Your Alt Text

जनतेचा आशिर्वाद कोणाला मिळणार ? घनसावंगी मतदारसंघाचा आमदार कोण होणार ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
एखाद्या सस्‍पेन्‍स चित्रपटात ज्‍या प्रकारे घडामोडी घडतात त्‍याच प्रकारे घनसावंगी मतदारसंघातील घडामोडी घडतात की काय असं म्‍हटल्‍यास चुकीचे ठरणार नाही. कारण सुरूवातीला दुरंगी अथवा तिरंगी दिसणारी लढत आता किती रंगी होईल हे सांगणे अवघड होवून बसले आहे.

मागील काळात दोन प्रमुख पक्षात झालेली फुट व त्‍यानंतर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि त्‍यानंतर राज्‍यभरात इच्‍छुकांच्‍या संख्‍येत झालेली वाढ पाहता यावेळेस सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढल्‍याचे दिसत आहे. अर्थातच घनसावंगी मतदारसंघातही राजकीय परिस्थिती काही वेगळी नाही.

तिकीट कोणाला मिळणार ?

मागील पंचवार्षिकला दोन प्रमुख उमेदवारांमध्‍ये लढत झालेली असली तरी यावेळेस मात्र घनसावंगी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्‍यास अनेकजण इच्‍छुक आहेत. तिकीट कोणाला मिळणार हे अद्याप निश्चित नसले तरी यावेळेस अनेक इच्‍छुक उमेदवार रिंगणात उतरण्‍याची शक्‍यता आहे, अर्थातच यावेळेस अपक्ष उमेदवार जास्‍त असण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

कोण आहेत इच्‍छुक ?

घनसावंगी मतदारसंघात यावेळेस वेगळी राजकीय परिस्थिती दिसून येत आहे, महाविकास आघाडी, महायुती, यासह इतर पक्ष व अपक्ष यांच्‍यामुळे अनेक उमेदवार इच्‍छुक दिसून येत आहेत. प्रत्‍येक जण आपापल्‍या परीने पक्षाचे तिकीट मिळवण्‍यासाठी प्रयत्‍नशील असला तरी संबंधित पक्ष कोणावर विश्‍वास टाकतो हे पाहणे महत्‍वाचे ठरणार आहे. घनसावंगी मतदारसंघात खालील प्रमाणे इच्‍छुक उमेदवार दिसून येत आहेत.

राजेश टोपे :-

माजी आरोग्‍यमंत्री तथा सध्‍याचे रनिंग आमदार असलेले राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (SP) चे राजेश टोपे हे महाविकास आघाडीकडून प्रबळ दावेदार आहेत, रनिंग आमदार असल्‍याने पुन्‍हा त्‍यांना तिकीट मिळेल हे जवळपास निश्चित आहे. संस्‍था, शाळा, कॉलेज, कारखाने यासह स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमध्‍ये पदाधिकारी, यासह मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्‍यांच्‍या पाठीशी आहेत. मात्र अॅंटी इनकमबन्‍सी अथवा काही प्रमाणात असलेल्‍या नाराजीचा फटका त्‍यांना बसतो का किंवा मतांच्‍या विभागणीचा फायदा होवून त्‍यांचा मार्ग मोकळा होतो हेच पाहणे महत्‍वाचे ठरणार आहे.

हिकमत उढाण :-

मागील पंचवार्षिकला अवघ्‍या काही मतांनी पराभव झालेले हिकमत उढाण हे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या शिवसेनेत प्रवेश करणार असल्‍याचे निश्चित आहे. महायुतीकडून त्‍यांना तिकीट मिळाल्‍यास मतदारसंघात हिकमत उढाण सुध्‍दा एक प्रबळ दावेदास असू शकतात. हिकमत उढाण हे माजी सनदी अधिकारी असून प्रशासकीय अनुभव त्‍यांच्‍या पाठीशी आहे. हिकमत उढाण यांचाही तालुक्‍यात एक कारखाना असून पुन्‍हा एका कारखान्‍याचे भुमिपुजन प्रस्‍तावीत आहे. स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेत समर्थक असलेले त्‍यांचे अनेक पदाधिकारी आहेत. शिवाय मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असून त्‍यांना माननारे असंख्‍य मतदारही आहेत. इतरांच्‍या अॅंटी इनकम्‍बंसीचा फायदा त्‍यांना किती होतो आणि मतदारांना आपली बाजू पटवून देण्‍यात ते किती यशस्‍वी होतात हेच पाहणे महत्‍वाचे ठरणार आहे.

सतिष घाटगे :-

समृध्‍दी साखर कारखान्‍याचे चेअरमन असलेले सतिष घाटगे हे भाजपचे पदाधिकारी असून भाजपकडून ते इच्‍छुक आहेत. महायुतीकडून त्‍यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली किंवा नाही मिळाली तरी निवडणूक लढवणार हे निश्चित असल्‍याचे त्‍यांनी केलेल्‍या शक्‍तीप्रदर्शन आणि त्‍यांच्‍या वक्‍तव्‍यावरून दिसत आहे. घनसावंगी मतदारसंघात सतिष घाटगे यांचे सुध्‍दा अनेक समर्थक कार्यकर्ते असून कारखान्‍याच्‍या माध्‍यमातून त्‍यांनी अनेक गावात नेटवर्क स्‍थापित करण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. महायुतीकडून त्‍यांना तिकीट मिळते का ? यावर बरंच काही अवलंबून आहे. तिकीट न मिळाल्‍यास पर्याय म्‍हणून अपक्ष उभे राहून ते मतदारापर्यंत आपली बाजू कशी पोहोचवतात किंवा वेगळा काही निर्णय घेतात हेच पाहणे महत्‍वाचे ठरणार आहे.

सुनिल आर्दड :-

भारतीन जनता पार्टीचे ज्‍येष्‍ठ कार्यकर्ते तथा माजी नगराध्‍यक्ष असलेले सुनिल आर्दड हे सुध्‍दा घनसावंगी मतदारसंघातून इच्‍छुक आहेत. यापूर्वी सुध्‍दा त्‍यांनी या मतदारसंघातून आपले नशीब आजमावले होते. त्‍यांना माननारे सुध्‍दा अनेक कार्यकर्ते मतदारसंघात आहेत. सुनिल आर्दड हे महायुतीकडून इच्‍छुक आहेत, यावेळेस त्‍यांना महायुतीकडून तिकीट मिळाल्‍यास ते निवडणूक लढू शकतात.

विलासराव खरात :-

अंबड-घनसावंगी मतदारसंघातून यापूर्वी आमदार राहिलेले विलासराव खरात यावेळी काहीसे शांत दिसत असले तरी ते सुध्‍दा इच्‍छुक असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. सध्‍या सुरू असलेल्‍या गोंधळामध्‍ये शांतपणे आपल्‍या उमेदवारीसाठी प्रयत्‍नशील असण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. विलासराव खरात यांना माननारा वर्ग आजही घनसावंगी मतदारसंघात आहे. महायुतीकडून त्‍यांना उमेदवारी मिळाल्‍यास ते सुध्‍दा निवडणूक लढू शकतात.

रविंद्र तौर :-

राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार) चे प्रदेश सरचिटणीस व जिल्‍हा नियोजन समितीचे सदस्‍य रविंद्र तौर हे सुध्‍दा महायुतीकडून तिकीट मिळाल्‍यास विधानसभेची निवडणूक लढू शकतात. शैक्षणिक संस्‍था, शाळा, कॉलेज यासह मतदारसंघात त्‍यांचे अनेक कार्यकर्ते आहेत. राष्‍ट्रवादी मध्‍ये फुट झालेली असली तरी यापूर्वीचा इतिहास पाहता मतदारसंघावर राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार) सुध्‍दा आपला दावा करू शकतो. अर्थातच महायुतीकडून काय निर्णय होतो यावर बरंच काही अवलंबून असेल.

शिवाजीराव चोथे :-

माजी आमदार असलेले शिवाजीराव चोथे सुध्‍दा घनसावंगी मतदारसंघातून इच्‍छुक आहेत. मागील काही दिवसांपासून मतदारसंघात त्‍यांचे सुरू असलेले दौरे पाहता ते निवडणूक लढवणार असल्‍याचे दिसत आहे. जातीय समिकरणाचा फायदा आपल्‍याला होवू शकतो का ? याचा अंदाज घेवून कदाचित ते निवडणूकीत आपले नशीब आजमावू शकतात. त्‍यांना माननारे अनेक कार्यकर्ते मतदारसंघात असून प्रत्‍यक्ष निवडणूकीत मतदारांचा पाठींबा त्‍यांना किती मिळतो यावर बरंच काही अवलंबून असेल.

मधुकरराजे आर्दड :-

काही महिन्‍यांपूर्वीच विभागीय आयुक्‍त पदावरून निवृत्‍त झालेले मधुकरराजे आर्दड हे सुध्‍दा घनसावंगी मतदारसंघातून निवडणूक लढवण्‍यास इच्‍छुक आहेत. मागील काही दिवसांपासून त्‍यांनी सुध्‍दा मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्‍या आहेत. अर्थातच ते घनसावंगी मतदारसंघातून आपले नशीब आजमावणार असल्‍याचे दिसत आहे.

पंडीत भुतेकर :-

एकनाथ शिंदे यांच्‍या शिवसेनेचे पदाधिकारी असलेले पंडीत भुतेकर हे सुध्‍दा घनसावंगी मतदारसंघातून निवडणूक लढण्‍यास इच्‍छुक असल्‍याचे कळते. महायुतीकडून तिकीट मिळाल्‍यास ते सुध्‍दा आपले नशीब आजमावू शकतात. घनसावंगी मतदारसंघात शिवसेनेचे सुध्‍दा अनेक कार्यकर्ते असून महायुतीच्‍या माध्‍यमातून पक्षाने तिकीट दिल्‍यास ते निवडणूक लढू शकतात.

मंजिल किसको मिलेगी ?

मागील काळात घनसावंगी मतदारसंघात प्रमुख उमेदवारांमध्‍ये लढत झाली होती, मात्र यंदा इच्‍छुकांची संख्‍या जास्‍त असल्‍याने शिवाय यावेळी अपक्ष सुध्‍दा जास्‍त असण्‍याची शक्‍यता असल्‍याने परिस्थिती वेगळी असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसत आहे. अर्थातच मागील काळात जातीय समिकरणे आणि निर्माण झालेली राजकीय परिस्थिती पाहता यावेळी चित्र वेगळं असेल असेच सध्‍या तरी दिसत आहे. “समंदर में तूफानों के बीच सभी की कश्‍ती अलग अलग दिशाओं में चल रही है, अब देखना है किनारे पर पहले कौन पहुंचता है और मंजिल किसको मिलती है…!”


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!