एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी सणानिमित्त मार्केट मध्ये मोठी गर्दी तर दिसून येत आहे, मात्र अनेक दुकानदार रिकामे बसलेले दिसून येत आहेत. असा विरोधाभास का ? आणि कशामुळे ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरेदी – विक्री सुरूच नाही अशातला भाग नाही. उदाहरणार्थ मोठमोठ्या कापड दुकानांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत असली तरी दरवर्षी इतर व्यवसाय करणाऱ्या छोट्या दुकानदारांकडे सुध्दा ज्या प्रमाणे गर्दी असते किंवा विक्री होते तशी विक्री नाही असे अनेक व्यापारी बांधव बोलून दाखवत आहेत.
दरवर्षी दिवाळीच्या सिझन मध्ये सामान्यत: अशी परिस्थिती असते की, विविध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक दुकानदाराकडे गर्दी असते, अर्थातच मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. मात्र यंदा तशी परिस्थिती दिसून येत नाही. फटाक्यांच्या दुकानात तर दिवाळीच्या काळात गर्दी असतेच त्यात काही नवल नाही. मात्र कापड, किराणा असे काही मोजके ते सुध्दा मोठे दुकानदार सोडले तर विविध व्यवसायाच्या बहुतांश छोट्या दुकानदारांकडे ग्राहकांची संख्या मर्यादित असल्याचे दिसत आहे.
शेतकरी सुखी तर सर्व सुखी !
ग्रामीण भागातील अर्थचक्र हे पूर्णत: शेतकऱ्यांवर अवलंबून आहे, शेतकरी बांधवांकडे पैसा असेल तर मार्केट मध्ये पैसा येतो हे सामान्यत: गणित आहे. मात्र आस्मानी आणि सुल्तानी संकटांमुळे वेळोवेळी शेतकरी अडचणीत सापडत आहे. शेती मध्ये लावलेला पैसा सुध्दा निघणे अवघड झाल्याने शेतकरी हवालदिल आहेत. एकीकडे प्रचंड मेहनत करूनही अपेक्षित उत्पन्न होतांना दिसत नाही तर दुसरीकडे शेतमालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी वारंवार अडचणीत सापडत आहेत.
मर्यादित खरेदी !
ज्या प्रमाणे दरवर्षी दिवाळी मध्ये सर्वच प्रकारच्या दुकानांमध्ये ग्राहक दिसून येतात, तशी परिस्थिती यावर्षी दिसून येत नाही. दिवाळी सण असल्यामुळे कपडे, किराणा आणि इतर काही आवश्यक वस्तूंची मर्यादित स्वरूपात खरेदी होतांना दिसत आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते सोने, चांदी इत्यादी गोष्टी सुध्दा खरेदी करत आहेत, मात्र सर्वसामान्य ग्राहकांचा विचार केल्यास छोट्या दुकानांमध्ये ग्राहकांची संख्या मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. जे खरेदी करत आहेत तेवढेच ग्राहक आहेत अशातला भाग नाही, जे गोरगरीब आर्थिक अडचणींमुळे खरेदी करू शकत नाहीत किंवा खूप कमी खरेदी करत आहेत, असे सुध्दा असंख्य नागरिक आहेत, त्यांचाही विचार करणे क्रमप्राप्त ठरते.
दुकानांच्या संख्येत वाढ !
दरवर्षी दुकानांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रत्येकाला नोकरी मिळू शकत नाही यात शंका नाही, त्यामुळे तरूणांना कुटुंबाचा प्रपंच चालवण्याच्या दृष्टीने छोटा मोठा व्यवसाय करणे क्रमप्राप्त झाले आहे. काही वर्षांपूर्वीची परिस्थिती पाहिल्यास गाव असो किंवा शहर अनेक व्यवसायाच्या मर्यादित दुकान होत्या, मात्र आज परिस्थिती खूप बदलली आहे. आधी छोट्या शहरांमध्ये सुध्दा एखाद्या व्यवसायाच्या 5 ते 10 दुकाने दिसत होत्या मात्र आता त्याच व्यवसायाची 50 ते 100 दुकाने झाली आहेत, त्यामुळेही व्यवसायावर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.
ऑनलाईनचा फटका !
आजकाल ऑनलाईन खरेदी सुध्दा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गाव स्तरापर्यंत ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांनी आपले नेटवर्क मजबूत केल्याने त्याचा परिणाम छोट्या व्यापाऱ्यांवर होतांना दिसत आहे. खरं तर आपल्या गांव शहरातील सर्वसामान्य व्यापाऱ्यांच्या माध्यमातून पैसा मार्केट मध्ये फिरत असतो, व्यवहार होत असतात. स्थानिक पातळीवर खरेदी विक्री वाढली तर त्याचा फायदा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सर्वांनाच होत असतो, परंतू काही पैसे वाचवण्याच्या नादात ऑनलाईन खरेदी करून आपण आपलीच व्यापार व्यवस्था अडचणीत आणत असल्याचे दिसत आहे.
आजचे युग हे स्पर्धेचे आहे यात शंका नाही. स्थानिक व्यापारी बांधवांनीही जास्त तफावत न ठेवता ग्राहकांना योग्य त्या दरात वस्तू कशी उपलब्ध करून देता येईल या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहेच. मात्र तरीही आपण सर्व एकमेकांच्या दुकानातून वस्तू खरेदी करणारे ग्राहक आहोत आणि आपण स्थानिक व्यापारी बांधवांकडूनच वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थितीत बऱ्याच अंशी सुधारणा होवू शकते.
ज्या वस्तू आपल्या गांव, शहरात मिळत नाहीत, त्या वस्तू ऑनलाईन मागवायला काहीच हरकत नाही, शिवाय खूप मोठा फरक असेल तरीही हरकत नाही. परंतू ज्या वस्तू आपल्या गाव, शहरात थोड्याफार फरकाने का असेना उपलब्ध आहेत त्या वस्तू आपण स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच घेणे आवश्यक आहे. कारण, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीशी ऑनलाईनवाल्यांना काहीही देणेघेणे नाही. तसेच ग्रामीण / शहरी अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होत आहेत याच्याशीही त्यांना काही देणेघेणे नाही. शिवाय अडीअडचणीत ऑनलाईनवाले धावून येणार नाहीत हे सुध्दा तितकेच खरे आहे.
असो, येत्या काळात परिस्थिती बदलेल आणि सर्व व्यापारी, शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरीबांसह सर्वच क्षेत्रातील नागरिकांच्या जीवनात सुख समृध्दी येईल अशी आशा करूया… तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला येणारा प्रत्येक क्षण सुख, समृध्दी, आरोग्यदायी, आनंदाचा व प्रगतीचा जावो हीच सदिच्छा… दिवाळी निमित्त आपणास मन:पूर्वक शुभेच्छा….