Your Alt Text

एल्‍गार न्‍यूजच्‍या बातमीचा इम्‍पॅक्‍ट :- जांबसमर्थ येथे पुरवठादाराने केलेल्‍या निकृष्‍ट दर्जाच्‍या पोषण आहार पुरवठ्याची प्रशासनाच्‍या समितीने भेट देवून सुरू केली चौकशी !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
जांबसमर्थ (ता.घनसावंगी, जि.जालना) येथे पुरवठादाराने अंगणवड़्यांना निकृष्‍ट दर्जाचा पुरवठा केल्‍या बाबत एल्‍गार न्‍यूजने दि.16 रोजी बातमी घेवून हा प्रकार समोर आणला होता, याची दखल घेत महिला व बाल कल्‍याण विभागाने चौकशी समिती स्‍थापन करून चौकशी सुरू केली आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील जांबसमर्थ येथे महिला व बाल कल्‍याण विभागा अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीच्‍या माध्‍यमातून गरोदर महिला, स्‍तनदा माता व लहान बालकांना पोषण आहार पुरवठा केला जातो, ज्‍यामध्‍ये विविध प्रकारच्‍या डाळी, धान्‍य व इतर वस्‍तू असतात. एल्‍गार न्‍यूजला गावातील नागरिकांनी सॅम्‍प्‍ल म्‍हणून जे मूग डाळ, मसूर डाळ व गहू दाखवले आहे ते अत्‍यंत निकृष्‍ट दर्जाचे आहे. शिवाय हळदीचे पाकीट सुध्‍दा खूप जुने असल्‍याचे दिसत आहे.

An inquiry into the supply of substandard nutritional food is underway 2

सदरील पुरवठादाराने जो माल पुरवठा केला आहे तो एवढा निकृष्‍ट दर्जाचा आहे की, त्‍याचा वास घेतला तर मळमळ होत आहे, एवढंच नव्‍हे तर हा माल अथवा अन्‍नधान्‍य जनावरे सुध्‍दा खाऊ शकणार नाहीत. त्‍यामुळे प्रश्‍न उपस्थित होतो की, संबंधित पुरवठादाराने जांबसमर्थ येथील महिला व लहान मुलांचे आरोग्‍य आणि जीव धोक्‍यात येईल एवढी मोठी चूक केलीच कशी ? यदाकदाचित एखाद्या महिला व लहान मुलाच्‍या जीवितेला काही बरेवाईट झाल्‍यास याची जबाबदारी कोणाची ? असा सवालही उपस्थित होत आहे.

दोषींवर कारवाई होणार का ?

जांबसमर्थ येथे पोषण आहार मालाचा पुरवठा अंगणवाड्यांना करण्‍यात आल्‍यावर हा प्रकार समोर आला. जो माल वरून आला तो गाव पातळीवर वाटप करण्‍यात आला असे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्‍यामुळे तुर्तास अंगणवाडी किंवा गाव पातळीवर कोणाला दोषी धरणे घाईचे ठरेल. मात्र ज्‍या पुरवठादाराने सदरील पोषण आहाराचा माल पुरवठा केला आहे त्‍याने अशा निकृष्‍ट दर्जाच्‍या मालाचा पुरवठा का केला ? गोडाऊन मधून माल उचलतांना तपासणी केली नाही का ? सदरील माल गोडाऊन मध्‍ये किती दिवसांपासून किंवा महिन्‍यांपासून पडून होता ? पुरवठादारासह वरच्‍या पातळीवर अजून कोणी यामध्‍ये दोषी आहे का ? असे अनेक प्रश्‍न यानिमित्‍ताने उपस्थित होत आहेत. त्‍यामुळे या सर्व गंभीर प्रकाराची सखोल चौकशी होवून कारवाई होणे आवश्‍यक आहे.

विषय फक्‍त एका गावापुरताच आहे का ?

ज्‍या अर्थी संबंधित पुरवठादाराने जांबसमर्थ येथे निकृष्‍ट दर्जाच्‍या मालाचा पुरवठा केला आहे त्‍या अर्थी त्‍याने तालुक्‍यात सुध्‍दा अनेक गावांमध्‍ये हा माल दिला असेल असे म्‍हटल्‍यास चुकीचे ठरणार नाही. त्‍यामुळे सदरील प्रकरणाची चौकशी मर्यादित स्‍वरूपात न करता सदरील पुरवठादाराने तालुक्‍यात कोणकोणत्‍या गावात या निकृष्‍ट मालाचा पुरवठा केला आहे ? निकृष्‍ट दर्जाचा माल पुरवठा करण्‍यात पुरवठादाराला अजून कोणाचा आशिर्वाद आहे ? यामध्‍ये पुरवठादारासह वरिष्‍ठ पातळीवर अजून कोणी दोषी आहे का ? याचाही तपास होणे आवश्‍यक आहे.

एल्‍गार न्‍यूजच्‍या बातमीचा परिणाम :-

एल्‍गार न्‍यूजने हा सर्व प्रकार बातमीच्‍या माध्‍यमातून दि.16 रोजी प्रकाशित करताच तालुक्‍यात खळबळ उडाली. वरिष्‍ठ अधिकाऱ्यांच्‍या सूचनेवरून संबंधित विभागाने तातडीने चौकशी समिती स्‍थापन करून गावाला भेट दिली असून चौकशी सुरू केली आहे, सदरील समिती चौकशीचा अहवाल लवकरच वरिष्‍ठ अधिकाऱ्यांना सादर करणार असल्‍याचे कळते.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!