एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
आजघडीला घनसावंगी तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे, कारण मागील दशकाच्या तुलनेत आता कारखान्यांची संख्या वाढू लागली आहे त्यामुळे ऊस लावायचा किंवा नाही आणि लावला तर ऊस जाईल किंवा नाही याची चिंता बऱ्यापैकी कमी झाली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
आधीच्या काळात अंबड तालुक्यात (अंबड-घनसावंगी तालुक्याची गावे मिळून) कारखानाच नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे यांनी समर्थ सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. नंतरच्या काळात ऊसाचे क्षेत्र वाढल्याने शिवाय ऊसाचा प्रश्न गंभीर होत असल्याने आमदार राजेश टोपे यांनी समर्थ सहकारी साखर कारखाना व युनिट 2 सागर कारखान्याच्या माध्यमातून ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांना काही प्रमाणात यशही आले, परंतू दिवसेंदिवस ऊसाचे क्षेत्र वाढत राहिल्याने मर्यादा पडू लागल्या. सध्याच्या परिस्थितीत सुध्दा राजेश टोपे दोन्ही कारखान्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त ऊस गाळप कसा करता येईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.
मध्यंतरीच्या काळातच सतिष घाटगे पाटील यांनी समृध्दी शुगर्स लि. या साखर कारखान्याची निर्मिती करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सतिष घाटगे यांनीही आधीच्या तुलनेत आता कारखान्यात प्रतिदिन ऊस गाळप क्षमता वाढवली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
मागील काळात हिकमत उढाण यांनीही घनसावंगी मतदारसंघात शेतकऱ्यांची अडचण आणि ऊसाचे महत्व लक्षात घेवून ब्ल्यू सफायर या कारखान्याची निर्मिती केली, या कारखान्याच्या माध्यातूनही शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला, आता त्यांच्या कारखान्याच्या दुसऱ्या युनिटचेही भुमिपूजन झाले आहे, म्हणजेच येत्या काळात पुन्हा एक कारखाना शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार !
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार) पक्षाचे आमदार राजेश टोपे, भाजपचे सतिष घाटगे पाटील आणि शिवसेनेचे हिकमत उढाण या तिघांनीही उसाचे कारखाने सुरू करून घनसावंगी मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आधीच्या काळात उसाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे ऊस घेवून जाण्यासाठी आपला नंबर कधी लागेल अशी शेतकऱ्यांना चिंता होती, मात्र आता परिस्थिती बदलली आहे.
तिन्ही नेत्यांना घनसावंगी मतदारसंघात उसाला किती महत्व आहे ? उसाचे पाणी किती खोलवर मुरतंय ? उसाचा गोडवा किती महत्वाचा आहे ? उसाचे अर्थकारण काय ? उसामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आणि एकूणच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात कसा फरक पडतो ? उसाची एंट्री झाल्याशिवाय चित्रपट कसा पूर्ण होवू शकत नाही ? हे चांगलेच लक्षात आल्याने राजकारण उसाच्या अवतीभवती फिरतांना दिसत आहे.
ऊस आणि शेतकऱ्यांचे जीवनमान !
उसाच्या माध्यमातून अवघ्या काही वर्षातच शेतकऱ्यांच्या जीवनात कसे अमुलाग्र बदल घडून येवू शकतात याची अनेक उदाहरणे घनसावंगी मतदारसंघात पहायला मिळतील. जेव्हा अनेक गावातील शेतकरी 5 ते 10 कि.मी. अंतरावर असलेल्या डाव्या कालव्या (कॅनॉल) मधून पाईपलाईन करून शेतात आणतात तेव्हा त्याचे महत्व लक्षात येते. आजही कॅनॉलवरून पाईपलाईन करण्याची धडपड सुरूच आहे.
जेव्हा वर्षानुवर्षे कापूस, सोयाबीन व इतर पिके घेवून आणि प्रचंड मेहनत करूनही हाती काहीच लागत नव्हते, कायम कर्जबाजारी राहण्याची वेळ येत होती तेव्हा शेतकऱ्यांनी आपला मोर्चा उसाकडे वळवला आणि त्यातून मिळणारे उत्पन्न हे अनेकांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणणारे ठरले. कापूस, सोयाबीन व इतर पिकांच्या तुलनेत कमी रिस्क, उसाला मागील दशकात मिळणाऱ्या दरापेक्षा आता मिळत असलेले अधिक दर, इतर पिकांच्या तुलनेत अधिक उत्पन्न व ऊस गेल्यावर हातात ठोक मिळणारे पैसे यामुळे शेतकऱ्यांचा कल उसाकडे वाढला.
सर्वच नाही परंतू अनेकजण असे आहेत ज्यांना दुचाकी घेणे अवघड वाटत होते ते आज चारचाकी घेवू लागले आहे, त्याला एकमेव कारण म्हणजे ऊस आहे. घराचे बांधकाम, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न व इतर कार्यासाठी लागणारा पैसा हा उसाच्या शेतीच्या माध्यातून मिळत असल्याने पाण्याची उपलब्धता असणारे शेतकरी हमखास उसाची लागवड करत आहेत.
राजकारण उसाच्या अवतीभवती !
घनसावंगी मतदारसंघात कोणी कितीही नाही म्हटले तरी राजकारण हे उसाच्या अवतीभवतीच फिरतांना दिसत आहे. ज्या उसाच्या माध्यमातून आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहोत ते ऊस घेवून जाणाऱ्या कारखानदाराकडे मतदारांचे विशेष लक्ष आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे राजेश टोपे असो, हिकमत उढाण असो किंवा सतिष घाटगे पाटील असो या तिघांनीही जनतेची विशेष करून मतदारांची “दुखती नस” ओळखली आणि कारखाने उभारणीसह त्यांची क्षमता वाढवण्यास सुरूवात केली असं म्हणायला हरकत नाही. काहीही असो, उसाचे कारखाने आणि ऊस घेवून जाण्याची क्षमता वाढवण्याबाबत तिघांची सुरू असलेली चढाओढ मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत करणारी ठरत आहे.
…तर स्पर्धेतूनही जनतेचा फायदा !
ज्या प्रमाणे तिन्ही नेत्यांनी उसाचे कारखाने सुरू केले आणि त्यांची क्षमता वाढवून शेतकऱयांना दिलासा दिला त्याच प्रमाणे तिन्ही नेत्यांनी इतर बाबतीतही स्पर्धा सुरूच ठेवावी. तिन्ही नेतेच कशाला, यांच्यासह इतर सर्व पक्षाच्या नेत्यांनी किंवा विधानसभेसाठी आता आणि भविष्यातही इच्छुक उमेदवारांनी सुध्दा जनहिताचे प्रोजेक्ट आणून स्पर्धा करावी. उदाहरणार्थ कोणी मोठा कपड्याचा कारखाना सुरू करावा, कोणी आधुनिक फळ प्रक्रिया उद्योग सुरू करावा, कोणी शेतकऱ्यांना लागणाऱ्या विविध वस्तुंचा कारखाना सुरू करावा, कोणी विविध प्रकारचे निर्मिती उद्योग सुरू करावेत. कारण या स्पर्धेमुळे मतदारसंघातील हजारो युवक-युवतींना, सुशिक्षित बेरोजगारांना नक्कीच रोजगार मिळेल, हातात पैसा येईल आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनातही अमुलाग्र बदल घडेल यात शंका नाही.
तुम्हाला सगळं शक्य आहे !
देशभरात असे अनेक नेते, उद्योजक आहेत ज्यांनी स्वत:च्या नावाने किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावाने NGO प्रमाणे फाउंडेशन सुरू करून आधुनिक शिक्षण आणि आधुनिक आरोग्याच्या सुविधा नाममात्र दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. एखादे फाउंडेशन सुरू करून त्या माध्यमातून घनसावंगी मतदारसंघात आधुनिक शिक्षणाची अशी व्यवस्था करावी की, राज्यभरातील नेत्यांचे लक्ष या शिक्षण व्यवस्थेकडे जावे, सर्व प्रकारच्या पदव्या, कोर्सेस अथवा शिक्षण कमी किंवा नाममात्र दरात या कॉलेज मध्ये असावे.
एवढंच काय फाउंडेशनच्या माध्यमातून एखादे आधुनिक हॉस्पिटल सुरू करावे जेणेकरून कमी किंवा अल्पदरात सर्व प्रकारचे उपचार मतदारसंघातील जनतेला मिळावेत. का शक्य नाही ? तर नक्कीच शक्य आहे. फाउंडेशनच्या तिजोरीत तुम्ही थोडं टाका आणि बाकी तुमचे राज्यासह देशभरातील नेते, विविध उद्योजक, दानशूर व्यक्तींशी चांगले संबंध आहेत ते या फाउंडेशनला कोट्यावधीची मदत करू शकतील. केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे या वाक्यानुसार मतदारसंघातील विधानसभेसाठी इच्छुक सर्व उमेदवारांना काही ना काही नक्कीच शक्य आहे. भविष्यात राजकारण आणि समाजकारण करायचंच असेल तर प्रवास छोटा नाही आणि वाटतं तेवढा सोपाही नाही. माना की अंधेरा घना है, मगर दीप (दिया) जलाना कहां मना है !
- परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज
9890515043