुंभार पिंपळगांव – आष्‍टी आणि पुढे पाथरी (जि.परभणी) पर्यंत जातो. म्‍हणजेच हा रस्‍ता पाथरी – माजलगाव या महामार्गाला जावून अटॅच होतो. याचाच अर्थ छत्रपती संभाजीनगरकडून हजारोच्‍या संख्‍येने येणारी वाहने तर आहेच मात्र हा रस्‍ता आष्‍टीच्‍या पुढे परभणी जिल्‍ह्याच्‍या हद्दीपर्यंत जात असल्‍याने परभणी, नांदेड सहित आंध्र प्रदेश, आणि तेलंगना अशा विविध राज्‍यातील वाहतुक सुध्‍दा याच मार्गाने मोठ्या प्रमाणावर होत आहे.

क्‍वालिटी कंट्रोल विभाग कुठंय ?

या महामार्गाचे काम होत असतांना क्‍वालिटी कंट्रोल किंवा बांधकाम विभागाने डोळे झाकून कामावर शिक्‍कामोर्तब केले का ? शासन कोणत्‍याही प्रकारचे काम केल्‍यावर त्‍याची वरिष्‍ठ अधिकाऱ्यांच्‍या माध्‍यमातून तपासणी करत असते, इस्‍टीमेट प्रमाणे व अनेक वर्षे रस्‍ता खराब होणार नाही या दृष्‍टीने अशा महामार्गाचे काम होत असते, मात्र जेव्‍हा हे कोट्यावधी रूपयांचे काम पूर्ण झाले तेव्‍हा क्‍वालिटी कंट्रोलच्‍या अधिकाऱ्यांनी किंवा बांधकाम विभागाच्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी या रस्‍त्‍याच्‍या कामाची पाहणी आणि कामाचा दर्जाचा चेक केला नाही का ? जर तपासणी केली असेल तर अधिकाऱ्यांना रस्‍त्‍याचे काम निकृष्‍ट दर्जाचे झाले आहे हे लक्षात आले नाही का ? खिसे गरम करून कामाच्‍या दर्जाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्‍यात आले का ? असे अनेक प्रश्‍न यानिमित्‍ताने उपस्थित होत आहेत.

मलमपट्टी करण्‍याचा प्रयत्‍न !

एल्‍गार न्‍यूजने बातमीच्‍या माध्‍यमातून महामार्गावर एवढ्या लवकर खड्डे पडलेच कसे ? असा प्रश्‍न उपस्थित केल्‍यानंतर बांधकाम विभागाने संबंधित एजन्‍सी अथवा गुत्‍तेदाराच्‍या माध्‍यमातून खड्डे भरण्‍यास सुरूवात केली आहे, अर्थात थातूरमातूर मलमपट्टी करण्‍यात येत आहे. मात्र पुन्‍हा तोच प्रश्‍न उपस्थित होतो की, तुम्‍ही गावातल्‍या एखाद्या गल्‍लीचा रस्‍ता करत नाहीत, तर राज्‍य महामार्गाचे (Highway) चे काम करत आहात याचे भान संबंधितांना नव्‍हते का ? कारण एवढ्या लवकर रस्‍ताच खराब झालाच कसा ? या प्रश्‍नाचे उत्‍तर संबंधित एजन्‍सी आणि बांधकाम विभागाने देणे अपेक्षित आहे. कारण हा विषय जागतिक बॅंकेच्‍या अधिकाऱ्या पर्यंत गेल्‍यास अशा कामांना निधी द्यावा किंवा नाही असा प्रश्‍न त्‍यांना पडणार नाही का ? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पाठीशी घालण्‍याचा प्रयत्‍न !

सदरील महामार्गाचे काम अंदाजे 250 कोटीच्‍या आसपास असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. मग एवढ्या मोठ्या महामार्गाचे काम कोट्यावधी रूपये खर्च करूनही निकृष्‍ट दर्जाचे होत असेल आणि तरीही संबंधित एजन्‍सी अथवा गुत्‍तेदाराला मलमपट्टी म्‍हणून नावाला खड्डे भरण्‍याची शिक्षा देवून बांधकाम विभाग सोडत असेल तर यामध्‍ये वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनीही हात धुवून तर घेतले नाही ना ? संबंधित एजन्‍सी अथवा गुत्‍तेदाराने मोठ्या अधिकाऱ्यांना सुध्‍दा मॅनेज करून खिसे गरम तर केले नाही ना ? शासनाचे कोट्यावधी रूपये पाण्‍यात जावूनही संबंधित एजन्‍सी अथवा गुत्‍तेदारावर कारवाई होत नसेल तर कुठे तरी पाणी मुरतंय असंच म्‍हणावे लागेल.

रस्‍ता पुन्‍हा नाही !

एकतर जवळपास 20 वर्षे चांगला रस्‍ता व्‍हावा म्‍हणून वाट पहावी लागली, आता कुठे रस्‍त्‍याला कोट्यावधी रूपये मंजूर झाले होते, आताही जर रस्‍ता निकृष्‍ट दर्जाचा होत असेल आणि कोणीही बोलणार नसेल तर यापुढे किती वर्षे या रस्‍त्‍याचे काम होणार नाही हे सांगता येणार नाही. आजच जागोजागी खड्डे पडत असतील तर येत्‍या काही महिन्‍यात या रस्‍त्‍याची चाळणी झाल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही.

नेते, अधिकारी गप्‍प का ?

घनसावंगी मतदारसंघातून जवळपास 50 कि.मी. हा महामार्ग गेलेला आहे, फक्‍त घनसावंगी तालुकाच नव्‍हे तर अनेक तालुके आणि जिल्‍ह्यांना जोडणाऱ्या या महामार्गाचे काम कोट्यावधी रूपये खर्चूनही निकृष्‍ट दर्जाचे होत असेल तर विविध नेते गप्‍प का आहेत ? नेत्‍यांनी निवडणुकीतच फक्‍त भाषणे ठोकायची का ? बांधकाम विभाग आणि संबंधित एजन्‍सीला जाब विचारायला काही अडचण आहे का ? किंवा एखाद्या नेत्‍याने या कामातही हात धुवून घेतले आहेत का ? वरिष्‍ठ अधिकारीही गप्‍प का आहेत ? या निकृष्‍ट कामाला कोणाकोणाचा आशिर्वाद आहे ? असे अनेक प्रश्‍न यानिमित्‍ताने उपस्थित होत आहेत.


यापूर्वी सदरील महामार्गाची प्रकाशित झालेली बातमी वाचा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!