एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
सध्याचं राजकारण, प्रत्येकाची सुरू असलेली बेरीज-वजाबाकी आणि मतदारसंघात सुरू असलेला गोंधळ पाहून कोणाला म्हणावं “हम तुम्हारे है सनम” आणि कोणाला म्हणावं “हम आपके है कौन ?” असा प्रश्न घनसावंगी मतदारसंघातील जनतेला पडला असेल असंच म्हणायची वेळ आली आहे.
खरं तर ही परिस्थिती सगळीकडचीच असेल असंही म्हणता येईल, परंतू बदललेल्या राजकीय समिकरणामुळे, वेगवेगळ्या फॅक्टरमुळे आणि सर्वच उमेदवारांशी असलेल्या संबंधांमुळे घनसावंगी मतदारसंघात मतदारांसमोर काहीशी विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याचे मत अनेक मतदार व्यक्त करत आहेत.
जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांची अडचण नाही, ते तर उघडपणे आपापल्या उमेदवाराला मतदान करतील असे गृहीत धरता येईल. परंतू जे सर्वसामान्य मतदार आहेत त्यांच्यासामोर काही अंशी का असेना थोडा पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे. कारण “खामोशियॉं बेवजह नहीं होती, कुछ दर्द आवाज छीन लिया करते हैं…
उसाचे राजकारण !
घनसावंगी मतदारसंघात फक्त ऊस उत्पादक शेतकरीच आहेत अशातला भाग नाही, इतर शेतकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे, परंतू तरीही कोट्यावधी रूपयांची उलाढाल आणि अर्थकारण पाहता आतापर्यंत राजकारण बऱ्याचदा उसाच्या अवतीभवती फिरतांना दिसत होते. मात्र सर्वांच्या प्रयत्नाने ही अडचण बऱ्यापैकी दूर झाली आहे. अर्थातच कारखान्यांची संख्या वाढल्याने शिवाय सर्वांनी गाळप क्षमता वाढवल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि भविष्यातही सर्वांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील अशी आशा करायला हरकत नाही, त्यामुळे आता इतर प्रलंबित प्रश्न आणि समस्यांवर बोलणे आवश्यक झाले आहे.
सगळे उमेदवार परिचित !
सध्या निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले काही प्रमुख उमेदवार हे सर्वपरिचित आहेत. या प्रमुख उमेदवारांनी घनसावंगी मतदारसंघात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केलेली आहे. कमी अधिक प्रमाणात का असेना सदरील प्रमुख उमेदवार हे प्रत्येक गाव खेड्या वस्त्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. कोणी कोणाची अडचण दूर केलेली आहे, कोणी मदत केलेली आहे, कोणी दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कोणी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य केलेले आहे.
मग मतदान कोणाला ?
जो उमेदवार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह मतदारसंघात शासनाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे शिक्षण मोफत किंवा कमी खर्चात उपलब्ध करून देवू शकेल, शक्यतो उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज पडू नये यासाठी प्रयत्न करेल, सर्व प्रकारचे उपचार मोफत किंवा कमी खर्चात उपलब्ध करू शकेल आणि ढासळलेली आरोग्यव्यवस्था सुधारून आधुनिक उपचार उपलब्ध करू शकेल, जो उमेदवार बेरोजगार युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देवू शकेल, बेरोजगारांना विविध योजनांच्या माध्यमातून सहजपणे कर्ज उपलब्ध करून देवू शकेल, मतदारसंघात Mini MIDC सह उद्योग धंदे सुरू करण्याचा प्रयत्न करेल, गावागावाला जोडणारे मजबूत रस्ते तयार करू शकेल, विजेची समस्या दूर करेल, वेगवेगळे प्रोजेक्ट मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न करेल, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून भयमुक्त वातावरण निर्माण करेल, सर्व जाती धर्माच्या नागरिकांना समान न्याय देण्याची भुमिका ठेवेल आणि मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करेल अशा उमेदवारालाच आपले अमुल्य मतदान देणे हीच काळाची गरज बनली आहे.
मग सर्वांना खुश कसं करणार ?
घनसावंगी मतदारसंघात उभे असलेले सदरील काही प्रमुख उमेदवार मातब्बर आहेत, राज्यस्तरापर्यंत त्यांचे संबंध आहेत, काम कसे करायचे याचीही माहिती त्यांना आहे. त्यातच सर्वांचे नेटवर्क सुध्दा ग्राउंड लेवल पर्यंत आहे. शिवाय कोणाचे ना कोणाचे पाठबळ असल्याने निवडून कोण येईल हे आजच्या क्षणाला ठामपणे सांगणे थोडे घाईचे ठरेल अशी परिस्थिती मतदारांना दिसत आहे. अशा परिस्थितीत सर्वच उमेदवार भेटीगाठी घेत असतांना कोणाला नाराज करणे योग्य आहे का ? असा सवालही मतदारांना पडला आहे. त्यामुळे कोणालाही “हम आपके है कोण ?” हा शब्दप्रयोग न करता सर्वांना “हम तुम्हारे है सनम” हा किंवा अशा प्रकारचा इतर प्रेमळ शब्दप्रयोग करणेच योग्य राहील अशी प्रतिक्रियाही मतदार देत आहेत.