एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
दलालांनी फक्त लाजच सोडली नाही तर माणुसकी सुध्दा सोडल्याचे दिसत आहे. एक म्हण आहे की, मेलेल्या व्यक्तीच्या टाळूवरचे लोणी खाणे, कदाचित ही म्हण कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील एका घटनेत लागू पडत असावी. कारण दलालाने मयत झालेल्या महिला कामगाराच्या कुटुंबियास 1 लाख मिळवून दिल्यावर थोडे थोडके नव्हे तर तब्बल 50 हजार घेतल्याचे समोर आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे गेल्या अनेक महिन्यांपासून कामगारांची दलालांकडून अक्षरश: लूट सुरू आहे. कामगार विभागाच्या आशिर्वादाने दलालांनी आतापर्यंत कोट्यावधी रूपये कमवले असून नोंदणी पासून ते नुतनीकरण आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी दलाल मनमर्जीप्रमाणे कामगारांची लूट करत आहेत.
टाळूवरचे लोणी खाणे !
प्राप्त विश्वसनीय माहितीनुसार कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या कुंभार पिंपळगांव येथील एका महिला कामगाराचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता, या महिलेला मुली असून मुलगा नाही. तर पती शारीरिक अडचणीमुळे काम करू शकत नाही. सदरील दलालाने मयत झालेल्या महिलेच्या पतीला कामगार मंडळाकडून 1 लाख रूपये मिळवून दिले मात्र त्या बदल्यात अक्षरश 50 हजार रूपये घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे मयताच्या कुटुंबियाला 2 लाख मिळतात असे शासनाच्या वेबसाईटवरच दर्शवले आहे मात्र दलालाने त्यापैकी फक्त 1 लाख मिळवून दिल्याचे सांगण्यात येत आहे, त्यातूनही दलालाने अर्धे पैसे म्हणजेच 50 हजार खिशात घातल्याचे समोर आले आहे. अर्थातच सदरील दलालाने सगळे नियम कायदे धाब्यावर बसवून कामगारांची लूट केली आहे.
अजानतेपणाचा फायदा !
कुंभार पिंपळगांव येथील काही दलाल विशेष करून 2 मिस्त्री यांनी कामगारांच्या अजाणतेपणाचा फायदा घेत कोट्यावधी रूपये कमवले आहेत. फुकटात लाखो रूपयांची कमाई होत असल्याने दलालांनी आपले मिस्त्री काम सुध्दा सोडले असून अनेक ठिकाणी हे दलाल तोंड मारत फिरत आहेत. कबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे बहुतांश कामगार हे अशिक्षित किंवा अल्पशिक्षित आहेत त्यांच्या अजाणतेपणाचा किंवा अज्ञानाचा फायदा घेवून सदरील दलाल हे कामगारांची प्रचंड लूट करत आहेत.
कामगाराला लाभ !
शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केलेले असून या मंडळाच्या माध्यमातून कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो, यामध्ये शिक्षण, आरोग्य, विमा यासह लग्न व इतर कार्यासाठी लाखो रूपयांच्या विविध योजना आहेत. मात्र कुंभार पिंपळगांव येथील दलाल नोंदणी पासून ते योजनांचा लाभ मिळवून देण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी कामगारांची लूट करत आहेत.
आधे तुम्हारे आधे हमारे !
कुंभार पिंपळगांव व परिसरात अनेक दलाल निर्माण झाले आहेत, त्यापैकी 2 दलाल अधिक फॉर्म मध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. कामगाराची नोंदणी करण्यासाठी 2000 रूपये घेतले जात आहे तर नुतनीकरणासाठीही 1 ते 2 हजार घेण्यात येत आहेत. विशेष म्हणजे लग्नासाठी कामगार मंडळाकडून 30 हजार रूपये मिळतात, यामध्ये आधे तुम्हारे आधे हमारे या फॉर्म्यूल्या नुसार सरळ सरळ 15 हजार रूपये दलाल घेत आहेत. एवढंच नव्हे तर कामगार मंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी 50-50 फॉर्म्यूला ठरलेला आहे.
बनावट शिक्के !
कुंभार पिंपळगांव येथील दोन्ही दलालांनी घरीच ऑफीस थाटले आहे, यामध्ये कॉम्प्यूटर, प्रिंटर व इतर साहित्य जमा करून कागदपत्रांचा बाजार मांडला आहे. आश्चर्य म्हणजे या दलालांकडे विविध बनावट शिक्के असल्याचेही समोर आले आहे. कामगारांच्या जीवावर अवघ्या काही महिन्यात या दलालांनी बिल्डींग, चार चाकी गाडी, बॅंक बॅलेन्स, प्लॉट अशा प्रकारची मोठी संपत्ती गोळा केली आहे.
अधिकाऱ्यांचा आशिर्वाद !
सदरील दलाल हे कामगारांना स्पष्टपणे सांगत आहेत की, कामगार अधिकाऱ्यांच्या तोंडावर बंडल फेकल्याशिवाय तुमचं काम होवू शकत नाही, त्या ह#मखोर अधिकाऱ्यांना काही दिल्याशिवाय तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तुम्हाला मिळणाऱ्या रक्कमेतून अर्धे पैसे आम्हाला द्यावे लागतील नसता तुमचे काम होणार नाही असे दलाल सांगत आहेत. अर्थातच जेवढ्या कॉन्फिडन्सने हे दलाल काम करून देण्याचे सांगत आहेत ते पाहता दलालांना संबंधित कामगार अधिकाऱ्यांचा आशिर्वाद आहे हे स्पष्ट होते.
क्या पुरी दालही काली है ?
एल्गार न्यूजने दलालांचा काळा बाजार काही दिवसांपूर्वीच समोर आणला होता, एल्गार न्यूजच्या वतीने सदरील कामगार अधिकाऱ्यांशी आता आणि यापूर्वीही वेळोवेळी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र कामगार अधिकारी कुठलीही प्रतिक्रिया देण्यापासून पळ काढत आहेत किंवा बोलणे टाळत आहे. त्यामुळे “दाल में कुछ काला नही बल्की पुरी दालही काली तो नही” असा दाट संशय आल्याशिवाय राहत नाही.
वरिष्ठ नेते, अधिकारी गप्प का ?
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांवसह परिसरातील 20 ते 25 गावात सदरील दलाल कामगारांची प्रचंड लूट करत असतांना वरिष्ठ नेते, अधिकारी गप्प का आहेत ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे किमान आता तरी संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सर्वसामान्य कामगार वर्गातून होत आहे.
चौकशी करणार !
याबाबत जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याशी संपर्क साधला असता असा काही प्रकार होत असेल तर तो गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.