एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
शासनाने जागतिक बॅंकेच्या सहकार्याने पाचोड-अंबड-घनसावंगी- कुंभार पिंपळगांव – आष्टी या महामार्गाचे काम संबंधित एजन्सीच्या माध्यमातून केले, परंतू संबंधित एजन्सी अथवा गुत्तेदाराने कदाचित जास्त कमवण्याच्या नादात कुंभार पिंपळगांव ते आष्टी या रस्त्याचे काम एवढे निकृष्ट दर्जाचे केले आहे की जागोजागी या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील काळात पाचोड – अंबड – घनसावंगी – आष्टी हा रस्ता अत्यंत खराब होता, सदरील रस्ता (राज्य महामार्ग) अनेक जिल्हे तालुक्यांना जोडणारा असतांनाही या रस्त्याचे काम अनेक वर्षे झाले नव्हते. त्यामुळे शासनाने जागतिक बॅंकेच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या सार्वजनिक बांधकाम मंडळा अंतर्गत सदरील रस्त्याचे काम केले.
मात्र बांधकाम विभागाने ज्या कोण्या एजन्सी अथवा गुत्तेदाराला या रस्त्याचे काम दिले होते त्याने याच महामार्गात येणाऱ्या जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी) ते – आष्टी (ता.परतूर) रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे. रस्त्याचे काम एवढ्या निकृष्ट दर्जाचे झाले आहे की, कुंभार पिंपळगांव ते आष्टी (अंदाजे 18 km) या महामार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सदरील खड्डे काही एक दोन ठिकाणी पडले नसून कुंभार पिंपळगांव ते आष्टी पर्यंत जागोजागी हे मोठमोठे खड्डे दिसून येत आहेत.
रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे !
सदरील रस्त्याचे काम करतांना जेवढे मटेरियल वापरणे अपेक्षित होते तेवढे वापरण्यात आले नाही हे स्पष्टपणे दिसून येते. सदरील डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावरील खड्डे पाहिल्यास या रस्त्यावर मटेरियल वापरतांना 2 इंच सुध्दा मटेरियल वापरण्यात आले आहे किंवा नाही असा प्रश्न पडतो. अक्षरश: रस्त्यावरील खड्डे पाहिल्यास आजूबाजूची लेयर अत्यंत पातळ असल्याचे दिसत आहे. या रस्त्याला अंदाजे 2 वर्षांचा कालावधी सुध्दा झाला नसेल मग एवढ्या लवकर रस्ता खराब झालाच कसा ?
विशेष म्हणजे कुंभार पिंपळगांव ते घनसावंगीच्या दिशेने अशा प्रकारचे खड्डे दिसून आले नाही, मात्र कुंभार पिंपळगांव ते आष्टी या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्याचे काम वेगवेगळ्या एजन्सीने अथवा गुत्तेदारांनी केले आहे का ? आणि तसे असेल तर संबंधित गुत्तेदाराने जास्त पैसे कमवण्याच्या नादात कुंभार पिंपळगांव ते आष्टी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
महामार्गावर मोठी वर्दळ !
सदरील महामार्ग हा पाचोड (जि.छत्रपती संभाजीनगर) येथून सुरू होतो, तेथून जालना जिल्ह्यातील अंबड – घनसावंगी – कुंभार पिंपळगांव – आष्टी आणि पुढे पाथरी (जि.परभणी) पर्यंत जातो. म्हणजेच हा रस्ता पाथरी – माजलगाव या महामार्गाला जावून अटॅच होतो. याचाच अर्थ छत्रपती संभाजीनगरकडून हजारोच्या संख्येने येणारी वाहने तर आहेच मात्र हा रस्ता आष्टीच्या पुढे परभणी जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत जात असल्याने परभणी, नांदेड सहित आंध्र प्रदेश, आणि तेलंगना अशा विविध राज्यातील वाहतुक सुध्दा याच मार्गाने मोठ्या प्रमाणावर होत आहे.
परभणी, नांदेड सहित आंध्र प्रदेश, तेलंगना या राज्यातून येणाऱ्या वाहनांना या रस्त्याने गेल्यावर जालना – बीड हायवे सहित छत्रपती संभाजीनगर जवळ पडत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहने या रस्त्याने 24 तास ये-जा करत आहेत. अर्थातच अनेक जिल्ह्यांना जोडण्यासह आंतरराज्य वाहतुकीच्या दृष्टीनेही हा महामार्ग अत्यंत महत्वाचा आहे. मात्र संबंधित एजन्सी अथवा गुत्तेदाराने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने शासनाचे कोट्यावधी रूपये पाण्यात गेले की काय असा सवाल उपस्थित होत आहे.
छोटे-मोठे अपघात !
कुंभार पिंपळगांव ते आष्टी या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने आणि त्यामुळे जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने नेहमीच छोटे मोठे अपघात घडत आहेत. खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होवून अनेकांचे जीव जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण आजघडीला छोटे मोठे अपघात होत आहेत परंतू या खड्यांमुळे दुर्दैवाने एखादा मोठा अपघात झाल्यास मोठी जिवीत हानी होवू शकते अशी परिस्थिती आहे.
क्वालिटी कंट्रोल विभाग कुठंय ?
शासन कोणत्याही प्रकारचे काम केल्यावर त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तपासणी करत असते, इस्टीमेट प्रमाणे व अनेक वर्षे रस्ता खराब होणार नाही या दृष्टीने अशा महामार्गाचे काम होत असते, मात्र जेव्हा हे कोट्यावधी रूपयांचे काम पूर्ण झाले तेव्हा क्वालिटी कंट्रोलच्या अधिकाऱ्यांनी किंवा बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी आणि कामाचा दर्जाचा चेक केला नाही का ? जर तपासणी केली असेल तर अधिकाऱ्यांना रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे हे लक्षात आले नाही का ? खिसे गरम करून कामाच्या दर्जाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले का ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
कारवाई होणार का ?
अनेक वर्ष हा रस्ता अत्यंत खराब होता, वाहन चालवणेही अवघड होते, त्यामुळे सदरील रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे अशी कायम मागणी होती. कसेबसे या रस्त्याचे काम झाले. इतरत्र ठिकाणी काय परिस्थिती आहे हे तुर्तास सांगता येणार नाही, परंतू कुंभार पिंपळगांव ते आष्टी या महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने आणि जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने येत्या काही दिवसात या रस्त्याची चाळणी होणार हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित एजन्सी अथवा गुत्तेदारावर काही कारवाई होणार का ? तसेच निकृष्ट दर्जाचे काम होत असतांना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अभियंत्यांनाही जबाबदार धरले जाणार आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
पुढील पंचनामा लवकरच…
इतर बातम्या खाली पहा…