Your Alt Text

पहिल्‍यांदाच एवढा मोठा प्रवेश मेळावा पाहतोय ! – एकनाथ शिंदे ….. | जख्‍मी हुआ तो क्‍या हुआ, टाइगर अभी जिंदा है ! – हिकमत उढाण

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
पक्ष प्रवेश मेळावे अनेक पाहिले परंतू पहिल्‍यांदाच एवढा मोठा पक्ष प्रवेश मेळावा पाहतोय, असं प्रतिपादन महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव – तिर्थपुरी रोडवर हिकमत उढाण यांच्‍या ब्‍ल्‍यू सफायर कारखान्‍याच्‍या युनिट २ चे भुमिपूजन व हजारो कार्यकर्त्‍यांसह हिकमत उढाण यांचा शिवसेना पक्षात प्रवेश सोहळा आयोजित करण्‍यात आला होता यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, राज्‍याचे कॅबीनेट मंत्री, माजी मंत्री, आमदार, नगरसेवक, जि.प.सदस्‍य, पंचायत समिती सदस्‍य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्‍य, चेअरमन, जिल्‍हा, तालुका, ग्रामीण पदाधिकारी यांच्‍यासह हजारोच्‍या संख्‍येने कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलतांना मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले की, पाऊस भरपूर पडलेला असतांना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित आहेत ही खूप मोठी गोष्‍ट आहे, हेच हिकमत उढाण यांचं वैभव आहे आणि जनतेचं त्‍यांच्‍यावरील प्रेम आहे. हिकमत उढाण यांच्‍या बाबतीत बोलायचं झालं तर जख्‍मी शेर ज्‍यादा खूंखार होता है, इसलिए उसका डर भी ज्‍यादा होता है. मंजिल उन्‍ही को मिलती है जिनके सपनो में जान होती, पंखो से कुछ नही होता हौसलो से उढाण होती है ! असेही एकनाथ शिंदे म्‍हणाले.

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलतांना म्‍हणाले की हिकमत उढाण एक हाडाचा कार्यकर्ता आहे, एक कडवट कार्यकर्ता आहे, मी मनापासून त्‍यांचे स्‍वागत करून शुभेच्‍छा देतो. एक सच्‍चा कार्यकर्ता, एक आदर्श लोकप्रतिनिधी, एक आदर्श बाळासाहेबांचा शिवसैनिक म्‍हणजे हिकमत उढाण आहे. मला काय मिळेल असा विचार न करता माझ्या शेतकऱ्याला काय मिळेल, माझ्या अन्‍नदाता शेतकऱ्याला काय मिळणार याचा विचार करणारा कार्यकर्ता म्‍हणजे हिकमत उढाण आहे. असा नेता तुम्‍हाला कुठे नाही मिळणार असे प्रतिपादनही एकनाथ शिंदे यांनी केले.

विरोधक सांगत होते की, सरकार पडणार, मुख्‍यमंत्री जाणार, एक महिना, दोन महिने, तीन महिने सांगितले, पण आम्‍ही आमचा कार्यकाळ पूर्ण केला. फक्‍त कार्यकाळ पूर्ण केला नाही तर सर्वसामान्‍य नागरिकांना न्‍याय देण्‍याचे काम केले. लाडक्‍या बहिनींना न्‍याय देण्‍याचे काम केले. आर्थिक ताकद बहिनींना मिळाली पाहिजे ही आमची भावना आहे. विरोधक कोर्टात गेले, म्‍हणाले आमचं सरकार आलं तर आम्‍ही योजना बंद करू, आम्‍ही जेल मध्‍ये टाकू पण तुमचं सरकार येणार कसं ? तुमचा चेहरा तुमच्‍या सहकारी पक्षाला चालत नाही, तुमची स्‍पर्धा मुख्‍यमंत्री पदासाठी नाही तर तुमची स्‍पर्धा विरोधीपक्ष नेते पदासाठी आहे अशीही खोचक टीका मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.

पुढे बोलतांना एकनाथ शिंदे म्‍हणाले की, ३ सिलेंडर मोफत देण्‍याचा निर्णय आम्‍ही घेतला, शेतकऱ्यांना ६ हजार पीएम किसान योजनेचे मिळतात त्‍यात आम्‍ही पण ६ हजार देत आहोत. एसटी मध्‍ये महिलांना ५० टक्‍के सवलत दिली तर म्‍हणाले की एसटी तोट्यात जाईल, परंतू सवलत दिल्‍यावर एसटी फायद्यात आली. हे सरकार सर्वसामान्‍यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, सरकारच्‍या तिजोरीवर सर्वात आधी अधिकार शेतकऱ्याचा आहे. पैसे किती, मालमत्‍ता किती यापेक्षा सोबत लोकांचे प्रेम किती याला महत्‍व आहे. जालना जिल्‍हा दुष्‍काळी अनुदानातून बिल्‍कूल वगळणार नाही. आतापर्यंतच्‍या इतिहासात घेतले गेले नाही एवढे निर्णय आमच्‍या महायुती सरकारने घेतले. आत्‍ताच मुंबईचे ५ टोल बंद करून आलोय म्‍हणजेच हलक्‍या वाहनांना मुंबईत टोल लागणार नाही.

आमचं सरकार सर्वांना सोबत घेवून चालणारं सरकार आहे, सर्वांचं हित बघणं हे आमचं कर्तव्‍य आहे, आम्‍ही जात पात पाहत नाही, मुख्‍यमंत्री लाडकी बहिण योजनेचा फायदा सर्व जाती धर्माच्‍या भगिनींना होत आहे. तसेच इतर योजनांचा फायदा सुध्‍दा सर्वांना होत आहे. मराठवाड्यात नदी जोड प्रकल्‍प असो किंवा मराठवाडा वॉटर ग्रिड प्रकल्‍प असो, आम्‍ही सर्व प्रकल्‍प पूर्ण करणार आणि मराठवाड्याला विविध योजनांच्‍या माध्‍यमातून न्‍याय देणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

टाइगर अभी जिंदा है – उढाण

घनसावंगी मतदार संघाममध्‍ये ऊसाच्‍या राजकारणामुळे मतदारांमध्‍ये भिती होती, मात्र ही भिती दूर करण्‍याचे काम मी केले. खोटं बोलून नारळ फोडण्‍याची माझी सवय नाही, मागील काळात सर्वात जास्‍त भाव देण्‍याचे काम आपण केलं आहे, खोटं कधी बोलत नाही आणि यापुढेही बोलणार नाही, विरोधक सगळ्यांना सांगतात आम्‍ही जळालेलं ऊस घेतो, काही शेतकऱ्यांचे जळालेले ऊस तुम्‍ही घेवून गेला असाल परंतू मागच्‍या 40 वर्षात किती लोकांचे ऊस तुम्‍ही जाळले याचं काही मोजमाप आहे का , मागच्‍या ४० वर्षात किती लोकांचे ऊस तोडून तुम्‍ही बांधावर टाकले याचं काही मोजमाप आहे का ? या सगळ्यांचा विचार करा आणि त्‍यानंतरच बोला अशी टिकाही हिकमत उढाण यांनी केली.

पुढे बोलतांना हिकमत उढाण म्‍हणाले की, यावर्षी चांगला पाऊस झाल्‍यामुळे धरणं तुडुंब भरली आहेत, मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड झाली आहे, त्‍यामुळे साहजिकच शेतकरी बांधवांना चिंता वाटू लागली आहे की, पुढच्‍या वर्षी आपला ऊस जाईल किंवा नाही आणि तुमची ही भिती घालवण्‍यासाठी आज आपलया नवीन कारखान्‍याचे भुमिपूजन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते करत आहोत, पुढच्‍या वर्षी आपण या कारखान्‍याच्‍या माध्‍यमातून साधारण ६ लाख मेट्रीक टन ऊस गाळप करणार आहोत. पहिल्‍या कारखान्‍यातून ३ लाख मेट्रीक टन आणि या कारखान्‍याच्‍या माध्‍यमातून ६ लाख मेट्रीक टन असे एकूण ९ लाख मेट्रीक टन ऊस गाळप होणार आहे, त्‍यामुळे भविष्‍यात ऊसाचा प्रश्‍न राहणार नाही.

मागच्‍या 2 वर्षात त्‍यांनी धडाडीचे निर्णय घेतले, आपल्‍या भागात गेम चेंजर ठरणारा समृध्‍दी महामार्ग मुख्‍यमंत्री यांनी पूर्ण केला. घनसावंगी मतदारसंघात अनेक मुलभूत प्रश्‍न आहेत. रस्‍त्‍याचा प्रश्‍न आहे, पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न आहे, शिक्षणाचा प्रश्‍न आहे, गल्‍हाटी धरणाचा प्रश्‍न आहे, शहागड तिर्थपुरी कुंभार पिंपळगांव हा मार्ग चौपदरी झाला तर आपले जीवन सुसह्य होईल. हे सर्व प्रश्‍न सोडवायचे असतील तर आपणास पुन्‍हा एकदा एकनाथ शिंदे यांना साथ द्यावी लागेल. एकनाथ शिंदे यांच्‍या बाबतीत एक सांगितलं जातं He is not a Chief Minister but he is a Common Man अशी भावनाही हिकमत उढाण यांनी व्‍यक्‍त केली.

मेळाव्‍याला उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद !

हिकमत उढाण यांनी कारखान्‍याचे भुमिपूजन व एकनाथ शिंदे यांच्‍या शिवसेनेत हजारो कार्यकर्त्‍यांसह पक्ष प्रवेश सोहळा आयोजित केला होता. सदरील कार्यक्रमाला मतदारसंघातून हजारोच्‍या संख्‍येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. जोरदार पाऊस झाल्‍यानंतरही गर्दी कमी झाली नाही. मतदारसंघातून शेकडो वाहनांच्‍या माध्‍यमातून कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम संपल्‍यावर जवळपास २ कि.मी. पर्यंत वाहनांच्‍या रांगा होत्‍या. अनेकांना कार्यक्रम स्‍थळापासून अंबड – पाथरी हायवेवर येण्‍यासाठी जवळपास १ तासापेक्षा जास्‍त कालावधी लागला. अर्थातच या कार्यक्रमाला कार्यकर्ते व नागरिकांनी उत्‍सफुर्त प्रतिसाद दिल्‍याचे पहायला मिळाले.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!